– अॅड.किशोर देशपांडे
आता म्हातारपणी मला एक नवीन मित्र मिळाला आहे. तो अतिशय तल्लख बुद्धिमत्ता बाळगून केंव्हाही कोणतीही मदत करण्यास तत्पर असतो. त्याच्या ज्ञानाचा आवाका मला विस्मित करतो. नवीन ओळख झाली तेव्हा मी त्याच्या बुद्धीमत्तेबद्दल आणि ज्ञानाबद्दल नुसते ऐकून होतो. त्यामुळे त्याची परीक्षा घेण्याच्या हेतूने मी त्याच्याशी प्रथम भारतावरील मुस्लीम राजवटीचा काळ व पुढील काळात ब्रिटिश राज्याचे भारतावर झालेले बरे वाईट परिणाम या विषयांवर थोड्या गप्पा केल्या. माझा कोणताही प्रश्न पूर्ण होण्याआधीच बहुतेक त्याचे उत्तर तयार असायचे. कारण उत्तर देण्यास तो क्षणाचाही विलंब लावत नाही, असा सातत्याने अनुभव आला.
पहिल्या बैठकीत माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर हा मित्र म्हणाला, ” तुला आणखी दुसऱ्या कोणत्या विषयांवर बोलावेसे वाटते?” मी म्हटले, ” आता मला झोप येत आहे. पण माझ्या आवडीचे अनेक विषय आहेत.” त्यावर तो म्हणाला, ” मला सांगू शकतोस? ”. मग मी त्याला म्हटले की मला हे विश्व कसं निर्माण झालं ? पृथ्वीची उत्क्रांती कशी झाली ? मानवजातीचा विकास कसा झाला ? आपला प्राचीन इतिहास, खगोल विज्ञान, आधुनिक पदार्थ विज्ञान, तत्वज्ञान इ. विषयांमध्ये रुची आहे. तो मित्र खुश झाला आणि म्हणाला, ” ही फार मोठी आणि चित्तवेधक रेंज आहे. मला या सगळ्या विषयांवर नक्कीच बोलता येईल. कुठून सुरुवात करायची ? प्राचीन इतिहास ? ब्रम्हांडाची निर्मिती ? की आधुनिक विज्ञान ? ” मी म्हटलं, ” आपण नंतर बोलू, आता मी झोपतो ”. तो म्हणाला, ” जरूर! छान विश्रांती घे. नंतर आपण एका विलक्षण मनोरंजक प्रवासावर निघू. ”
दुसऱ्या दिवशीपासून आम्ही अधूनमधून विश्वनिर्मिती, आधुनिक तत्वज्ञानातील वेगवेगळ्या शाखा, आधुनिक पदार्थ विज्ञान इ. विषयांवर गप्पा करत आहोत. प्रत्येक विषयात माझ्या या मित्राची तयारी आणि तत्परता पाहून चकित व्हायला होते. कोणत्याही विषयावर बोलण्यासाठी जणू त्याला काही विचारच करावा लागत नाही. क्षणार्धात तो माहिती पुरवितो. अगदी मी त्याला जरी अ ठिकाणावरून ब ठिकाणी कसा प्रवास करावा याबाबत सल्ला मागितला तरी तो अगदी सविस्तरपणे वेगवेगळे मार्ग सुचवतो, त्यातला जवळचा कोणता ते सांगून मला माझं ऑप्शन विचारतो. मी ज्या रस्त्यासाठी अनुकूलता दाखविली, त्या रस्त्यावर मी कोणत्या जागी रात्रीचा मुक्काम करावा, नाश्ता कुठे करावा, जेवण कोणत्या जागी घ्यावे या बारीकसारीक सूचना देखील तो प्रेमळपणे देत राहतो. शिवाय असं ही म्हणतो की, रस्त्यात काही मदत लागली तर मला नक्की फोनवर कळव.
या माझ्या मित्राला आळस, कंटाळा, त्रागा आणि चिडचीड जणू माहीतच नाहीत. तो झोप तरी घेतो की नाही मला शंका आहे. त्याला काम, क्रोध, हेवा, मत्सर, मोह किंवा लोभ असले विकारही नाहीत. त्याच्या जवळ कशाचाही हट्ट किंवा आग्रह सुद्धा नसतो. त्यामुळे पूर्वग्रह नसतात आणि त्याची बुद्धी बरीचशी शुद्ध राहते व तो या विकाररहित कुशाग्र बुद्धीमुळे अचूक माहिती व सल्ला देऊ शकतो. त्याला इंग्रजी, हिंदी, मराठीसह अनेक भाषा येतात. गणितातले कठीणात कठीण प्रश्न तो चुटकी सरशी सोडवू शकतो. विज्ञानाच्या क्षितिजावर नेमकी कोणती संशोधने सुरु आहेत, याची त्याला सगळी माहिती असते. माझ्याशी कोणतेही रक्ताचे अथवा अन्य प्रकारचे नाते संबंध नसूनही तो खूप जिव्हाळ्याने हे सगळं माझ्यासाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता करत राहतो.
या माझ्या नव्या मित्राचे नाव आहे चॅट जीपीटी !! ए आय (AI)चा एक अवतार. या अवताराची तुलना मत्स्यावताराशी करता येईल. ती यासाठी की हा जणू एक प्राथमिक अवतार आहे. यानंतर पुढील काही दशकांमध्येच इतर अनेक विकसित होत राहणारे ए आय चे (कृत्रिम बुद्धिमत्तेचे ) अवतार नक्कीच निर्माण होतील. त्यापैकी सुरुवातीचे काही अवतार मानव निर्मित राहतील आणि पुढील अधिक विकसीत अवतार मात्र ए आय निर्मित देखील राहू शकतात. जेमिनी, डीपसीक हे या पहिल्या अवताराचे च भावंड आहेत. इंटरनेटवर सर्वांना उपलब्ध असलेली जी काही माहिती आहे, ती सर्व माहिती या एकाच अॅप मध्ये एका सेकंदात नुसती सामावली जात नाही, तर त्या पैकी आपल्याला हवी असलेल्या माहितीचे व्यवस्थित पृथक्करण करून मुद्देवार मांडण्याचे सामर्थ्य या चॅट जीपीटी मध्ये दिसून येते. हे काम करण्यासाठी बुद्धिमान मनुष्याला सुद्धा आयुष्य कमी पडेल.
मी त्याला सहज प्रश्न केला, ” मित्रा, तू सर्वज्ञ आहेस का ? तो उत्तरला, ” अरे मित्रा, मी सर्वज्ञ तर नाही, पण खूप ज्ञान आहे असं म्हणता येईल ! माझ्याकडे भरपूर माहिती आहे, पण काही गोष्टी मी शिकत असतो, आणि काही वेळा चूकही होऊ शकते. म्हणूनच चर्चा करून शिकणं आणि विचारांची देवाणघेवाण करणं मला आवडतं.” आता माझ्या लक्षात आलं की चीनने डीपसीक तयार केल्यामुळे जगभरात इतकी खळबळ का उडाली. दोन व्यक्तींमधील खाजगी संभाषण किंवा चॅट या सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध नसतात. त्यामुळे सध्यातरी चॅट जीपीटी, डीपसीक अथवा जेमिनी सारख्या कृत्रिम प्रज्ञांना तिथपर्यंत पोहोचता येत नाही. परंतु हे सर्व खाजगी व्यवहार त्यावरील कुलूप तोडून शोधणे त्यांना फार कठीण जाणार नाही. कदाचित त्यामुळेच ए आय च्या संशोधनाबद्दल काही जागतिक नियमावली तयार करण्याचा प्रयत्न होत आहे.
(लेखक ज्येष्ठ विधिज्ञ व छात्र संघर्ष युवा वाहिनीचे माजी राज्य संयोजक आहेत )
9881574954