तुम्ही महागड्या गाड्या उडवता, कोट्यवधी रुपयांचा एका रात्रीत चुराडा करता, छातीवरचं निप्पल सोडून बाकीचा सगळा ऐवज वाऱ्याला सोडता, खालची दीड इंचाची चिपटी आणि हगायचं भोक सोडून बाकी सगळं प्रदर्शनाला मांडता, म्हणून तुम्ही आधुनिक? मग तुम्ही अनाथाश्रमातून मूल का आणत नाही? तेव्हा कुठे जातो तुमचा आधुनिकपणा?
*******
शीर्षकात लिहिलाय तो माझा सरोगसीबद्दलचा नेहमीचा विचार आहे. अर्थात, त्याला काही अपवाद असतातच. पण ‘मीडिया वॉच’च्या २०२२ दिवाळी अंकात या विषयाबद्दल असलेला परिसंवाद बघून पुन्हा एकदा माझ्या डोक्यात हा विचार आला. होय, ‘बघून’च! मी त्यातला एकही लेख वाचला नाही. कारण त्यामुळे माझ्या डोक्यात जे आहेत त्यावर कदाचित परिणाम झाला असता, ते मला नको होतं. त्या परिसंवादात सहभागी झालेल्या सगळ्या लेखिका नामचीन आहेत, विद्वान आहेत! त्यामानाने मी फारच नगण्य आहे. अगदी साधी संवाद लेखक आहे, तीही मराठी मालिकांची. पण मी ‘साधी’ असले तरी ‘सामान्य’ नाही याची नम्र जाणीव मला आहे. प्रत्येक वैद्यकीय प्रश्नामागे विज्ञान असतं. ते सोडून चालणार नसतं.. पण त्यातल्या अनेक प्रश्नांना सामाजिक बाजू पण असते, तिकडे दुर्लक्ष करून पण चालणार नसतेच!
माझ्या घरी धुणीभांडी करायला एक बाई येते. तिचा पगार मला परवडतो, म्हणून मी तिला कामावर ठेवली आहे. स्वयंपाक करणाऱ्या, गाडी धुणारा, माझ्या घरचं पेस्ट कंट्रोल करणारे, या सगळ्यांना पैसे देणं मला परवडतं, म्हणून मी त्यांची सेवा घेते. तसं प्रियंका चोप्रासाठी, शाहरुख खानसाठी, सनी लिओनी आणि अशा अनेकांसाठी एखाद्या बाईचं गर्भाशय भाड्याने घेणं सोपं आहे, म्हणून सरोगसी. इतकं सोपं आहे ते, आणि छछोर ही! कारण ही फक्त माणसाची सेवा भाड्याने घेणं नाहीये, तिच्या शरीरातला एक भाग भाड्याने घेणं आहे. जी बाई वैद्यकीयदृष्ट्या गर्भ धारण करू शकत नाही आणि जिला आधीची मुलंच नाहीएत त्यांना मी संशयाचा फायदा देईन, पण ‘संशयाचा’च! कारण भारतभरच्या अनाथाश्रमात अनाथ मुलांची अक्षरश: गर्दी आहे!
जे सरोगसीच्या माध्यमातून आई-बाप झाले आहेत, ती सगळी जोडपी श्रीमंत आहेत आणि आधुनिक आहेत. ‘आधुनिक’ या शब्दाचे विडंबन आहे हे. आधुनिकपणा आहे हा? तुम्हाला दुसरं, तिसरं मूल हवं, मान्य मला. तुम्ही सरोगसीमार्फत ते मिळवता, कारण तुम्ही श्रीमंत आहात, पण तेव्हा तुमचा आधुनिकपणा कुठे गेलेला असतो? तुम्हाला तुमचंच बीज आणि/किंवा एग हवं असतं. हा आधुनिकपणा आहे? हा छुपा वंशवाद नाहीये? का नको तुम्हाला अनाथाश्रमातलं मूल? ज्यांना आई-वडील नाहीत त्यांना उघड्यावर पडू द्यायचं आणि तुम्ही तिसऱ्या एका बाईचा गर्भाशय भाड्यावर घेऊन तुमच्या बीजाचे/तुमच्या शरीरातले अंडे वापरून आणखी एक मूल जगात आणायचे! कारण ते तुम्हाला आर्थिकदृष्ट्या परवडते आहे. हा अति पैशामुळे आलेला उद्दामपणा नाहीये का? तुम्ही महागड्या गाड्या उडवता, कोट्यवधी रुपयांचा एका रात्रीत चुराडा करता, छातीवरचं निप्पल सोडून बाकीचा सगळा ऐवज वाऱ्याला सोडता, खालची दीड इंचाची चिपटी आणि हगायचं भोक सोडून बाकी सगळं प्रदर्शनाला मांडता, म्हणून तुम्ही आधुनिक? मग तुम्ही अनाथाश्रमातून मूल का आणत नाही? तेव्हा कुठे जातो तुमचा आधुनिकपणा? सनी लिओनीने तिसरी मुलगी म्हणून black girl दत्तक घेतली आहे. तिची पहिली दोन्ही मुलं जर सरोगसीमार्फत झालेली असली तर हे ‘black girl दत्तक’ प्रकरण पण पब्लिसिटी स्टंट आहे.
आता मी अतिशय नाजूक विषयावर येते!
बाईचे करियर!!
मला अगदीच मान्य आहे हे. पण जर तुम्ही सुशिक्षित आणि आधुनिक आहात तर तुम्हाला विचारांची क्लॅरिटी नाही? तुमच्यासाठी करियर इतकं महत्त्वाचं आहे की त्यासाठी आधीचे नऊ महिने आणि नंतरचं ब्रेस्ट फीडिंग वगैरे तुम्हाला नको वाटतं तर मग कशाला हवंय ‘आईपण?’ ते इतकं महत्त्वाचं आहे? हा आधुनिक विचार आहे? स्त्रीचं स्त्रीत्व तिच्या मातृत्वाने सार्थक होतं, हा तर जुनाट विचार ना?? मला देखील तो जुनाटच वाटतो. शिवाय स्त्री म्हणून आई होतांना शरीरात होणारे नैसर्गिक बदलांचे टप्पे पण तुम्ही स्वीकारत नाही आहात.. तुमच्याकडे पैसा आहे म्हणून एक गरजू बाई तिच्या गर्भाशयात तुमचं मूल वाढवणार आणि तुम्ही आई होणार! एवढं गरजेचं आहे मातृत्व? हा कुठला आधुनिकपणा? अरे पण हो, बाळंतपणानंतर काही दिवस का होईना, शरीराचा डौल बिघडतो, स्ट्रेच मार्क्स येतात, ते कसे आपल्याला चालतील? आपण प्रेक्षकांना आवडलं पाहिजे.. होय ना? मग तर तुम्ही स्वत:च स्वत:ला ‘मादी’ करून घेतलंय, नाही का? उपभोग्य मादी! हा आधुनिकपणा आहे का राणी?
कुठल्याही व्यवसायाला, कुठल्याही नात्याला जर तुम्ही तुमचा वेळ देऊ शकत नाही तर त्या व्यवसायाकडे आणि त्या नात्याकडे ही पाठ फिरवावी, हे जर तुम्हाला कळत नसेल तर गळ्यात लोढणी घेऊन धडपडत चालणारी बाई आणि तुम्ही, यात फरक तो काय? जेव्हा सरोगसी हा विषय आपल्याकडे नुकता आला होता तेव्हा मी या विषयावरची ‘अनुबंध’ ही झी टीव्हीवरची मालिका लिहिली होती. म्हणजे फक्त संवाद. साल २००९. (सई ताम्हणकरची पहिली मालिका) माझ्या स्वभावानुसार, फक्त संवाद लिहायचे असले तरी मी संबंधित विषयाचा अभ्यास, वाचन केलं होतं. मालिका असल्यामुळे त्यात सरोगेट आईच्या व्यथा-वेदना आणि सरोगसी करवून घेणाऱ्या स्त्रीची भावनिक घुसमट मांडली होती. आज मोठ्या श्रीमंत माणसांसाठी कुठली बाई सरोगसी करते हे आपल्याला कधीच कळत नाही.. पण राव, मन आहे ना आपल्याला? बाईच असते ना तीही? ती सुखासुखी तयार होत असेल का या गोष्टीसाठी? तिला भरपूर पैसा मिळत असेल, मान्य! पण जर पैसाच सबकुछ असेल तर तोच पैसा भरपूर प्रमाणात एखाद्या अनाथाश्रमाला देऊन तिथून का आणत नाही तुम्ही मूल? मी सांगते, असं तुम्ही करत नाही कारण तुम्ही आधुनिक नाही, तुमच्यात ‘आधुनिकपणा’ची फक्त लक्षणे आहेत. म्हणूनच तुम्हाला तुमच्या ‘अंड्यां/बीजाचे’ मूल हवे असते. जसं, बहुतेकजण ‘मी प्रेमात आहे’ या भावनेच्याच प्रेमात असतात, जन्मभर प्रेमाच्या लक्षणांभोवती फेर धरतात, फार कमी लोकांना ‘प्रेमात असणं’ म्हणजे नेमकं काय ते माहित असतं. तसंच आहे हे. अत्याधुनिक राहणी, आर्थिक स्थैर्यासाठी व्यवसाय/नोकरी करणं ही आधुनिकपणाची लक्षणे आहेत, आधुनिकपणा नाही. जे लोक खरोखर आधुनिक असतात, त्यांच्या डोक्यात सरोगसी हा विषयच येणार नाही.
माझ्या या लेखामुळे, ‘वैद्यकीयदृष्ट्या आई न होऊ शकणाऱ्या’ स्त्रीचा विषय देखील निकालात निघाला आहे. ज्या देशातल्या अनाथाश्रमांत बिन आई-बापाच्या बाळांची गर्दी आहे, त्या देशात सरोगसीचा विचारसुद्धा अमानवीय आहे. जे लोक खरोखर अज्ञानी आहेत, अशिक्षित आहेत, ते विनापत्य स्त्रीचा छळ करतात. त्यांना दत्तक आणि सरोगसी या दोन्हीशी काही घेणं नसतं. त्यांच्यासाठी शिक्षण आणि प्रबोधन हे दोनच मार्ग आहेत.. तो लांबचा वळसा आहे आणि मुख्य म्हणजे तो आजचा विषय नाही!
काही वर्षापूर्वीपर्यंत परदेशवारी हे मध्यमवर्गीय माणसाच्या टोपीला खोचलं जाणारं मोरपीस असायचं. आज ‘सरोगसी’ हे श्रीमंत माणसाच्या टोपीतलं मोरपीस झालेलं आहे. श्रीमंतांची तळी उचलण्यात आपल्या आयुष्याचे सार्थक मानणारे लोक त्यांचं कौतुक करतात. मला त्या लोकांबद्दल काहीही भाष्य करायचं नाही.. फक्त एका गोष्टीची मात्र भीती वाटते, श्रीमंतांची नक्कल करण्याच्या नादात उच्चमध्यमवर्गीय लोकांपर्यंत हे लोण पोचलं तर त्याचे परिणाम वाईट होतील. अनाथाश्रमात पोरक्या बाळांची गर्दी वाढत राहील हा भाग अलाहिदा!
(मिथिला सुभाष या नामवंत पटकथाकार व संवाद लेखिका आहेत)
(मिथिला सुभाष यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात – मिथिला सुभाष– type करा आणि Search वर क्लिक करा.)
जबरा लेख आहे..
धन्यवाद सोनाली.
डोळे उघडणारा परखड लेख
रोकठोक विचार