आदिवासी संस्कृती आणि लोकसंस्कृती यातील आंतरसंबंध

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२१

मुकुंद कुळे

महाराष्ट्रातील ठाणे-पालघर जिल्ह्यातील वारली आदिवासी समाज आणि इतर ग्रामीण समाज यांतील भौगोलिक अंतर कमी झाल्याने आंतरसंपर्क वाढून एक मोठा सांस्कृतिक बदल घडून आलाय. आजवर वारली आदिवासी समाजात संपूर्ण लग्नप्रक्रिया ही महिलांच्या ताब्यात होती. लग्नासाठी झोपड्यांच्या भिंती शेणा-मातीने रंगवून त्यावर चौक नावाचं चित्र काढणं, हे महिलांचं काम होतं. या चौक चित्रांतूनच आजची प्रसिद्ध वारली चित्रकला उन्नत पावली आहे. त्याप्रमाणेच या वारली आदिवासींमध्ये आताआतापर्यंत लग्नविधी या महिला करायच्या आणि महिलाच मंगलाष्टकं म्हणायच्या. विशेष म्हणजे हे विधी करणार्‍या महिला या विधवा असायच्या आणि त्यांना धवलरी असं संबोधन होतं. या अर्थाने वारली समाजातील विधवांनी लग्न लावण्याची ही परंपरा क्रांतिकारीच म्हणायला हवी.

00000000000000000000000000

इंग्रजीतील ‘कल्चर’ या शब्दासाठी आपल्याकडे ‘संस्कृती’ हे संबोधन वापरलं जातं. मात्र, संस्कृती म्हणजे नेमकं काय, ते थेट अधोरेखित करणं किंवा निर्दिष्ट करणं कठीण आहे. कारण, संस्कृती म्हणजे एकच एक गोष्ट नव्हे, जी विशिष्ट कृतीने दाखवता येईल. तरीही, संस्कृतीच्या आजवर अनेक व्याख्या केल्या गेल्या आहेत. त्यापैकी पाश्चात्य मानवशास्त्रज्ञ सर एडवर्ड बेर्नेट टायलर यांनी 1872 मध्ये केलेली एक व्याख्या अतिशय महत्त्वाची आहे. आपल्या ‘प्रिमिटिव्ह कल्चर’ या ग्रंथाच्या सुरुवातीलाच ‘संस्कृती’ या शब्दाची व्याख्या करताना ते म्हणतात- ‘विशाल अशा मानववंशीय-भौगोलिक दृष्टिकोनातून पाहिल्यास ज्ञान, धर्मविश्वास, कला, नीती, कायदे, आचार, आणि मानवाने समाजाचा सदस्य म्हणून जे संस्कार व सवयी आत्मसात केलेल्या असतात, त्या सगळ्याचा परिपाक म्हणजे संस्कृती ऊर्फ सभ्यता होय.’

लिंटन नावाचा पाश्चात्य समाजशास्त्रज्ञ म्हणतो की – ‘संस्कृती म्हणजे सामाजिक अनुवांशिकता.’ तर, ‘सामाजिक परंपरेचे सामग्र्य म्हणजे संस्कृती,’ असं लोई म्हणतो. संस्कृतीला अनेकांनी असं शब्दांत पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी, संस्कृती बहुतेकांच्या हातून निसटलेलीच आहे, असं मला व्यक्तिशः वाटतं. कारण, संस्कृतीला व्याख्येच्या चिमटीत बसवणं खरंतर कठीण आहे. त्याअर्थाने ती फसवी गोष्ट आहे. तरीही प्रसिद्ध भारतीय आणि त्यातही महाराष्ट्रातील प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ डॉ.इरावती कर्वे यांनी केलेली संस्कृतीची व्याख्या अधिक लक्षणीय आहे, असं मला वाटतं. संस्कृतीची व्याख्या करताना त्या म्हणतात – ‘मनुष्य समाजाची डोळ्यांना दिसणारी भौतिक वस्तुरूप निर्मिती व डोळ्यांना न दिसणारी, पण विचारांना आकलन होणारी मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृती होय.’ मनोमय संस्कृती वस्तुरूप निर्मितीमुळे दृढरूप व दृढमूल होते आणि मनोमय संस्कृतीचे ज्ञान अथवा कल्पना आल्याशिवाय द्रव्यरूप संस्कृतीचे कार्यच कळणार नाही. संस्कृती नेहमी परंपरागत व म्हणून दिक्काल निर्बंधित अशी असते. संस्कृती समाजाची असते. व्यक्तींमध्ये संस्कृती साकारते, जिवंत होते, नव्याने निर्माण होते किंवा लय पावते. पण, कोणतीही व्यक्ती कोणत्याही संस्कृतीचे स्वरूप पूर्णांशाने दाखवूच शकत नाही. संस्कृतीला व्यक्तिनिरपेक्ष असे एक निराळेच स्वतंत्र जीवन असते.

व्यक्ती जन्माला आल्यापासून एका परंपरागत वस्तुरूप संस्कृतीने वेढलेली असते व अव्यक्त पण दृढ सामाजिक परंपरेत गुरफटलेली असते. व्यक्तीच्या जीवन विकासाच्या मर्यादा या दोन अंगानी निश्चित केलेल्या असतात… याच अर्थाने संस्कृती म्हणजे एक जीवनशैली आहे, असं मला जाणीवपूर्वक म्हणावसं वाटतं, जी संपूर्ण मानवी जीवनाच्या जाणिवेत आणि नेणिवेत भिनलेली असते. ही जीवनशैली शिकवण्याची गरज नसते. जन्माला येणारं मूल आपाततः ही जीवनशैली आत्मसात करत जातं. इथे संस्कृती आणि संस्कार या दोन शब्दांतील भेद जाणीवपूर्वक लक्षात घेतले पाहिजेत. कारण, आपल्याकडील संस्कृती आणि संस्कार हे दोन्ही शब्द संस्कृतमधील ‘सम’ अधिक ‘कृ’ या एकाच धातूपासून बनलेले आहेत. मात्र, संस्कार हे मुद्दाम हेतुपुरस्सर केले जातात, तर संस्कृती कळत-नकळत अंगीकारली जाते. याअर्थाने जन्माला येणार्‍या प्रत्येक मनुष्यप्राण्याला संस्कृती असते, ती जन्मतःच त्याला चिकटते. मात्र, संस्कृती ही स्थळ-काळसापेक्ष नि समूहसापेक्ष असते. ती निरंतर प्रवाही आणि परिवर्तनशील असते. ती नित्यनूतन असते, परंतु त्याचवेळी ती आदिमही असते. कारण संस्कृती कितीही बदलली, तरी तिच्यातील आदिबंध कधीही नष्ट होत नाहीत. मग ती संस्कृती आदिवासींची आदिमसंस्कृती असो, अनागर जनांची लोकसंस्कृती असो किंवा आजची नागर, म्हणजे शहरी संस्कृती असो.

काळानुसार संस्कृती कितीही बदलली, तरी तिचे अंतःस्तर तसेच असतात. तसंच, या संस्कृती बदलतात म्हणजे काय, तर एकमेकांच्या प्रभावातून त्यांच्यात काही बदल होतात. हे बदल कधी वाईट असतात, तर कधी चांगले असतात. परंतु, विभिन्न संस्कृतींमध्ये ही देवाणघेवाण कायम चालत असते. आज आपल्याला इथे विचार करायचा आहे, तो प्रामुख्याने आदिवासीसंस्कृती आणि लोकसंस्कृती यांतील आंतरसंबंधांचा. तर, या दोन संस्कृतींमध्ये खरोखर काही संबंध आहे का किंवा त्यांच्यात काही परस्पर साहचर्य आहे का… तर निश्चितच आहे. मात्र, तो कसा आहे, ते जाणून घेण्यापूर्वी आदिवासीसंस्कृती आणि लोकसंस्कृती म्हणजे नेमकं काय, ते जाणून घेऊ या…

आदिवासी संस्कृती

आदिवासी संस्कृती म्हणजे, प्रागैतिहासिक काळातील आदिमानवाची आदिम संस्कृती. आज जरी आदिवासी समूह वेगवेगळ्या पाड्यांवर-तांड्यांवर स्थिर झालेले असले, तरी गाव आणि नगर या दोहोंपासून ते अद्याप काहीसे दूरच आहेत. दळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे आदिवासींचं दर्‍याखोर्‍यातील वास्तव्यस्थान आणि खेडी-शहरांतील अंतर कमी होत चाललेलं असलं, तरी त्यांच्यातील संस्कृतीत अजूनही महदंतर आहे. कारण, आदिवासी बांधवांची जीवनशैली आजही वेगळी, म्हणजे आदिम आहे. त्यांच्या जीवनधारणा आणि प्रेरणा दोन्ही वेगळ्या आहेत. विज्ञानाच्या प्रगतीमुळे सुधारलेली शहरं आणि त्यांच्या प्रभावातून बदलत चाललेल्या खेड्यांच्या पार्श्वभूमीवर आदिवासी समूह मात्र आजही बहुतांशी सृष्टीच्या निर्माणाच्या काळातील निसर्गघटितांवर विश्वास ठेवून आहेत. त्यांची संस्कृती म्हणजेच, जीवनशैली आजही पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. निसर्ग आणि निसर्गातील पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूतंच आजही त्यांच्या जगण्याच्या मुळाशी आहेत. त्यांचे सण-वार, रीती-उत्सव, कला सारं काही आजही निसर्गाधारित आहे. निसर्ग म्हणजेच प्रकृती, हीच त्यांच्या जगण्यामागची प्रेरणा आहे. या अर्थाने आदिवासी संस्कृती म्हणजे एकप्रकारे प्रकृती आहे, आदिवासींचं जगणं म्हणजे बहुतांशी आजही त्यांनी साजरा केलेला प्रकृतीचा उत्सव आहे.

निसर्गच त्यांच्या समोर असल्यामुळे निसर्गातील साधेसोपेपणा-मोकळेपणा आदिवासींच्या जीवनशैलीत आहेच. परंतु, त्याचबरोबर निसर्गातील जी गूढ कोडी उलगडलेली नाहीत, तीही त्यांच्या जगण्यात आणि कलांमध्ये प्रतिबिंबित झालेली आहेत. त्यांच्या चित्र-नृत्यादि कलांमध्ये किंवा रोजच्या जगण्यातील काही  विधि-परंपरांमध्ये जी सांकेतिकता आलेली आहे, ती यामुळेच. या सांकेतिकतेचा शोध घ्यायचा झाला, तर निसर्गाविषयी त्यांना वाटणार्‍या कुतूहल आणि भयाचा मागोवा घ्यावा लागतो. उदाहरण देऊन बोलायचं तर, आदिवासींच्या गावबांधणीच्या विधीचा देता येईल.

महाराष्ट्रात विदर्भातील गोंड-कोरकू-परधान या आदिवासी समाजात आपल्या पाड्या-तांड्यावर कुठलंही अरिष्ट येऊ नये म्हणून गावबांधणीचा विधी केला जातो. या गावबांधणीच्या दिवशी बाहेरच्या पाड्यावरचा माणूस आलेलाही चालत नाही. साधारणपणे दिवस मावळायला सुरुवात झाली की, या विधीला सुरुवात होते. पाड्यावरचे सगळेजण एकत्र जमतात. सगळी पुरुषमंडळी ‘खोड्याळ’ देवाच्या नावाने जो दगड असतो, त्याच्याजवळ जातात. मग पाड्यावरचा मांत्रिक मंत्र पुटपुटत देवाची ‘मनसणी’ करतो आणि सोबत आणलेल्या चार चिमण्या कापून त्यांचं रक्त त्या खोड्याळ देवाच्या दगडावर शिंपडतो. त्या रक्ताचा स्पर्श होताच, जमलेल्या पुरुषांपैकी कुणाच्या तरी अंगात देवाचं वारं शिरतं. मग त्या पुरुषाला साडी नेसवून त्याच्या चेहर्‍यावर खोड्याळ देवाचा मोठा लाकडी मुखवटा चढवला जातो आणि त्यानंतर मग भगत, म्हणजे मांत्रिक आणि देव यांच्यात गावाच्या भल्यासाठीची प्रश्नोत्तरं सुरू होतात.

विदर्भातील आदिवासींचा हा गावबांधणीचा विधी, म्हणजे सरळसरळ ‘यात्वा’त्मक विधी आहे. आदिम काळापासून देवतांच्या तुष्टीकरणासाठी लाल आणि काळा रंग वापरला जातो. आदिम अवस्थेत लाल रंगाचं ज्ञान नसल्यामुळे तेव्हा एखादा प्राणी कापून त्याचं रक्तच शिंपडलं जायचं. देवाला दोन पायाचं – चार पायाचं देण्याची प्रथाही त्यातूनच सुरू झालेली आहे. तसंच, पुरुषाच्या अंगात देव येऊनही त्याला साडी नेसवली जाते, कारण ऋतुस्रावाच्या काळात स्त्रीच्या शरीरातून बाहेर पडणार्‍या लाल-काळ्या स्रावामुळे तिच्या ठायी निसर्गप्रेरक अशी काहीतरी अद्भुत शक्ती आहे, अशी आदिम समाजाची भावना होती. त्या प्रेरक शक्तीचं प्रतीक म्हणून खोड्याळ देव अंगात येणार्‍या पुरुषाला साडी नेसवली जाते.

या आदिवासींच्या खोड्याळ देवाच्या मुखवट्याचीही कथा आहे. या मुखवट्यासाठी जे झाड तोडायचं, ते अमावस्या किंवा पौर्णिमेलाच तोडलं जातं. तसंच, जे झाड तोडायचं, त्या झाडाखाली नागाचं वारुळ असणं गरजेचं असतं. यामागेही आदिम ‘यात्वा’त्मक प्रेरणाच कार्यरत आहे. आदिम प्रेरणेने भूमीला स्त्रीतत्त्व आणि नागाला पुरुषतत्त्व, तसंच चैतन्याचं प्रतीक मानलं आहे. साहजिकच, मग हे चैतन्यतत्त्व वारुळातून झाडात आणि झाडातून मुखवट्यात प्रवाहित होतं, अशी गोंड-कोरकू आदिवासींची धारणा आहे. यातून आदिवासींच्या जगण्यामागे आजही आदिम काळातील प्रेरणा, म्हणजे लोकधर्म कार्यरत आहेत, हेच सिद्ध होतं.

आदिवासींचं अगदी नाच-गाणं घेतलं, तरी त्यात आपल्याला निसर्गतत्त्वच दिसतं. आदिवासींचं नृत्य तर मुळात निर्माणच निसर्गातून झालंय. निसर्गातील पशु-पक्ष्यांचा आवाज, नदी-नाल्यांचं खळाळत वाहाणं, या सार्‍यांत नादतत्त्व भरून राहिलेलं होतं. हे नादतत्त्व आदिमानवाला जाणवलं होतं, पण ते त्याला नीटपणे अभिव्यक्त करता आलं नव्हतं. पण, एका प्रसंगी आदिमानवाने आपल्याला झालेला आनंद सहज-स्वाभाविकपणे उड्या मारून साजरा केला. एक-दोनदा अशा उड्या मारल्यावर त्याच्या लक्षात आलं की, या उड्या मारण्यातही एक सुसंगती आहे, त्यातही एक ताल आहे, आणि मग तो कारणपरत्वे आनंद झाल्यावर विशिष्ट प्रकारे उड्या मारायला लागला. आधी एकाने उड्या मारल्या. मग दुसरा आला आणि नंतर बघता बघता सारेच त्या उड्या मारण्यात सामील झाले. सुरुवातीला प्रत्येकजण वाट्टेल तसा, कुठेही उड्या मारत होता. पण, असं वेड्यावाकड्या उड्या मारतानाच, त्यांनी कधी तरी फेर धरला. मग त्यांनाच त्या फेरातलं सौंदर्यतत्त्व जाणवलं नि त्यातूनच नृत्याचा जन्म झाला. अशाप्रकारे आनंद व्यक्त करण्याच्या गरजेतून नृत्याचा शोध लागला. पण, नृत्य तिथेच थांबलं नाही. आधी आदिमानवाने आनंद व्यक्त करण्यासाठी नृत्य केलं. मग त्याला शोक प्रकट करण्यासाठीही नृत्याची गरज भासली. आणि मग हळूहळू त्याला जगण्याच्या प्रत्येक वळणावर नृत्य-गाणं हवहवसं वाटू लागलं. कारण, हे नाच-गाणं म्हणजे निसर्गातील अद्भुत शक्तींना प्रसन्न करण्याचं एक साधन आहे, असं त्याला वाटू लागलं. म्हणून मग तो जंगलांतल्या वन्यशक्तींना प्रसन्न करण्यासाठी नाचू लागला, तसंच निसर्गाचा कोप होऊ नये, म्हणूनही नाचू लागला. मात्र, हे नाचगाणं करताना त्याने आपले ताल, आपले पदन्यास, आपल्या हस्तमुद्रा, सारं काही निसर्गातूनच उचललं. कारण, तेच त्याच्या रोजच्या सवयीचं होतं. विविध आदिवासी समूहात आजही आपल्याला पाहायला मिळणारी नृत्य कधी उग्रसुंदर भासतात, कधी ओबडधोबड वाटतात, ती यामुळेच. कारण निसर्गातला भव्यपणा, निसर्गातला साधेपणा, निसर्गातली सुंदरता आणि त्यातली क्रूरता सारं काही त्यांच्या नृत्यांत आलेलं आहे.

या नृत्यातील नैसर्गिक प्रतीकाचं उदाहरण म्हणून भिल आदिवासींच्या ‘डिंडण’ नृत्याकडे बघता येईल. महाराष्ट्रात भिल्ल समाजाची वस्ती धुळे-नंदुरबार परिसरात मोठ्या प्रमाणावर आहे. हा समाज होळीला ‘डिंडण नाच’ करतो. या नृत्यात भिल्ल पुरुष स्त्रीचा पेहराव करतात, तिची आभूषणं घालतात आणि मांदळ या ढोलासारख्याच वाद्याच्या साथीवर नाचतात. हे ‘डिंडण’ नृत्य म्हणजे धरतीच्या पूजेचाच एक भाग असल्याचं मानलं जातं. पुरुषांनी केलेली स्त्रीची वेशभूषा ही धरतीमातेशी प्रतीकात्मकता साधण्यासाठी केलेली असते. हा नाच म्हणजे, पुरुषांनी एकप्रकारे धरणीच्या स्त्रीत्वाचा  केलेला गौरव असतो.

या पद्धतीने नाच-गाणं असो किंवा रोजचं जगणं, आदिवासी सातत्याने निसर्गावलंबी राहिलेला आहे. या अर्थाने आदिवासी संस्कृती ही निसर्गसंस्कृती आहे आणि कालौघात त्यात काही बदल झालेले असले, तरी त्या बदलांच्या मुळाशी असलेले आदिबंध सारखेच आहेत.

लोकसंस्कृती

मानवी संस्कृतीचे तीन महत्त्वाचे टप्पे मानले जातात. पहिला टप्पा, उपजीविकेसाठी आदिम मानव भटकत असल्याचा, दुसरा टप्पा कृषिसंस्कृतीचा शोध लागून मानव एका जागी स्थिर झाल्याचा आणि तिसरा टप्पा म्हणजे आजचा, विज्ञानयुगाचा. पैकी पहिल्या टप्प्यात आदिम माणूस उपजीविकेसाठी सतत भटकत होता. टोळीने राहाणं आणि पोट भरण्यासाठी शिकार करत, जंगलं तुडवत हिंडणं हेच त्यांचं आयुष्य होतं. भूक मग ती पोटाची असो वा शरीराची, त्यात फार फरक नव्हता. या दोन्ही गोष्टी या आदिम समाजांसाठी सहजप्रेरणा होत्या. एक प्रकारचा मुक्ताविष्कार त्यांच्या जीवनशैलीत होता. किंबहुना जगण्या-वागण्यातलं स्वातंत्र्य, ही त्यांची संस्कृती होती. स्त्री-पुरुष भेदही तिथे नव्हता. झाडं-वेली, प्राण्यांप्रमाणेच मानव हाही तेव्हा निसर्गाचा आविष्कार होता.

मात्र, शिकारीसाठी रानावनात भटकणार्‍या या आदिम मानवसमूहांना एका टप्प्यावर शेतीचा शोध लागला आणि तो एका जागी स्थिर झाला. एकाच टापूत वस्ती करून राहू लागला. ही स्थिरावस्था आदिम मानवाला लाभली आणि तो अगदी सहज त्याच्या आधीच्या जीवनशैलीपासून तुटला. आता तो शेती करू लागला. शेतीसाठी आपापली माणसं जमा करू लागला. आपल्या कष्टाचं आपल्याकडेच राहावं, असं त्याला वाटू लागलं आणि त्यातून संपूर्ण मानवी जीवनाला व्यापणारी केवळ कृषिव्यवस्थाच नाही, तर कुटुंबव्यवस्था आणि लग्नसंस्थाही आकाराला आली. त्यातूनच जिथे जिथे वेगवेगळे समूह वस्ती करून राहिले, तिथे गावांची निर्मिती झाली. अर्थात, हे सगळे मूळचे आदिवासीच असले, तरी एकाच ठिकाणी वस्ती करून राहिल्यामुळे त्यांच्या जगण्याला एकप्रकारे सुरक्षितता-स्वस्थता लाभली, त्यांचं भटकणं थांबलं. परिणामी, त्यांचं जगणं, त्यांचे आचार-विचार, सण-उत्सव, नाच-गाणी यालाही एक वेगळं परिमाण लाभलं. आदिम अवस्थेतील माणूस कच्चे किंवा निव्वळ अग्नीत भाजलेलं मांस तसंच खायचा. परंतु, एकाच ठिकाणी वस्ती केल्यावर आणि विविध मसाले टाकून जेवण रांधायला लागल्यावर त्याला पदार्थांची चव कळली. आधी थेट वाहत्या नदीच्या पाण्यावर तहान भागवली जायची. आता पाणी भरण्यासाठी मडकी तयार होऊ लागली. नाच-गाणं निसर्गासारखं उन्मुक्त होतं, ते काहीसं बंदिस्त झालं. नृत्य-पदन्यासांना एक गोलाई आली, सुबकता आली. आदिम अवस्थेत जे-जे अनघड-अवघड होतं, ते अनागर म्हणजेच ग्रामजीवनात काहीसं सुघड-सुविहित झालं. मूळच्या आदिवासींमधूनच कालांतराने ही एकाच जागी स्थिर झालेली वैशिष्ट्यपूर्ण ग्रामसंस्कृती जन्माला आली.

 

या ग्रामसंस्कृतीला आणि अनागरांच्या जीवनशैलीलाच आज एकप्रकारे ‘लोकसंस्कृती’ मानण्याची पद्धत आहे. मात्र, अनागर संस्कृती म्हणजेच, सरसकट लोकसंस्कृती असं नाही. परंपरेचं अधिष्ठान असलेली आणि वैशिष्ट्यपूर्ण असलेली कुठलीही संस्कृती, ही लोकसंस्कृती असू शकते. तरीही अगदी वैदिक काळापासून या अनागर संस्कृतीलाच ‘लोकसंस्कृती’ मानण्याचा समज आहे आणि तो रूढही आहे. कारण, वैदिक काळातच वैदिक आणि वैदिकेतर असे भेद निर्माण झालेले होते. वैदिकेतरांना त्या काळी मुख्यतः ‘लोक’ या अभिधानाने सूचित केलं जात होतं. ‘वैदिक परंपरा’ ही एकप्रकारे अभिजनपरंपरा होती. तर, ‘लोकपरंपरा’ ही एकप्रकारे बहुजनांची परंपरा होती आणि हा फरक जीवनशैलीतील विशेषांमुळेच निर्माण झालेला होता. अभिजनांची कलासंस्कृती, आचार-विचार सारेच कालौघात उच्च, कुलीन आणि आदर्शवत् मानले गेले. तर, तुलनेने बहुजनांची संस्कृती ग्राम्य मानली गेली. कारण, तोपर्यंत शहर आणि खेडी असे भेदही निर्माण झाले होते. ही बहुजनांची संस्कृती आपल्या पारंपरिक धारणांना चिकटून बसली. या पारंपरिक धारणा काय होत्या? तर, जरी भटक्या आदिम अवस्थेतून हे समूह स्थिर अवस्थेत आले होते, तरी त्यांच्या जीवनशैलीमागच्या धारणा आणि प्रेरणा फार बदललेल्या नव्हत्या. हे ग्रामीण समूह थेट जंगलात राहात नसले, तरी त्यांचं जगणं निसर्गचक्रावरच अवलंबून असल्यामुळे ते निसर्गापासून फार लांब गेले नाहीत. फरक प्रामुख्याने पडला तो प्रतिमा-प्रतीकांमध्ये. उदाहरणार्थ, आदिम अवस्थेत मानव निसर्गातील तत्त्वांना थेट त्यांच्या रूपात पूजत-भजत होता. चंद्र-सूर्य-झाडं-प्राणी हेच त्यांचे देव होते. त्यांचं रूपही निर्गुण-निराकार होतं. एकाच ठिकाणी स्थिर झाल्यावर मात्र मानवाने देवदेवतांनाही आकार दिले. निसर्गातल्या देवतांबरोबर ग्रामदेवतांचीही निर्मिती झाली. त्यांच्या नावाचे सण-उत्सव सुरू झाले. लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांचं यासंदर्भातील विवेचन पाहण्यासारखं आहे. त्या म्हणतात- ‘लोकसंस्कृतीत प्रतीकांची संपन्नता असते. आदिमानव पंचमहाभूतांना भजायचा, तो स्थिर झाल्यावर भिंतीवर-जमिनीवर रांगोळीने सूर्य-चंद्र रेखाटून त्यांची पूजा करू लागला. निसर्गातील देवतांना त्याने मूर्तिस्वरूप दिलं. एवढंच नाही, तर आपापल्या समाजात होऊन गेलेल्या लोकोत्तर व्यक्तीना त्याने पुतळ्यांच्या स्वरूपात भजायला सुरुवात केली आणि त्यांच्या नावाने यात्रा-जत्रा सुरू झाल्या.’ परंतु असं असलं, तरी जीवनशैलीचा मुख्य कणा निसर्ग आणि कृषिसंस्कृती हाच राहिल्याने त्या आधारेच या ग्रामीण स्थिर समूहांची जगण्याची एक वेगळी लोकशैली घडत गेली. कालांतराने या स्थिर समूहांची भौगोलिकतेनुसार वेगवेगळी जीवनशैलीही आकाराला गेली. परंतु, त्यामुळे लोकसंस्कृतीत विविधता आली. आज भारत वैविध्यपूर्ण लोकसंस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे तो त्यामुळेच आणि आज हीच नागर संस्कृतीशी फार संबंध न आलेली अनागर संस्कृती ‘लोकसंस्कृती’ म्हणून ओळखली जाते.

आदिवासी संस्कृती आणि लोकसंस्कृती यातील आंतरसंबंध

कुठलीही संस्कृती फार काळ इतर संस्कृतींपासून भिन्न राहू शकत नाही. जोपर्यंत दळणवळणांच्या साधनांनी जोडल्या जाऊन विविध संस्कृती एकत्र येत नाहीत, तोपर्यंतच त्यांचं वेगळेपण आणि भिन्नत्व टिकून राहातं. अन्यथा, एकमेकांच्या संपर्कात आल्यावर त्यांचा एकमेकांवर प्रभाव पडणं अगदी अपरिहार्य असतं. त्यातूनच त्यांचे आंतरसंबंध यायला सुरुवात होते आणि त्या प्रभावाचे वा आंतरसंबंधांचे काहीएक भलेबुरे परिणाम दोन्ही संस्कृतींवर होत असतात. आदिवासी संस्कृती काय, लोकसंस्कृती काय किंवा नागरसंस्कृती काय, या तीनही संस्कृतींकडे आणि त्यांच्या एकमेकांवरील प्रभावाकडे याच दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. अर्थात, या प्रभावाचे किंवा आंतरसंबंधांचे-संपर्काचेही तीन टप्पे असतात. पहिला टप्पा असतो, दोन संस्कृती एकदम जवळ आल्याचा. दुसरा टप्पा असतो दोन संस्कृती ठरावीक अंतरावर असल्याचा आणि तिसरा टप्पा असतो, दोन संस्कृतींमध्ये काहीच देवाणघेवाण नसल्याचा.

संस्कृतींच्या या तीन टप्प्यांची बाब उघड करून सांगायची तर, जिथे दळणवळणामुळे आदिवासींचा पाडा आणि लोकसंस्कृतीतलं गाव यातलं भौगिलिक अंतर नष्ट झालंय, तिथे आदिवासी आणि लोक या दोन्ही समूहांच्या संस्कृतीतला वैशिष्ट्यपूर्ण फरक वेगाने कमी होत गेलाय. कारण, इथे दोन संस्कृती थेट एकमेकींच्या संपर्कात आल्यात. जिथे हे भौगोलिक अंतर काही प्रमाणात कायम आहे, परंतु बाजारहाट किंवा यात्रा-जत्रांच्या निमित्ताने आदिवासी आणि लोक यांचा संपर्क येऊ लागलाय, तिथे या दोन्ही संस्कृतींची थोडी देवाणघेवाण झालेली दिसते. तर, जे आदिवासी पाडे डोंगरदर्‍यांत खोल आतवर आहेत किंवा असतात ते कुठल्याही बाह्य संस्कृतीपासून कायमच अलिप्त असतात, तिथे आजही फक्त त्यांची आदिवासी संस्कृतीच कायम आहे. बाह्य संस्कृतींच्या आक्रमणाने किंवा प्रभावाने त्यांची संस्कृती दूषित झालेली नाही.

आता तीन टप्प्यांवरील या संस्कृतींचे आंतरसंबंध नेमके कसे असतात, ते थेट उदाहरणांनी स्पष्ट करून घेऊ. महाराष्ट्रातील ठाणे-पालघर जिल्ह्यातील वारली आदिवासी समाज आणि इतर ग्रामीण समाज यांतील भौगोलिक अंतर प्रमाणाबाहेर कमी झाल्याने आंतरसंपर्क वाढून एक मोठा सांस्कृतिक बदल घडून आलाय. आजवर वारली आदिवासी समाजात संपूर्ण लग्नप्रक्रिया ही महिलांच्या ताब्यात होती. लग्नासाठी झोपड्यांच्या भिंती शेणा-मातीने रंगवून त्यावर ‘चौक’ नावाचं चित्र काढणं, हे महिलांचं काम होतं. या चौक चित्रांतूनच आजची प्रसिद्ध वारली चित्रकला उन्नत पावली आहे. त्याप्रमाणेच या वारली आदिवासींमध्ये आता-आतापर्यंत लग्नविधी या महिला करायच्या आणि महिलाच मंगलाष्टकं म्हणायच्या. विशेष म्हणजे, हे विधी करणार्‍या महिला या विधवा असायच्या आणि त्यांना ‘धवलरी’ असं संबोधन होतं. धवलरीचा अर्थ लग्नगीतं गाणार्‍या. इथे आणखी एक महत्त्वाची बाब अधोरेखित करायला हवी की, मराठीतील जे आदिकाव्य आहे, ते चक्रधरशिष्या असलेल्या ‘महदंबेचे धवळे’ म्हणजे लग्नगीतंच होती. या अर्थाने वारली समाजातील विधवांनी लग्न लावण्याची ही परंपरा क्रांतिकारीच म्हणायला हवी. किंबहुना स्त्री-पुरुष असा भेद नसल्यामुळे आणि आदिवासी समाज स्त्रीसत्ताक असल्यामुळे त्यांच्यासाठी ही सहज बाब होती. परंतु, ग्रामीण आणि नागर संस्कृतीच्या अतिसंपर्कात आल्यामुळे आता वारली आदिवासींची लग्नंही ब्राह्मण पुरोहित लावतो. एवढंच नाही, तर आता वारल्यांच्या लग्नाचेही फ्लेक्स लागायला लागले आहेत आणि काही लग्न हॉलमध्येही लागू लागलीत. म्हणजे, वारली आदिवासी समाजातील एक चांगली प्रथा बाह्य संस्कृतीच्या प्रभावामुळे जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

वारली आदिवासींमधील या लग्नाच्या एकाच उदाहरणात आपल्याला संस्कृतीचे तीन टप्पे सहज पाहता येतात. पहिल्या टप्प्यात जिथे आदिवासी आणि लोक-नागर यांच्यातील अंतर जवळजवळ नष्ट झालंय, तिथे आदिवासी संस्कृती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तिथे लग्नाचं चौकचित्रही काढलं जातंच, असं नाही. मधल्या, म्हणजे दुसर्‍या टप्प्यात वारली आदिवासींमध्ये घराच्या भिंतीवर चौकचित्र काढलं जातं, परंतु लोक-नागर संस्कृतीच्या प्रभावातून या चौकातून त्यांचा हिमायदेव किंवा कणसरीमाता गायब होऊन त्याची जागा वैदिकांच्या गणपतीने घेतली आहे. तिसर्‍या टप्प्यात, म्हणजे जिथे दर्‍याखोर्‍यातील वारली आदिवासींचा गाव अथवा नागरजनांशी काही संबंध आलेला नाही, तिथे मात्र आजही शेणा-मातीने भिंत सारवून त्यावर महिला चौकचित्र काढतात आणि धवळर्‍याच आजही लग्न लावतात.

आदिवासी, लोक किंवा नागर संस्कृतीतील आंतरसंबंध हे असे तीन टप्प्यांशी संलग्न असतात. कुठे ते कमी असतात, तर कुठे अधिक. हे संबंध कायम केवळ कृती-उक्तीरूपच असतात, असं नाही. अनेकदा ते आचार-विचारांच्या रूपानेही येतात. किंवा कधीकधी हेतुपुरस्सरही उच्चवर्णीयांकडून लादले जातात. आदिवासी समाज केवळ निसर्गप्रतीकांना पूजत असतानाही काही वर्षांपूर्वी गुजरातमधील डांग जिल्ह्यातील आदिवासींना शबरीचा दाखला देऊन राम-लक्ष्मणाच्या प्रतिमा वाटण्यात आल्या होत्या.

म्हणजे, आदिवासी किंवा लोकनागर संस्कृतींचा हा एकमेकांवरील प्रभाव केवळ सांस्कृतिक स्वरूपाचा नाही, तर राजकीय-सामाजिक आणि धार्मिक स्वारूपाचाही असतो. मात्र, या परस्पर देवाणघेवाणीत किंवा आंतरसंबंधांत अनेकदा सुधारित संस्कृतीच आपलं काही निम्न संस्कृतीवर लादत असते आणि त्यातून मुख्यतः निम्न संस्कृतीच दूषित होण्याचा संभव असतो….तेव्हा आदिवासी संस्कृती आणि लोकसंस्कृतीतील आंतरसंबंध काय किंवा कुठल्याही दोन संस्कृतींमधील काय, ते येत असतात. त्यांच्यात देवाणघेवाण होतच असते. मात्र, बहुतांशी पातळीवर ही देवाणघेवाण किंवा हे आंतरसंबंध निम्न स्तरातील संस्कृतीला संपवणारेच असतात…

——————

(लेखक लोकसाहित्य लोकसंस्कृतीचे अभ्यास आहेत.)

9769982424

Previous articleविधिमंडळ अधिवेशन नव्हे  ,  नुसताच कल्ला !
Next articleबस्तरची वैशिष्ट्यपूर्ण आदिवासी संस्कृती
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here