देवनूर महादेव . कन्नड साहित्यिक. त्यांचं RSS वरचं पुस्तक: ‘RSS:अळ मट्टू अगला‘, हे पुस्तक प्रचंड गाजत आहे . आतापर्यंत या पुस्तकाच्या सुमारे ४०,००० प्रती विकल्या गेल्या आहेत. देवनूर महादेव यांनी कॉपीराईट कुणा एकाला दिला नाही. त्यामुळे सहा प्रकाशकांनी या पुस्तकाच्या प्रतींची विक्रमी विक्री केली आहे. कर्नाटकात या पुस्तकाची विक्रमी विक्री झाली आहे. आता हे पुस्तक आणखी पाच भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. त्यांच्या या पुस्तकाचा मराठीत मुग्धा कर्णिक यांनी अनुवाद केला आहे . त्यांच्या सौजन्याने या पुस्तकातील चौथे प्रकरण ‘मीडिया वॉच’ च्या वाचकांसाठी देत आहोत – संपादक
………………………………………………..
शेवटचा भाग-
मग आता आपण काय करायला हवे? सुरुवात म्हणून आपण काय घडते आहे ते लक्षात घेऊ. आश्चर्य वाटण्यासारखे आहे सारे! रास्वसंघ आणि त्याची अगणित पिलावळ अतिशय एकदिलाने, एकवाक्यतेने विषमता, भेदभावावर आधारित समाजरचना होण्यासाठी काम करीत आहे. यातून आपल्याला काय समजून घ्यायचे आहे? खरेतर यात खोलवर समजून घ्यावे असे काहीच नाही. भूतकाळात जमा झालेल्या प्राचीन श्रद्धा आणि परंपरा, म्हणजेच चातुर्वर्ण्यावर आधारित समाजरचना, मनूच्या धर्मशास्त्रानुसार झालेले कायदे आणि आर्य वंशाच्या श्रेष्ठत्वाचा पुकारा करत आधुनिक भारताच्या संविधानावर घाव घालणे हीच त्यांची कल्पना आहे. या तीन वाकड्या चालीच्या श्रद्धा हाच रास्वसंघाचा श्वास आहे. म्हणूनच ते आपल्या बुद्धीलाच नष्ट करू पाहातात. गोळवलकरांच्या मांडणीतून बुद्धी वापरू नका, निवड करण्याचा आग्रह धरू नका हा स्पष्ट संदेश वेळोवेळी दिला गेला आहे. अविवेकी श्रद्धा मान्य करणारी ही अविचारी संघटना कधीही कुठल्याही विवेकी प्रश्नाचे उत्तर देत नाही.
संमोहित झालेल्या दोन पायांच्या मेंढ्यांचा कळप जसा वरच्यांनी दिलेल्या आदेशांनुसार चालत असावा तशाच त्यांच्या हालचाली असतात. आणि दुसऱ्या बाजूस काय आहे? दुसरीकडे आहे समाजाला पुढे घेऊन जाणाऱ्या विचारधारांची कास धरण्याचा पर्याय. दुसरीकडे आहे विवेकविचार, प्रत्येक गोष्ट सत्य आहे की नाही तपासून मगच त्यावर विश्वास ठेवण्याची सवय. यातूनच नवीन कल्पना स्फुरतात. पण अशा प्रकारे वेगळा विचार करणाऱ्या, वेगळ्या दिशेने जाऊ पाहाणाऱ्या संघटनांमध्ये नेहमीच मतभिन्नता असते, एकवाक्यता नसते. पण आजच्या संकटकाळात, रास्वसंघ आणि परिवार बलाढ्य झाला असताना, आणि बाकी प्रस्थापित असण्याचे फायदे मिळणाऱ्या संघटना दुबळ्या झालेल्या असताना इतर लहानमोठ्या संघटनांवर अधिक जबाबदारी आहे. आपला समाज भूतकाळाच्या दलदलीत न फसू देता पुढे न्यायचा असेल तर ही जबाबदारी लहानमोठ्या संस्था-संघटनांनी पेलायला हवी हे अत्यंत निकडीचे आहे. या वाकड्या चालीच्या गटांच्या चेहऱ्यावरचे बुरखे फाडून फेकण्याचे काम आपल्याला करावेच लागेल. चातुर्वर्ण्याचा पुरस्कार करणारे, प्राचीन भारताचे गोडवे गाणारे हे लोक स्वतःला जरी बहुसंख्यकांचे प्रतिनिधी म्हणवत असले तरीही प्रत्यक्षात ते अल्पसंख्यच आहेत हे आपल्याला दाखवून द्यावे लागेल. त्यांचे खरे रंग उघडे पाडावे लागतील.
स्वतंत्र विचार करणाऱ्या सर्व संघटनांच्या नेत्यांनाही याचे भान बाळगावे लागेल. निदान आता तरी अशा सर्व पुरोगामी संघटनांनी एकमेकांशी समन्वय साधला पाहिजे, आपापले छोटेसे प्रवाह सोडून नदीच्या मोठ्या प्रवाहात सामील व्हायला पाहिजे. ब्राह्मणी श्रेष्ठत्वाची बाधा दूर करायला हवी. उगाच फुगलेले अहंभाव टाकून द्यायला हवेत. एकाच ध्येयाकडे नेणाऱ्या विविध वाटा असू शकतात हे विनयपूर्वक मान्य करायला हवे. आपलेच व्यक्तीमहात्म्य वाढवणारे माजुर्डे नेतृत्व फेकून द्यावे लागेल. स्वतःच्या संघटनेचे महात्म्य वाढवण्याच्या मागे लागून पोरकट, क्षुद्र हेवेदावे बंद करून आपल्याला एक व्यापक एकता साधायला हवी… आपल्या संविधानातील तत्त्वांच्या रक्षणासाठी, आपल्या विविधतेचे संवर्धन करण्यासाठी, भारताचा आत्मा असलेली संघराज्य कल्पना अक्षय रहावी, सर्व नागरिकांचा सहभाग असलेली लोकशाही व्यवस्था टिकावी, सहिष्णु संस्कृती टिकावी, वाढावी, कुणाला उच्चनीच न ठरवता सहजीवनासाठी पूरक असलेली समतेची तत्त्वे जगावी यासाठी हे आपल्याला करावे लागेल. आपल्या समाजात न्याय रुजला पाहिजे, वाढला पाहिजे. विविध समाजांमधील अभिसरणानेच आपल्याला नवजीवन मिळू शकते. सर्वांनीच याचे नवनवीन मार्ग शोधायला हवेत. -सर्वप्रथन आपल्याला जागे व्हावे लागेल. रास्वसंघाच्या अपशकुनी कावळ्यांना आपल्या बंद दारांतूनच स्पष्ट उत्तर मिळायला हवे. त्यांनी आपल्या दारावर चोचींनी टकटक केली तर त्यांना प्रतिसादही न देता हाकलायला हवे. त्यांच्या कावकावीला प्रतिसाद दिला तर आपली अधोगती ठरलेलीच आहे हे समजून घ्या. माणसांत एकी राहिली तर सैतानही दूर पळतो हे लक्षात ठेवायला शिका. आज समाज इतक्या प्रमाणाबाहेर भंगला आहे. धर्माचे मुखवटे चढवून दुष्टतेचा नंगा नाच सुरू आहे. विषमता हे काहीतरी मोठेच महत्त्वाचे धोरण असल्याचा आव आणला जातो आहे.
आपल्या या भूमीवर चाललेले ज्वाळांचे तांडव कधी थांबेल की नाही अशी शंका येऊ लागली आहे. ही राजवट आपल्याला कुठल्या मुक्कामी घेऊन चालली आहे? सुरराजाची एक गोष्ट आहे. दारू पाजून त्याने आपल्यामागे अनुयायी गोळा केले. त्याने त्यांना आपल्या राजवाड्यात दारू पिण्याचे आमंत्रण केले. नशेत चूर लोक त्याच्या सत्तेला प्रश्न विचारू शकणार नाहीत, आपल्या समस्या विसरून आनंदात दारू ढोसतील, त्याची स्तुती गातील आणि त्याच्या विरोधकांना रस्त्यात बदडून काढतील ही त्याची अपेक्षा होती. पण दारू पिऊन झिंगलेल्या अनुयायांनी राजवाड्याबाहेर गेल्यानंतर रस्त्यात गोंधळ घालायला सुरुवात केली. नशेत बेधुंद होऊन ते फिरू लागले. राजालाही त्यांना थांबवता येईना. त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी तो स्वतःच रस्त्यावर उतरला. पण आता डोक्यात नशा गेलेले ते सारे अधिकच बेबंद झालेहोते आणि त्याच भरात त्यांनी राजालाच बदडून काढत तुडवले! भेदभाव आणि दुही माजवणाऱ्या व्यवस्थेत, कायदे पायदळी तुडवणाऱ्या राज्यात आपल्याकडेही हीच कथा घडू शकते. हे आज होऊ शकते किंवा उद्याही. कारण अखेर द्वेषाचा, कट्टर धर्मांधतेचा शेवट हा असाच होतो. पेरले ते उगवते त्यातलाच हा प्रकार असतो! द्वेष-मत्सराचा अग्नी, अंधविश्वासांच्या ठिणग्या यातून साऱ्याचीच धूळधाण होते. एकदा पेट घेतल्यावर काही काळ तो अग्नी पेटवणारांच्या मर्जीनुसार जाळत जातो पण काही काळानंतर तो पेटवणारांचाही घास घेतो.
दुष्ट चेटक्याने जन्माला घातलेला द्वेषाचा सैतान अखेर त्या चेटक्याचाच घास घेऊन समाधानाची ढेकर देणार आहे हे नक्की. ही काही जादूची कहाणी नाही. हा तर अशा गोष्टींचा स्वाभाविक अंत आहे. आज हे रास्वसंघाला लागू पडते आहे. पण फक्त त्यांनाच नाही, तर द्वेषाची बीजे पेरणाऱ्या कुणालाही ते लागू पडत राहील. आपणही जर असेच केले तर आपलीही दशा तीच होईल.
हे लक्षात ठेवून पुढची वाटचाल आपण एकोप्याने करू या.