गुरूदेव

-गजानन घोंगडे
नुकतीच सहावीची परीक्षा संपली होती आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणून मी तालुक्याला जिथे माझा थोरला भाऊ शिकत होता त्या गावी गेलो होतो. मी गेल्यावर दोन तीन दिवसांनी दादाचे ही पेपर संपले आणि त्या दिवशी संध्याकाळी आम्ही दोघांनाही तिथल्याच एका थेटरात ‘दोस्ताना’ पाहिला तिथून खरा माझा अमिताभ नावाच्या प्रकरणाशी दोस्ताना झाला. त्यातला अमिताभ खूप दिवसपर्यंत माझ्या डोक्यातून गेला नाही खरं तर त्यात शत्रुघ्न सिन्हाही होता पण अमिताभ जेवढा रुतला तेवढा तो काही रुतला नाही. तोच का आवडला त्याचं उत्तर नंतर उमगलं की त्यांच्या व्यक्तिमत्वात जे आहे ते इतर नटांमध्ये नाही कदाचित त्यालाच एक्स फॅक्टर म्हणत असावेत नंतर त्याच थिएटरमध्ये नसीब पाहिला, गावातल्या टूरिंग टॉकीज मध्ये अमर अकबर अँथनी पाहिला. पुढे काही वर्षांनी अकोल्यात आलो तेव्हा त्यांच्या उतरणीचा काळ सुरू झाला होता. कुली, मर्द सारख्या चित्रपटांचा तो काळ. त्यातल्या त्यात त्या काळातही त्याचे आखरी रास्ता, मै आझाद हूं, अग्निपथ सारखे चांगले सिनेमे आले पण खरा जो अमिताभ होता ‘अपुन ने मारा लेकिन सॉलिड मारा की नही’, ‘दारू पीने से लिव्हर खराब होता है’, ‘अगर मै टाइम पे नही आता ना तो आपका तो अब तक हो चुका होता’. असे डायलॉग मारणारा; ती मजा या सिनेमांमध्ये नव्हती. डॉन, अमर अकबर अँथनी, लावारिस, नसीब इत्यादी प्रसिद्ध सिनेमांच्या काळात मी खेड्यात राहत होतो हे सर्व सिनेमे मी री-रनला (पुनः प्रदर्शित) पाहिलेत त्या सिनेमांच्या प्रदर्शनाच्या काळात, त्या माहोलमध्ये पाहिले नाहीत याची मला कायम खंत आहे. तसा 78 साली मी अकोल्यात आलो होतो ताजा – ताजा डॉन लागला होता, पण माझ्या काकांनी मला डॉन न दाखवता बाजूच्या थिएटर मधला चार दिवस सासूचे छाप ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा दाखवला होता तेव्हाच डॉन दाखवून दिला असता तर आठव्या वर्षीच योग्य ते गुरु संस्कार होऊन गेले असते. मला अजूनही आठवतो तो रिगल थेटर वरचा झगमगाट, अमिताभ बच्चनचा धावताना कट आउट आणि जमलेली बंबाट गर्दी….
पुढे अमिताभ बच्चन बद्दल मिळेल ते वाचायला लागलो आणि पडदा व्यापून उरणाऱ्या अभिनेत्यातला संघर्षरत अमिताभ दिसला. अनेक व्याधींनी ग्रस्त असलेला हा माणूस ज्या पद्धतीने आज वयाच्या 77 व्या वर्षीही काम करतो आहे ते खरेच प्रेरणादायी आहे. अखंड आणि अथक काम करण्याची त्यांची क्षमता तोंडात बोट घालायला लावणारी आहे. आधीपासून असलेला अस्थमा सारखा आजार त्यात कुली चित्रपटाच्या वेळी झालेला जीवघेणा अपघात, लाखो लोकांमधून एखाद्यालाच होणारा मायस्थेनिया ग्रेव्हिस सारखा आजार, मणक्याचा टीबी, लिवर ऑपरेशन नंतर २५ टक्केच उरलेले लिवर, शूटिंग मध्ये झालेल्या जखमा, डाव्या खांद्या वरच्या गाठीच्या ऑपरेशनमध्ये चुकून कापला गेलेला डाव्या हाताचा महत्त्वाचा स्नायू ; ज्यामुळे डाव्या हाताच्या हालचालींवर आलेल्या मर्यादा, शूटिंग दरम्यान उडी मारल्यानंतर दुखावलेले खालचे दोन मणके ही शारीरिक दुखणी वगळता बोफोर्स मुळे झालेली बदनामी, चिखलफेक, ए. बी. सी. एल. मध्ये आलेला घाटा त्यातून वाजलेले दिवाळे या सगळ्यातून न थकता, न थांबता जिद्दीने कार्यरत असणाऱ्या बच्चन साहेबांना पाहिलं की अग्निपथावरचा प्रवासी हे एका वृत्तपत्राने त्यांना दिलेले शीर्षक अगदी समर्पक वाटतं. अमिताभ वाचता – वाचता त्यांच्या वडिलांशी थोर कवी हरिवंशराय बच्चन यांच्या कवितांशी ओळख झाली. त्यांच्या अनेक कविता या प्रेरणादायी आहेत. न थकता, न हारता एखाद्या लढवय्या सारखे आयुष्याला सामोरं जाण्याचा संदेश त्यांच्या कविता देत राहतात. अमिताभ कडे पाहतांना त्यांचे पालन पोषण इतर कशाहीपेक्षा हरिवंशराय बच्चन यांच्या कवितांनी केल्याचे जाणवत राहतं. अमिताभ चित्रपटात आले तेव्हा तत्कालीन नटाला लागणारा चेहरा, अंगकाठी यापैकी काहीही त्यांच्याजवळ नव्हतं. स्वतः अमिताभ यांना त्यांच्या लांब हाताबद्दल न्यूनगंड होता. त्यात डावा हात स्नायू कापल्यामुळे जास्त खाली झुकलेला परंतु आयुष्यातल्या प्रत्येक प्रतिकूलतेला अनुकूलतेने बदलण्याचं नाव अमिताभ बच्चन असावं. जास्त खाली असल्यामुळे डावा हात पॅन्टच्या खिशात घालून उजव्या हाताने हातवारे करत बोलणे किंवा हात जास्त लांब वाटू नये म्हणून कमरेवर हात ठेवून बोलणे या गोष्टी पुढे त्यांच्या स्टाईलमध्ये परावर्तित झाल्या. ताडमाड उंची, लांब टांगा यांचा उपयोग मारामारी करताना करून घेतला आणि आकाशवाणीने नाकारलेला आवाज जणू दोन तीन पिढ्यांच्या तरुणांचाच आवाज झाला. चेहऱ्यावर फुटकुळ्या आल्या मुळे डॉक्टरने दाढी करायला मनाई केली आणि त्यातून फ्रेंच कट दाढीवाला अमिताभ जन्माला आला. अमिताभ यांनी कुठलेही कपडे घालावे, कुठलीही स्टाईल करावी आणि अंगभूत प्रतिभेच्या बळावर आणि प्रभावी व्यक्तिमत्वाच्या जोरावर प्रेक्षकांनी ती आपलीशी करावी ही जणू प्रथाच पडली. अमिताभ यांच्या कारकीर्दीत मोलाचा वाटा असणाऱ्या, त्यांची अँग्री यंग मॅन ही प्रतिमा उभी करणाऱ्या लेखकद्वयी सलीम-जावेद मधले सलीम खान काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत म्हणाले, ‘मी ही सुरुवातीला नट व्हायलाच आलो होतो परंतु हे आपलं काम नाही हे लवकरच माझ्या लक्षात आलं. तुम्ही जी भूमिका साकारता त्यात तुम्ही सहजपणे विरघळून जायला हवात. अमिताभ बच्चनचं उदाहरण घ्या ते जेव्हा बंदूक हातात घेतात तेव्हा तो त्यांचा पूर्वापार व्यवसाय असल्यासारखे सहजतेने वावरतात हे भल्याभल्यांना जमत नाही’.
कामाप्रती असलेली निष्ठा, आवड, सतत मेहनत घेण्याची तयारी आणि वक्तशीरपणा यामुळे अमिताभ आज अमिताभ आहेत. मध्यंतरी केबीसीच्या शूटिंगच्या वेळी त्यांना प्रचंड पाठदुखीचा त्रास झाला. दिवसाला आठ दहा पेन किलर खाऊन ते काम करायचे. तपासणी केल्यानंतर त्यांना मणक्याचा टीबी झाल्याचं आढळून आलं पण इतक्या त्रासातही त्यांनी .केबीसीच संचालन नेहमीच्या खेळकरपणेच केलं. डॉन चित्रपटाच्या ‘खाई के पान बनारस वाला’ या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी त्यांच्या पायाच्या टाचेला गंभीर दुखापत झाली होती जमिनीवर पाय ठेवणे अशक्य होते तेव्हा टाचेत वेदनाशामक इंजेक्शन घेऊन त्यांनी शूटिंग पूर्ण केले. ‘इंकिलाब’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी दिवाळीमध्ये हातावर फटाक्यातील झाड फुटून डाव्या हातावरचे मास गळून गेले होते, हाडे उघडी पडली होती थोडीशी जरी हवा लागली तरी त्यांना वेदना असह्य व्हायच्या त्याही परिस्थितीत कधी हाताला फडके गुंडाळून तर कधी डावा हात खिशात ठेवून त्यांनी शूटिंग पूर्ण केलं. कुलीच्या अपघातानंतर उद्भवलेल्या मायस्थेनिया ग्रॅव्हीस या आजारात त्यांचे शरीर काम करणं बंद करत असे. गोळी घेतल्यानंतर आठ तास ते हालचाल करू लागत आणि गोळीची क्षमता संपली की ते उभेही राहू शकत नसत त्यांच्या सर्व अवयवांची हालचाल बंद पडत असे. करण जोहर ने एका मुलाखतीत सांगितले की अमिताभ यांच्या इतक्या गोळ्या जर तुम्हाला घ्याव्या लागल्या तर तुम्ही एक मेडिकल स्टोअर आरामात चालवू शकाल. त्याच अपघाता वेळच्या आजारपणात त्यांच्या पोटात अनेक नळ्या टाकाव्या लागत त्यासाठी त्यांच्या पोटावर तब्बल अठरा छिद्रे केली होती ते गमतीने आपल्या पोटाला गोलचा मैदान म्हणतात. ह्या सगळ्या त्रासांवर अमेरिकेत काही उपचार आहे का हे पाहण्यासाठी त्यांनी अमेरिकेतल्या एका आघाडीच्या डॉक्टरकडे आपली फाईल पाठवली आणि त्यावर त्यांचं मत मागवलं ती फाईल पाहिल्यानंतर डॉक्टर ने विचारलं की हा माणूस अजूनही जिवंत आहे का ? त्यावर हा माणूस केवळ जिवंत नसून अत्यंत व्यस्त दिनचर्या जगतो आहे हे ऐकल्यावर तो डॉक्टर बघतच राहिला.
हे सगळं वाचल्या नंतर
वृक्ष हों भले खड़े,
हों घने हों बड़े,
एक पत्र छाँह भी,
माँग मत, माँग मत, माँग मत,
अग्निपथ अग्निपथ अग्निपथ।
तू न थकेगा कभी,
तू न रुकेगा कभी,
तू न मुड़ेगा कभी,
कर शपथ, कर शपथ, कर शपथ,
अग्निपथ अग्निपथ अग्निपथ।
यह महान दृश्य है,
चल रहा मनुष्य है,
अश्रु स्वेद रक्त से,
लथपथ लथपथ लथपथ,
अग्निपथ अग्निपथ अग्निपथ।
ही कविता बाबूजींनी केवळ अमिताभ यांच्यासाठीच लिहील्यासारखं वाटतं. यातल्या सुरुवातीच्या ज्या ओळी आहेत,’एक पत्र भी छाँह मांग मत ‘ वाचल्यावर आठवतं की अमिताभ दिवाळखोरीत असताना धीरूभाईंनी त्यांचं कर्ज फिटेल इतके पैसे अनिल अंबानी च्या हाताने त्यांच्याकडे धाडले अमिताभ यांनी ते नम्रपणे नाकारत, दिवाळखोरी जाहीर करता येण्याजोगी परिस्थिती असताना प्रचंड मेहनत करून शंभर कोटींचे कर्ज फेडलं आणि पुन्हा नव्याने स्वतःला स्थापित केले.
आज त्यांच्या बरोबरीचे, त्यांच्यानंतरचे नट निष्क्रिय, निष्प्रभ होत असताना १०२ ‘नॉट आउट’, ‘बदला’, ‘चिनीकम’, ‘पा’, ‘पिकू’, ‘पिंक’ सारखे चित्रपट खास अमिताभ यांना नजरेसमोर ठेवून लिहिले जात आहेत. ७७ व्या वर्षी इतकी आजारपणं असताना तीस-चाळीस किलो वजनाचा कॉस्च्युम घालून ते ठग्स आॅफ हिंदुस्थान या चित्रपटात ॲक्शन करतात. हे सगळे त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि विजिगीषू वृत्ती दर्शवणारे आहे. ‘दुखणी कोणाला चुकली नाहीत त्यांचा बाऊ करत जगण्यापेक्षा त्यांना सोबत घेऊन आपण आपलं काम करत राहावं’ असं ते सांगतात तेव्हा, ‘हे सोबत कसं घ्यावं ते एकदा सांगा’ असं विचारावसं वाटतं.
अशा या प्रेरक व्यक्तिमत्वाला मी आम्ही व्यंगचित्रकार मंडळींनी त्यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या व्यंगचित्र प्रदर्शनाच्या निमित्ताने भेटलो यावर कधीकधी माझाच विश्वास बसत नाही. अनेक वर्षांपासून त्यांच्या भेटीसाठी तळमळणार्‍या मला व्यंगचित्र प्रदर्शना निमित्ताने त्यांना निवांत भेटता आले. लिफ्ट नसलेल्या एकशे चाळीस वर्षे जुन्या इमारतीत ते तीन मजले चढून आले. शांतपणे सर्वांना भेटले, अतिशय कौतुकाने सगळ्यांची व्यंगचित्रे पाहिली, माझ्या दालना पाशी आले असताना मी त्यांना वाकून नमस्कार केला तेव्हा, ‘ये मत किजीये’, असं म्हणत दोन्ही हातांनी माझे खांदे धरून त्यांनी मला उभं केलं. मी त्यांची केलेली, त्यांच्यावर केलेली व्यंगचित्र, स्केचेस त्यांनी आवर्जून पाहिली, त्यानंतर मी त्यांना त्यांचे चित्र, बाबूजींचे स्केच, बाबूजींच्या सुलेखन बद्ध कविता आणि त्यांच्या संवादाची ग्राफिटी असा सगळा ऐवज असलेल्ं पुस्तक भेट केलं ते घेऊन ते पुढे निघाले तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते देताना चा फोटो काढायचा राहिला आणि मी त्यांना हाक मारली, ‘सर किताब के साथ एक फोटो निकालने का यह गया’ त्यावर त्यांनी मागे वळून ‘अच्छा लाईए’ म्हणत पुस्तक हाती घेतले आणि छायाचित्रकारांना पोझ देत, नमस्कार करून ते निघाले. ते संपूर्ण प्रदर्शन पाहून गेल्यानंतर आम्ही सगळे व्यंगचित्रकार थोड्यावेळ संमोहित झाल्यासारखेच होतो ते भेटून जाताच मला एकदम जाणवलं ‘गजाननराव, अमिताभ को तो मिल लिए अब आगे क्या ? प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर एखादी इच्छा पूर्ण झाल्यानंतर जी पोकळी जाणवते ती मला जाणवली पण त्या मनस्थितीतून स्वतःला लगेच बाहेर काढत मी नॉर्मल झालो. प्रत्येकाला निघायचं होतं म्हणून सगळ्या व्यंगचित्रकार मित्रांचे ग्रुप फोटो घेणे सुरू झालं आणि तेवढ्यात एकाने मला सांगितलं की, बच्चन सर की ओर से आपके लिए फोन था,तर मला वाटलं कोणीतरी आपली खेचतंय पण थोड्या वेळाने पुन्हा त्याने सांगितलं की, सर के पीए ने फोन कर के आपके बारे मे पूछा है आणि लगेच फोन लावून दिला त्यानंतर पीए ने मी अमिताभ यांना दिलेल्या पुस्तकाच्या अजून प्रति मिळतील का म्हणून विचारले मी आश्चर्यचकित झालो त्यावर, ‘सरको आपकी किताब बहुत पसंद है उसकी और कॉपी भेजीये और जो भी बिल बनता है बताइये तो अकाउंट में डाल देंगे’, म्हणून सांगितलं. अकोल्यात पोहोचल्यावर दोन-तीन दिवसात मी दहा पुस्तकं तयार करून त्यांना पाठवली आणि पुन्हा आपल्या कामधंद्याला लागलो दहा बारा दिवसांनी अनपेक्षितपणे माझ्या कामाचं कौतुक करणारं अमिताभ बच्चन यांचं पत्र मला आलं. भेटी पेक्षाही जास्त आनंद त्यांच्या या अनपेक्षित पत्राने मला झाला आणि मला आठव्या वर्षी चुकलेला डॉन आठवला म्हटलं आठव्या वर्षी गुरू संस्कार झाले नाहीत पण ४१ वर्षांनी का होईना पत्राच्या रुपाने गुरुप्रसाद भेटला…!
(लेखक नामवंत व्यंगचित्रकार, कॅलिग्राफर व चित्रकार आहेत )
9823087650
Previous articleनिर्णय लकवाग्रस्त काँग्रेस !
Next articleफाळणीचा आरंभ
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

  1. श्रीमान गजाननराव घोंगडे ह्यांच्याकडे मी माझ्या कामानिमित्त गेलो असता त्यांनी मला पेढा भरवला, माझं तोंड गोड केलं. मला कळेना, की आज अकस्मात असं काय झालं? मी असा संभ्रमात असतांना घोंगड्यांनी हळूच एक लॅमीनेटेड पत्र टेबलाच्या कप्प्यातून बाहेर काढलं, पत्र मजसमोर ठेवलं, अस्खलित इंग्रजीतून लिहिलेलं ते पत्र वाचलं, शब्द न शब्दाचा अर्थ न कळला तरी भाव समजला, खाली चिरपरिचित सही पाहिली, त्या पत्राबद्दल घोंगडे सरांचं मनापासून अभिनंदन केलं, सर देखील भरभरून बोललेत – त्यांच्या, आपल्या अमिताभ सरांबद्दल. आज मीडिया वॉचमधील गुरुदेव हा सुंदर व अभ्यासपूर्ण लेख वाचताना ते पत्र, ते फोटो आणि गजानन घोंगडे डोळ्यासमोर पुन्हा उभे राहिलेत, आज असं वाटतंय की त्यादिवशी गजुभाऊ त्या टेबलाच्या खणातून नव्हे तर हृदयाच्या कप्प्यातून ते पत्र काढून मला दाखवत होते. गजानन घोंगडे ह्यांचे हार्दिक अभिनंदन आणि मीडिया वॉचला मनःपूर्वक धन्यवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here