ॲरिस्टॉटलचे विज्ञान

-सुनील तांबे

चाबूक म्हणजे काय, चाबकाची व्याख्या करा, असे प्रश्न सॉक्रेटीस विचारत असे. अचूक व्याख्या करायची तर तर्कबुद्धि हवी. योग्य व अचूक विचार करण्याची पद्धत म्हणजे तर्क. अचूक व्याख्या कशी करायची? ॲरिस्टॉटलच्या मते व्याख्या दोन पायांवर उभी असते. ज्या वस्तूबद्दल आपण बोलत आहोत त्या वस्तुचा वर्ग वा कोटी निश्चित करणं ही पहिली पायरी. आणि त्या वर्ग वा कोटीपासून सदर वस्तुचं वेगळंपण मांडणं ही दुसरी पायरी. उदाहरणार्थ, माणूस हा विवेकशील प्राणी आहे, ह्या व्याखेमध्ये माणूस हा प्राणी आहे ही पहिली पायरी तर तो विवेकशील प्राणी आहे ही दुसरी पायरी.

तर्क हाती घेऊन ॲरिस्टॉटल आपल्या गुरुला- प्लेटोला आव्हान देतो. प्लेटोचा युटोपिया वा काल्पनिक जग किंवा प्लेटॉनिक जग तो उद्ध्वस्त करतो. वैश्विक म्हणजे काय? ज्या वस्तू वैश्विक आहेत त्यांच्या वर्ग वा कोटीसाठी वापरलं जाणारं हे एक सामान्य नाम आहे, उदाहरणार्थ प्राणी, माणूस, पुस्तक, झाड ह्या वस्तू वैश्विक आहेत. पण ही नामं आहेत. आपल्या बाहेर जे काही आहे ती प्रत्येक वस्तू स्वतंत्रपणे अस्तित्वात आहे. ती वैश्विक नाही. म्हणजे प्रत्येक घोडा, प्रत्येक वीट स्वतंत्रपणे अस्तित्वात असते. वैश्विक घोडा, वैश्विक माणूस, वैश्विक वीट असं काही नसतं. वैश्विक माणूस आपल्या कल्पनेत असतो, वास्तवात नसतो. म्हणजे माणूस वैश्विक असला तरी वैश्विक माणूस नावाची वस्तू वास्तवात नसते.

प्लेटोचं म्हणणं होतं ह्या जगातल्या ज्या सर्व वस्तू म्हणजे एका कालातीत जगातील वस्तुंच्या छाया वा प्रतिमा आहेत. कालातीत जग हे वास्तव जग आहे. प्लेटोचंं हे जग काल्पनिक आहे, वास्तविक नाही असं ॲरिस्टॉटलने अधोरेखित केलं. वास्तविक आणि नाममात्र असा भेद करून. हा भेद करण्याचं कौशल्य त्याने तर्काची मांडणी करून मिळवलं.

सॉक्रेटीस, प्लेटो,ॲरिस्टॉटल- http://bit.ly/2TezcyN

ग्रीक संस्कृतीमध्ये देव-देवता होत्या. त्यांना बळी देऊन प्रसन्न करून घेण्याची पद्धत होती. देव-देवता वा त्यानंतर प्लेटोची आयडिया वा आदितत्व किंवा कालातीत जग होतं. देव-देवता वा ईश्वर वा आयडिया वा आदितत्व केवळ केवळ विश्वाची निर्मिती करत नाही तर विश्वाचं नैतिक नियमनही करतं. नैसर्गिक विज्ञान आणि नैतिकता ह्या दोन्हींचा संबंध ईश्वराशी जोडण्यात आला होता. सॉक्रेटीसच्या आधीपासून ही परंपरा चालत आली होती. ह्या परंपरेला ॲरिस्टॉटलच्या तर्कशास्त्राने एक भक्कम आधार दिला.

ॲरिस्टॉटलचं भौतिकशास्त्र  (फिजिक्स) वस्तुतः तत्वमीमांसा (मेटाफिजिक्स) आहे. सूर्य विश्वाचं केंद्र ही पायथॉगोरियन कल्पना ॲरिस्टॉटलने धुडकावून लावली आणि पृथ्वीला विश्वाचं केंद्र बनवलं. सूर्याच्या उष्णतेने महासागर, नद्या, नाले कोरडे पडतात. त्यांच्या पाण्याचं बाष्पीभवन होतं. तेच पाणी ढगात गोळा होतं आणि पाऊस महासागर आणि नद्या-नाल्यांमध्ये हे पाणी टाकतो. या जलचक्रानुसार सर्व जग उत्पती आणि लयाच्या चक्रातून फिरत असतं. जिथे समुद्र आहे तिथे खडक दिसू लागतात जिथे पाणी आहे तिथे उजाड माळरान. ग्रीसमध्ये समुद्र जमिनीवर आक्रमण करतो तर ईजिप्तमध्ये जमीन समुद्राला जाऊन मिळते. विश्वातले हे बदल कधी अचानक होतात तर कधी सावकाश होतात. ज्याची उत्पत्ती होते त्याचा विनाश अटळ असतो. त्यामुळे अनेक संस्कृती लयाला जातात. पुन्हा निर्माण होतात. पुन्हा शेती, नौकानयन, व्यापार सुरू होतो. हे असं होतं कारण माणूस हा काही विश्वाचा निर्माता नाही आणि हे जग मानवकेंद्रीत नाही.

ॲरिस्टॉटलचं जीवशास्त्रही ह्या तत्वमीमांसेमधूनच स्फुरलेलं आहे. जगातील वस्तूंची उतरंड असते. निर्जीव वस्तू सर्वात खालच्या स्तरावर असतात, वनस्पती त्याच्यापेक्षा वरती, त्याही वर पशु, पक्षी आणि सर्वांच्या वर माणूस. पण सजीव आणि निर्जीव ह्यामध्ये भेद करणं कठीण आहे. पक्षी आणि सरपटणारे प्राणी ह्यांचा आकार एकच आहे, सस्तन प्राण्यांमध्ये माणसाचा समावेश होतो. चतुष्पाद आणि माणूस ह्यांच्यामध्ये कुठेतरी माकडाची जागा असली पाहीजे.

 जिवाच्या उत्पत्तीपासून त्याची वाढ जो पाहू शकतो त्यालाच जिवाचं खरंखुरं ज्ञान होतं, असं ॲरिस्टॉटलने लिहून ठेवलं आहे. म्हणूनच त्याला भ्रूण विज्ञानाचा जनक म्हटलं जातं. कोंबडीची अंडी फोडून जिवाच्या विविध अवस्थांची निरीक्षणं एका ग्रीक वैज्ञानिकाने नोंदवली होती. परंतु ॲरिस्टॉटल एक पाऊल पुढे गेला आणि त्याने ह्यासंबंधात एक विधान केलं. ॲरिस्टॉटलच्या आधी अनेक निरीक्षणं आणि अनुभवांची नोंद जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्रामध्ये करण्यात आली होती.  ॲरिस्टॉटलने सर्व निरीक्षणांची एक बौद्धिक व्यवस्था लावण्याचा—वर्गवारी, गुणधर्म इत्यादी, प्रयत्न केला आणि विज्ञानाचा पाया घातला.

(लेखक नामांकित पत्रकार व अभ्यासक आहेत)

9987063670 

हे सुद्धा नक्की वाचा-

फिलीप, ॲरिस्टॉटल आणि सिकंदरhttp://bit.ly/2TnNuxf

 

Previous articleवाद-प्रतिवाद :मनोरंजन क्षेत्रात मुख्य भूमिकेमध्ये ब्राह्मण मुलीच का दिसतात?
Next articleयात कुठे आला जातीयवाद ?
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here