साडेबाराचा मॅटीनी शो असायचा. मॅटिनीला बहुतेक जुने सिनेमे असायचे. अगदी ब्लॅक अँड व्हाईट सिनेमे पण तेव्हा पाहिल्याचं आठवतं. ब्लॅक अँड व्हाईट सिनेमाचा लहान मुलांना कंटाळा येई. तरीही कही और चल, आरती, एक ही रास्ता, यहुदी असे देव आनंद, दिलीपकुमार, प्रदीप कुमार, अशोक कुमारचे ब्लॅक अँड व्हाईट सिनेमे पण तेव्हा पाहिल्याचं आठवतं. बरोबर बारा वाजता सायकल रिक्षाने आम्ही सात आठ जणी घरून निघत असू. मी तेव्हा सात आठ वर्षांचीच असेन. माझ्या वयाच्या अजून एक दोन मुली असायच्या. तेव्हा थिएटरमधे ‘लेडीज’ नावाचा एक प्रकार असायचा. थिएटरमध्ये सर्वात मागे तीन एक फुटाची भिंत घालून हा विभाग वेगळा केलेला असायचा. इथे खुर्च्या नसायच्या तर बाकडे टाकलेले असायचे. तीन तीन तास पाठ न टेकता कशा सिनेमा पहात असतील बायका, त्याच जाणो. पाठ टेकायला मिळावी म्हणून काही जणी मागच्या भिंतीच्या पुढच्या जागा धरत. आम्ही लहान कंपनी त्या अर्ध्या भिंतीच्या पार्टीशन ला लटकत पिक्चर पहायचो. तिकीट’ असायचं पासष्ट पैसे. आणि पुरूषांना इथे प्रवेश नसायचा. त्यामुळे पुरूष बरोबर नसताना बायका सहसा लेडीजचंच तिकीट काढत. तिकीट खिडकीवर पण पहिल्या दुस-या दिवशी तुफान गर्दी असायची. अशावेळी तिकीट काढायला काही एक्सपर्ट महिला असतं. भांडणं, रेटारेटी, करून त्या जेव्हा तिकीट काढून तिकीटबारीतून बाहेर येत तेव्हा त्यांचा अवतार रणचंडीसारखा झालेला असायचा. कधी तिकिटं संपून गेलेली असायची आणि तिकीटं ब्लॅकने विकणारे लोक थिएटरच्या आसपास फिरत असायचे.
पिक्चरला गेल्यावर बाहेरच्या काचेच्या शोकेसमधे लावलेले पिक्चरमधले फोटो पहाताना आनंदाच्या गुदगुल्या व्हायच्या. तेव्हा थिएटरवर लावलेलं पिक्चरचं बॅनर पेंटर लोक हाताने रंगवत असत. पेंटरच्या करामतीमुळे ब-याचदा त्याच्यावरचा फिरोज खान धर्मेंद्र सारखा दिसायचा.दिवसभर पिक्चर बघतो म्हणून आम्हाला डोअर कीपरचा फार हेवा वाटायचा. अंधारात टॉर्च मारत तो सगळ्या प्रेक्षकांना त्यांची त्यांची जागा दाखवून द्यायचा. भर दुपारी त्या काळ्याकुट्ट अंधारात बसून पिक्चर पाहिल्यावर पिक्चर सुटल्यावर पुन्हा रणरणत्या उन्हात बाहेर पडलं की सगळं जग वेगळंच वाटायचं, इतकं त्या स्वप्निल दुनियेत हरवायला व्हायचं.
हिरॉईन श्रीमंत असली की हिरो गरीब असणार हे ठरलेलं असायचं. हिरोची आई त्याकाळचा एकमेव महिला गृहोद्योग म्हणजे शिलाई मशिनवर कपडे शिवून चार पोरांचा बाप शोभेल अशा हिरोला पोसत असायची. मशीन पण पायानी चालणारं नाही तर हातानी हँडल मारून चालणारं. हिरॉईनचा बाप, “खानदानकी इज्जत मिट्टीमे मिला दी” आणि “ये रिश्ता कभी नही हो सकता” हे वाक्य म्हणण्यासाठीच असायचा. पण मग हिरोच्या आईला पाहिल्यावर त्याला तिची कहानी आठवायची जी आईने हिरोपासून लपवून ठेवलेली असायची. त्यात असं निघायचं की हिरो सुद्धा मोठ्या मिलमालकाचा मुलगा असतो पण काही कारणास्तव त्याची करारी आई त्याला घेऊन एकटीच रहात असते. मग हिरोचा बाप पण येतो. मग तो “फीर मै ये रिश्ता पक्का समझू”? हा जगप्रसिद्ध डायलॉग होतो.. मग आनंदी आनंद गडे.
हिरोला डोक्यावर मार बसलेला असतो. तो बेशुद्ध असतो. कुठलंच औषध काम करत नसतं. डॉक्टर वरील डायलॉग फेकून पिक्चर सोडून गेलेला असतो. कारण त्याचा तेवढाच रोल असतो. मग हिरोईन किंवा हिरोची मॉ मरता पेशंट सोडून कुठल्यातरी आडबाजूच्या डोंगरावरच्या देवाचे पाय धरायला जायच्या. त्यांचा देव म्हणजे ‘शिवजी’. त्याची भल्ली मोठी मूर्ती असलेलं ते मंदिर असतं. सर्व सामान्य जनतेला अशी शिवजींची मूर्ती असलेलं मंदिर कधी कुठे आढळणार नाही. आपल्यासाठी पिंडच असते. त्या तिथे कशा पोहोचायच्या वगैरे फालतू प्रश्न प्रेक्षकांना पडायचे नाहीत. त्या तिकडे घंटा बडवतात, मोठमोठ्याने गाणी गात त्या देवाला आळवतात की इकडे मरता पेशंट उठून बसायचा. पण कधी त्याची याददाश्त जायची तर कधी दृष्टीच जायची. मग त्याच्यासाठी हिरॉईनचा त्याग, हिरोने हिरॉईनच्या आयुष्याचं वाटोळं होऊ नये म्हणून तिला विसरण्याचा नाटक करणं, आणि अचानक एखादा पहिलेसारखाच हादसा होऊन त्याची दृष्टी किंवा याददाश्त परत येणं. आणि मग पुन्हा आनंदी आनंद गडे..
हिरे पळवापळवीचे प्रकार पण ब-याच पिक्चर्समधे असायचे. अशा पिक्चर मधे हिरो म्हणजे सूपर हिरो असायचा. अगदी चालत्या आगगाडीच्या टपावरची मारामारी म्हणू नका, हेलीकॉप्टरला लटकून जाणं म्हणू नका, बोटीतून पाठलाग म्हणू नका, हिरोला सगळं येतं. दिव्याच्या खांबाला टेकून उभी असलेली बिन स्टँडची सायकल काढून टांग मारावी इतक्या सहजतेने हिरो हेलीकॉप्टर उडवतो. अगदी पेशावर गुंडांची टोळी सुद्धा हिरो एकटाच गारद करत असे.
सरसर डोळ्यासमोर जुने पिक्चरचे ट्रेलर दाखवल्यागत…..
अमरावतीत अख्ख कुटुंब तर कधी घरातली फक्त लेडीज मंडळी शाम टाॅकीज व प्रभात टाॅकीज मधे मागल्या बाकड्यावरून बसून सिनेमा बघितलेल्या आठवणी ताज्या झाल्या….