परवाची रात्र मी कधीच विसरू शकणार नाहीये. कधीच नाही. ‘गहराईयॉं’ सिनेमाच्या शेवटच्या काही मिनिटात माझा श्वास कोंडला होता. मी देखील आता फार क्षण टिकाव धरू शकणार नाहीये याची जाणीव झाली होती. सिनेमातल्या अलिशाच्या आणि माझ्या भावावस्थेचे काय करायचे हे मला खरच कळत नव्हते. तेव्हाही नाही अन आताही. न आवरता येणारा हुंदका फार प्यूअर असतो. मी तो गिळायला शिकलो त्याच दिवशी माझ्यातला विशुद्धपणा संपलेला. हे आज काय विपरीत. ग़नीमत ये है की उस रात मैंने कुछ लिखा नहीं. रात्र सगळं बघत असते. एकूणएक सिक्रेट तिला माहीत. त्यामुळे रात्री लिहिताना बोलताना सांभाळून राहण्यात अर्थ नसतो. रात्र त्या फिल्मबद्दल कमी आणि तुमच्याबद्दल जास्त सांगते. मी दम धरला. आणि पुढच्याच क्षणी सिनेमातला सगळ्यात सुंदर सीन समोर आला. दीपिका आणि नसीरुद्दीन शाह यांच्यातील संवाद. ह्या बाईचं पुढच्या क्षणी काय होणार हे कुणालाही माहीत नाहीये. कधीनव्हे ते बापाच्या शेजारी बसून हतबलपणे म्हणते, ‘I dont have the strength.’ बाप तिच्या मनगटाला धरून म्हणतो, ‘Oh come on, its right here.’ सिनेमातील पात्रात त्याच्या अवकाशात तुम्ही स्वतःला बघायला लागतात, तृप्तीची घाणेरडी ढेकर द्यायला लागतात आणि आपला जबडा वासलेला असतानाच दिग्दर्शक शकुन बत्रा आपल्या भाकीतक्षमतेची सुरळी करून तोंडात कोंबतो. पक्षाघाताचा झटका याहून वेगळा असतो का? नसावा.
खामोश सा अफसाना
पानी से लिखा होता
ना तुमने कहा होता
ना हमने सुना होता
गुलज़ारचा ‘लिबास’ बघितलेली ह्या जगात फक्त मूठभर लोक आहेत. माझ्या सुदैवाने मी त्यात नाही. पण मी ती कथा आणि स्क्रिप्ट वाचली आहे. त्या कथेचा शेवट त्रासदायक. आणि स्क्रिप्टचा त्याहून जास्त. बायकोने प्रियकरासाठी नवऱ्याला सोडून दिल्याची गोष्ट. आणि त्याच्या मागेपुढे येणारं सर्वकाही. नवरा सुधीर – नसीरुद्दीन शाह. त्याचं ‘गहराईयॉं’ मधलं पात्र बघितल्यावर थबकलो. नियती कसले भिकार योगायोग जुळवून आणते.. नाही!
विवाहबाह्य प्रेम, संबंध, व्यभिचार, बाहेरख्यालीपणा ह्या सगळ्यासाठी इंग्लिशमध्ये फार क्युट शब्द आहे. Adultery. ह्या थीमभोवती फिरणाऱ्या फिल्मला आउटराइट मोडीत काढणे नवीन नाही. एखाद्याला ‘गहराइयां’ अजिबात नाही आवडला तरी ते पूर्णपणे समजू शकतो. नात्यातील व्यामिश्रता, संदिग्धता आणि गुंतागुंत ह्याकडे बघण्याचा एकरेषीय मार्ग कसा असेल. ‘गहराइयां’चं ट्रेलर बघून ‘अजून एक विवाहबाह्य संबंधांना ग्लोरिफाय करणारा’ सिनेमा ह्या टॅगलाईन खाली टीका होऊ लागली. सिनेमा पाहिल्यानंतर काहींना त्यातली असंगतता, अतार्किकता बोचू लागली. तेही अगदीच समजू शकतो. Lucky you! आंतरिक वास्तव दाखवताना मला फिल्मच्या, लिखाणाच्या कुबड्या लागतात हा माझा विकनेस. टोकाच्या निखळ सुखाइतकचं त्याच तीव्रतेच दुःख मला कायम फॅसिनेटिंग वाटत आलय. गोष्ट पराभूतांची आणि पराभूततेची असेल तर त्यासारखं ओढून घेणारं काही नाही. प्रेमातील, नात्यातील अरेषीयत्व अमान्य केल्यास गोष्टी किती सोप्या होतात ना. सत्यांना भिडण्याची उर्मी हरवून गेलेली असते. ‘गहराइयां’ची पटकथा कोल्ड ब्लडेड जीवघेणी ठरतेय कारण हे अरेषीयत्व मान्य करून देखील भूतकाळाचा ‘लूप’ ती तोडत नाही. 40 वर्षांपूर्वी ‘अर्थ’ मध्ये शबाना आज़मीने तिच्या नवऱ्याला एक प्रश्न विचारला होता, ‘जो कुछ तुमने मेरे साथ किया, अगर वही मै तुम्हारे साथ करती, और अगर इसी तरह लौट के आती, तो क्या तुम मुझे वापस अपना लेते? The mother of all questions. अजूनही ह्या प्रश्नाचं उत्तर देताना कचरायला होतं. ‘गहराइयां’ त्यापुढे जाऊन एकापाठोपाठ एक अशी प्रश्न विचारतोय, ज्याची उत्तरं शोधण्याची हिम्मत उरल्यासुरल्या आयुष्यात होणार नाहीये. एक महत्वाच्या प्रसंगात अलिशा आपल्या बापाला विचारते, ‘Do my choices even matter papa?’
‘गहराईयॉं’ चं ट्रेलर फसवं आहे. सिनेमा बघताना, तो ज्या प्रकारे 3 वेगवेगळ्या जॉनरमध्ये शिफ्ट होत शेवटाकडे त्याला अपेक्षित असलेल्या ठिकाणीच नेऊन सोडतो ते चकित करणारं आहे. आपण जेवढं जगलोय तेवढ्यावरच छातीठोकपणे ब्लाइंड गेम खेळतो. समोरचा सराईत तीन पत्ती खेळणारा आपल्याला शो करायला लावतो तेव्हा आधी अंदाज बांधलेल्या एक्स्ट्रा मॅरीटल अफेअरच्या संगती शिवाय काहीही नसतं. गुलज़ार त्यांच्या त्रिवेणी मध्ये पहिल्या दोन ओळींपुढे तिसरी ओळ अशी अनवट जोडतात की ती तिसरी ओळ तुम्हाला पूर्णपणे वेगळ्या स्पेस मध्ये फेकून देते. आपण पहिल्या ओळींच्या अर्थाभोवती घुटमळत असतो, आणि तोवर आपल्या जजमेंटल भाकीतक्षमतेला त्यांनी गरागरा फिरवलेलं असतं. तिसरी ओळ आल्याशिवाय त्यातला नादावर्त कसा असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकत नाही. प्रेमाची संहती अतिप्रचंड किचकट असते. शहाण्या माणसाने खुशाल त्याचे अर्थ लावावे, प्रेमाच्या व्याख्या सांगाव्या. मी असा शहाणा प्रयत्न एकदा केला होता. ‘मॅरेज स्टोरी’मध्ये सुरुवातीच्या एका दृश्यात निकोल आणि चार्ली दोघांनी एकमेकांसाठी लिहिलेली पत्रं थेरपिस्ट समोर वाचून दाखवतात. एकेक शब्द म्हणजे काळजात खुपसलेली सुई. ते बघताना मला प्रश्न पडला – एवढं प्रेम तर आहे, फक्त एकमेकांच्या हातात ती पत्रं पडायला हवी. हे कधीच वेगळे होऊ शकत नाही. प्रेमात पडायला एकच कारण पुरेसं असावं. वेगळं होण्यासाठी अनेक कारणं अपुरी पडावी. पण गोष्टी अशा वर्कआऊट होत नाही हे कळायला थोडा वेळ लागला. पण तेही असोच आता. इथेच रमायला नको.
‘गहराईयॉं’ची मला सगळ्यात आवडलेली अजून एक गोष्ट ही की त्यात संवेदनांना महत्वाचे स्थान असून देखील तो संवेदनामध्ये रमत नाहीये. एकत्रितरित्या त्याचा परिणाम पूर्णपणे वेगळा आहे. शकुन बत्राला अर्थशून्यतेचा अर्थ सांगण्याची अपेक्षा आहे. इथे अर्थ केवळ आमिष आहे. अर्थशून्यता साध्य. किंवा तेही नाही. कधीही न संपणारी फरफट तेवढीच काय ती शाश्वत. तो एकेक पत्ता शो करत आपल्या झिंझोट्या धरून त्या निळ्या समुदात बुडवतो तेव्हा बऱ्याच वेळा मला फिल्म डोमेस्टिक हॉरर म्हणून वर्क झाली. बरं त्याचा शेवट इतक्या वेगवेगळ्या शक्यतांचा आहे कि त्याला केवळ ‘Domestic noir’ पुरतं मर्यादित करता येणार नाही. खऱ्या आयुष्याइतकाच सिनेमा सुद्धा असा तसा कसाही असू शकतो हा विश्वास ज्यांना आहे त्यांना कळेल की आपण लपवू पाहत असलेल्या कुठल्या गोष्टींना शकुन बत्रा मायक्रोस्कोपीक व्ह्यू लावून दाखवतोय. तुमच्यातला पुरुष, प्रियकर, प्रेयसी न कोसळले तरच नवल. भूतकाळाचे साखळदंड तुम्ही किती सहज फेकून देऊ शकतात यावर हे कोसळणं आणि फिल्म आवडणं-नावडणं अवलंबून आहे.
‘…I feel so stuck.’
‘गहराईयॉं’ मध्ये सुरुवातीच्या काही सेकंदात पुढील कथानकाचं सार एका छोट्याश्या फ्लॅशबॅक दृश्यात दिसतं. छोटी अलिशा अंगात स्वेटर घालण्याचा प्रयत्न करतेय पण ते गळ्यात चेहेऱ्यावर अडकून तिला श्वास घ्यायला त्रास होतोय. ही गुदमरल्याची भावना तिला पुढे आयुष्याला सोबत पुरणार आहे. बालपणीच्या घटनांचा आघात, माणूस म्हणून जडणघडण होण्यात त्यांचा वाटा आणि त्याविरुद्ध लढताना होणारी घुसमट याचा अंडरकरंट संपूर्ण सिनेमात जाणवत राहतो. असं असलं तरी त्यातल्या पात्रांबद्दल सहानुभूती वाटणं फार अवघड आहे. सिनेमात कॅरेक्टर्स मध्ये स्वतःला पाहण्याची सवय असेल तर ही सहानुभूती तुमच्याही वाट्याला येणार नाही. केरेक्टर्स जी आपल्यासारखी अर्धवट आहेत. flawed. स्वार्थी. रिलेशनशिप बाहेर जाऊन प्रेमात पडणारा जितका स्वार्थी, तितकाच स्वार्थी तिथे शेवटपर्यंत कमिटेड असणारा. असल्या नात्यात येणारे अनुभव स्थल-काल-व्यक्ति-परिस्थिती-निरपेक्ष असतात. पण भूतकाळातील एखादी घटना आपल्या अस्तित्वाचा ताबा घेते तेव्हा त्यातले टप्पे समान असू शकतात. ‘Are we just messed up people? Maybe, we are.’ – ‘गहराईयॉं’ ह्याच नोटला अंडरलाईन करताना ‘Adultery’ भोवती गोष्ट फिरत असल्याचा संभ्रम निर्माण करतो जो केवळ मास्टरस्ट्रोक आहे.
‘Maybe if we let go of the past, But it will let go of us too?’
That’s the million dollar question, isn’t it?
पण सांगितलं ना, सिनेमा पाहिल्यानंतर अलिशाच्या आणि माझ्या भावावस्थेचे काय करायचे हे मला खरंच कळत नव्हते. तेव्हाही नाही अन आताही. डिरेक्टरला काहीही का दाखवायचे असेना. बघणा बघणा-याने स्वतःला detatch कसं करावं. अडीच तासांच्या सिनेमाने आयुष्यभर दिलेलं दुखणं justifiable नाही वाटते आता. प्रेमाचा सिनेमा, सिनेमातलं प्रेम, प्रेमात घुसलेला सिनेमा याचं व्यवस्थित वर्गीकरण करता यायला हवं. पण तेही असोच. ‘कभी अलविदा ना कहना’ जर ‘A love…that broke all relationships’ बद्दल असेल तर ‘गहराईयॉं’ त्यापुढे एक पाऊल टाकतोय, A love…that broke all of your ideologies on Love-loss-life-identity. and still force you to glue together the broken pieces of the person you love. मला वाटतं ही मोठी अचिव्हमेन्ट आहे.
चार्ल्स बुकोस्की म्हणतो,- Find what you love and let it kill you. Let it drain from you your all. Let it cling onto your back and weigh you down into eventual nothingness. Let it kill you, and let it devour your remains. For all things will kill you, both slowly and fastly, but it’s much better to be killed by a lover. तू मर्ज़ है दवा भी, तू लौ भी है हवा भी. आलं लक्षात मला कशाने बरं वाटेल ते! अव्या किती मागे लागलेला, एक पेंटिंग बनवून दे. ‘लिबास’ सिनेमावर बेतलेलं. लिबास आठवल्यावर तुझ्या डोळयासमोर ज्या इमेजरी येईल अगदी तसच चित्र. तो जिवंत असेपर्यंत तर काही जमलं नाही. आता येतंय चित्र समोर… ‘गहराईयां’ बद्दल अजून खरडण्यापेक्षा ते पेंटिंग पूर्ण करावं… त्याने दिलेल्या कलरने किती काही उतरवून झालं. लिबास सोडून. तुमने साहिल हो पहले बिछाया होता… आता पेन ठेवून पुन्हा ब्रश हातात घ्यायला हवा. But do my choices even matter?
(लेखकनामवंतब्लॉगरवस्तंभलेखकआहेत)
9689940118
हे सुद्धा नक्की वाचा-गहराईयॉं: आंखों के इस तुफॉं को पी जा, आहों के बादल थाम ले!https://bit.ly/34z6Zvl