चौथी औद्योगिक क्रांती : आव्हानांचा पूर्णपणे नव्याने विचार करण्याची गरज

 

– विजय तांबे , प्रदीप खेलूरकर

करोना प्रकरण लवकर संपेल असे दिसत नाही. काही महिन्यांनी सगळं सुरळीत झालं तरी लस येत नाही तोपर्यंत आपण सर्वजण भयग्रस्त राहणार आहोत. सारखे हात धुणार आहोत. मास्क लावणार आहोत. परस्परापासून अंतर राखण्याचा प्रयत्न करणार आहोत. बाजारात मिळणाऱ्या वस्तू निर्जंतुक आणि अस्पर्शित आहेत ना याची खात्री करणार आहोत. सध्या टीव्हीवर , आमच्या कारखान्यात सगळं कसं निर्जंतुक वातावरणात अंतर राखून काम केलं जातं याच्या जाहिराती सुरु झालेल्या आहेत. काही अर्थतज्ञ आणि तंत्रज्ञांच्या मते पुढील पंधरा वीस वर्षांनी येणारी चौथी औद्योगिक क्रांती उद्यापासून सुरु होउ शकते.  मोठ्या प्रमाणात स्थलांतर , कारखान्यात मनुष्य बळाचा अभाव,साथीची भीती या वातावरणात कारखाना चालवायचा असेल तर रोबोंशिवाय पर्याय नाही असा सूर आळविला जात आहे. आपण एका विचित्र स्थितीत सापडलेले आहोत. बाजारात वस्तुमालाला उठाव नाही कारण  खर्च करायला ग्राहकाकडे पैसे नाहीत. दुसरीकडे ऑटोमेशनचा आग्रह आणि  स्थलांतरामुळे मोडकळीस आलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर स्थलांतरीत मजुरांचा ताण पडलेला आहे. आपण सगळेच ही स्थिती विषण्णतेने हतबल होउन बघ्याच्या भूमिकेतून पहात आहोत.

चौथी औद्योगिक क्रांती किंवा आय. आर. फोर हे प्रथमच ऐकलं तेव्हा काहीतरी परदेशी खूळ असं झटकन वाटलं. मात्र जसजशी माहिती मिळू लागली तेव्हा ही मंडळी आपल्या उंबरठ्यावर उभी आहेत असं जाणवलं. वर्ल्ड  इकॉनॉमिक  फोरम ही चौथ्या औद्योगिक क्रांतीची प्रणेती. ‘ चौथी औद्योगिक क्रांती ‘ हे नाव ठसविण्याचे काम वर्ल्ड   इकॉनॉमिक  फोरमने केले. वर्ल्ड    इकॉनॉमिक  फोरमच्या दिल्ली ऑफीसच्या  उद्घाटनप्रसंगी आपले पंतप्रधान मोदी काय म्हणाले ते समर्पक आहे. ते म्हणाले की आय.आर.एक आणि दोनच्या वेळी आम्ही पारतंत्र्यात होतो. आय. आर. तीनच्या वेळी आम्ही समाजवादाच्या जोखडात होतो.आता आय. आर. फोरच्या काळात भारत जोमाने विकसित होत आहे. म्हणजे आपण चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी पायघड्या घालायचं काम करतोय.

चौथी औद्योगिक क्रांती असं म्हंटलं  की पहिल्या तीन कोण असा प्रश्न येणं स्वाभाविक आहे. या तीनही क्रांत्या गेल्या अडीचशे वर्षात झाल्या. १७८४ च्या आसपास पहिल्या औद्योगिक क्रांतीमध्ये वाफेचे इंजिन आणि तंत्रज्ञान यांच्या वापरातून उत्पादनाला वेग मिळाला. विजेचा शोध लागल्यावर खूप बदल झाले. वेगाने वस्तू निर्माण करण्यासाठी उत्पादन साखळ्या तयार झाल्या. ही दुसरी औद्योगिक क्रांती १९२३ च्या आसपास घडली. कालांतराने यामध्ये सातत्याने विकास आणि सुधारणा होत गेल्या. तिसऱ्या औद्योगिक क्रांतीची सुरवात साधारणपणे १९६९ च्या आसपास झाली. यामध्ये संगणकाचा वापर सुरु होउन क्रमाक्रमाने डिजिटलायझेशन आणि रोबोटिक्सपर्यंत येउन ठेपली. २०१४ साली वेगवान इंटरनेटने चौथ्या औद्योगिक क्रांतीची सुरवात झाली. त्या अनुषंगाने  क्लाउड तंत्रज्ञान, बिग डाटा अॅनालिटीक्स, ब्लॉक चेन तंत्रज्ञान यामध्ये प्रगती होत आहे. अॅप आणि वेब वर आधारीत बाजार वाढत आहे. तर दुसरीकडे तंत्रज्ञानात प्रच्छन्नपणे प्रगती होईल अशा शक्यता वर्तविल्या जात आहेत. तंत्रज्ञानाचा संबंध आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असल्याने आय. आर. फोर मधील तंत्रज्ञानाचे प्रातिनिधिक रूप म्हणून सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स ( ए. आय. ) म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता , थ्री डी प्रिंटर आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज ( आय.ओ.टी. ) हे आहेत. याबद्दल आपण थोडक्यात माहिती करून घेऊ.म्हणजे पुढे काय काय होउ शकते याचा आपण विचार करू शकतो.

कोणतेही यंत्र विचार करून निर्णय घेत असेल तर ते  ए. आय. आहे.  त्यांच्या आज्ञावलीत त्याप्रकारे सुधारणा करून निर्णय घेण्याची क्षमता निर्माण केली आहे. अगदी सोपं उदाहरण घेऊ. आपल्या घरात कचरा काढायला एक रोबो ठेवलाय. त्याची  दोन कामं आहेत. एक आहे कचरा काढणे आणि दुसरे म्हणजे जो कचरा नाही त्या वस्तू घरात परत ठेवून द्यायच्या. कचरा म्हणजे काय आणि वस्तू म्हणजे काय याचा तपशील या रोबोच्या आज्ञावलीत आहे. एक दिवस कचरा काढताना अचानक एक घुबडाचे पिल्लू त्याच्या समोर येउन बसलं. अशावेळी रोबो काय करेल? आपला तपशील तपासेल. दोन्ही याद्यांमध्ये घुबडाचा तपशील नाही. मग ही नवीन वस्तू दोन्ही याद्यांतील कोणाशी  मिळती जुळती आहे का, ते रोबो तपासेल. मग त्याला वस्तूंच्या यादीतील लहान मूल आणि घुबडाचे पिल्लू यात साम्य आढळेल. मग तो रोबो ते घुबडाचे पिल्लू उचलून टेबलावर ठेवेल. त्याचवेळी आपल्या आज्ञावलीत बदल करून ती अद्ययावत करेल. म्हणजे जेवढी अधिक माहिती किंवा डाटा तेवढे यंतर अद्ययावत. जसा आपला कचरा उचलणारा रोबो आहे तसेच कारखान्यात रोबो स्वरूपातील ए.आय. काम करत असतात. येणाऱ्या अडचणीवर मात करून उत्पादन निरंतर ठेवू शकतात. पॅनासॉनिक कंपनीमध्ये दर महिन्याला वीस लाख प्लाझ्मा स्क्रीन तयार होतात. या कारखान्यात फक्त १५ कर्मचारी काम करतात. प्रोटीन फोल्डिंग प्रॉब्लेम या विषयावर आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा झाली. जैवरसायनशास्त्रातला हा महत्वाचा विषय आहे. या स्पर्धेत बक्षीस मिळविले ते गुगलच्या डीप माईंड या ए.आय. ने !!

भावी काळाच्या संकेताची ही दोन उदाहरणे आहेत.

आपण थ्री.डी. प्रिंटींग बद्दल ऐकलेले असेल. युट्युब वर त्याचे अनेक व्हिडीओ बघायला मिळतील. त्याचा आता औद्योगिक वापर होउ लागला आहे. त्यामुळे कारखान्यातील उत्पादन साखळीतील अनेक टप्पे गाळता येतात. कामगारांशिवाय उत्पादन वेगात होते. मोठ्या उद्योगाला लागणारे छोटेछोटे साहित्य वेगवेगळ्या छोट्या, मध्यम किंवा असंघटीत क्षेत्रातील कारखान्यातून तयार होते . या सर्वांच्या बदली ती कामे एक थ्री.डी. प्रिंटर करू शकेल.   जर्मनीच्या सिमेन्स कंपनीत कंबरेचे आणि गुडघ्याचे  नकली सांधे बनवितात. प्रत्येक ग्राहकाचे माप वेगळे असते. म्हणजे हे व्यक्तिगत उत्पादनच म्हणू. प्रत्येक ग्राहकाच्या ऑर्डर प्रमाणे हे नकली सांधे बनवायला इंजिनियर्सना पूर्वी काही दिवस लागायचे. आता थ्री. डी. प्रिंटरला ग्राहकाचा तपशील पुरविला की ३ ते ४ तासात हे सांधे इंजिनियर शिवाय उपलब्ध होतात.

इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणजे वस्तूंनी एकमेकाला संपर्क करणे किंवा जोडून घेणे. उत्पादन साखळीत एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे माल जात असे. नंतर एका यंत्राकडून दुसऱ्या यंत्राकडे माल पोचविण्यासाठी माणसाची गरज होती. आता यंत्रांना आज्ञा द्यायला संगणक आहे. संगणक चालवायला माणसे आहेतच. आता ए.आय.मुळे माणूस गरजेचा राह्यलेला नाही. सिनेमातील हिरो एका नंबरवर एसेमेस करतो की मी घरी यायला निघालो आहे. घरातील एसी आपोवाप सुरु होतो. कॉफी मेकर मधील पाणी उकळू लागतं. एक यंतर दुसाऱ्या यंत्राला कामाचा निरोप देते. दुसरे यंतर कामाला सुरवात करते. याच तत्वावर सगळ्या यंत्रांच्या कामाच्या आज्ञावलीसह ती कामे करताना निर्माण होणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपायांचा  डाटा ए.आय. ला पुरविल्यास कारखान्यातील उत्पादनाच्या साखळीत एक मशीन दुसऱ्या मशीनला निरोप पोचवेल. कामाचे सातत्य राखायला ए.आय. असेल. रोबो निर्माण करणारी FANUC कंपनी दर दिवशी पन्नास रोबो तयार करतात. हा कारखाना तीन शिफ्ट मध्ये चालतो. मात्र या कारखान्यातील दिवे सहसा बंद असतात कारण उत्पादनासाठी सजीवाची इथे गरज नाही.

औद्योगिक क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल झाले. उत्पादनाचा वेग वाढला. मालाचा दर्जा सुधारला. त्यातून संस्थात्मक आणि राजकीय बदल झाले. याचबरोबर विषमतेमध्ये वाढ होत गेली. सर्व औद्योगिक क्रांत्या या पाश्चिमात्य देशात निर्माण होउन तेथे रुजल्या. त्या देशांमध्ये मुबलक भांडवल, कमी लोकसंख्या, लोकसंख्या वाढीचा दर कमी असल्याने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कमी श्रमात भरघोस उत्पादन हा फायदेशीर मामला ठरला. उत्पादित माल लोकसंख्येच्या मागणीच्या प्रमाणापेक्षा खूप जास्त असल्याने नवीन बाजारपेठांचा शोध घेणे क्रमप्राप्त झाले. अगदी पहिल्या औद्योगिक क्रांतीपासून ही प्रक्रिया निरंतर सुरु आहे. साम्राज्य विस्तार ते जागतिकीकरण असा हा सलग आलेख आहे. या पृथ्वीतलावर आपण सृजनात्मक नवनिर्मिती  करू शकतो. . या भवतालातून काहीतरी वेगळे निर्माण करण्यासाठी आपल्याला श्रम करायचे आहेत. निर्माण झालेल्या साधनांचा आपण आनंदाने उपभोग घ्यायचा आहे या तीन महत्वाच्या भूमिकांतून मानवी समाजाचा भविष्यकाळ घडत गेला. पहिल्या तीन औद्योगिक क्रांत्यांमध्ये नवीन तंत्रज्ञान आले आणि उत्पादनाचे तंत्र विकसित झाले. त्या प्रमाणात अनेकांचे रोजगार गेले. त्याचबरोबर नवीन रोजगार निर्माण झाले. उदाहरणार्थ विजेच्या शोधामुळे कमी मजुरांकडून अधिक उत्पादन करता येउ लागले. त्याचवेळी वायरमन, इलेक्ट्रिशियन यासारखे नवे रोजगार निर्माण होणार याचा अंदाज येउ लागला. प्रशिक्षण देउन नवीन प्रशिक्षित मजूर तयार झाले. प्रत्येकवेळी नवीन तंत्रज्ञान राबविण्यासाठी कशाची गरज लागणार याचा अंदाज येत गेला. त्याप्रमाणे प्रशिक्षण, नवीन रोजगार असे सुरु राहिले. या तीनही औद्योगिक क्रांत्यांमध्ये विकसित झालेले तंत्रज्ञान क्रमाक्रमाने वेगवान, अधिक काटेकोर, बिनचूक आणि मानवी श्रमाची गरज कमी करणारे होते. मात्र या तंत्रज्ञानाचे  नियंत्रण माणसाकडेच राहिले. हे तंत्रज्ञान वापरून निर्णय घेण्याचे कार्य माणूस करत होता. त्यामुळे तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरीही मनुष्य सर्व भूमिका पार पाडत राहिला.

चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये रोजगाराच्या संदर्भात अडचण निर्माण झालेली आहे.  तंत्रज्ञान अतिशय झपाट्याने विकसित होत असल्याने कोणते रोजगार कायमचे भूतकाळात जातील याची यादी मोठी आहे मात्र नवीन रोजगार कोणते निर्माण होतील हे खूपसे अंधुक आहे. मागील वर्षी  इकॉनॉमिक टाईम्सतर्फे टेक्नॉलॉजी टॅलेंट इक्विलिब्रियम या कार्यक्रमात नेक्स्टवेल्थ  आंतरप्रूनरचे संस्थापक, इंटेलचे भारतातील प्रमुख आणि विप्रोचे उपाध्यक्ष यांच्या  चर्चेचे सार असे आहे की ए.आय. मुळे  १०० नोकऱ्या जातील आणि जेमतेम १० नवीन नोकऱ्या निर्माण होतील आणि  त्यासुद्धा तातडीच्या गरजेच्या नसतील. वर्ल्ड  इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष क्लाउज  श्लोफ यांनी फोर्थ इंडस्ट्रियल रेव्होल्युशन  पुस्तकात मांडले आहे की एकसारखे आणि साचेबद्ध काम असलेल्या ५२% ते ६९% नोकऱ्या जातील. ३७% कामांमध्ये बदल होईल आणि ९% नवीन नोकऱ्या निर्माण होतील. ही आकडेवारी नेमकी आणि काटेकोर नाही असं जरी समजलो तरीही बहुतांश कामे संपतील हा अंदाज आपल्याला येतोच.  ज्यांच्या कामात बदल होईल ती किती दिवस टिकतील ? कारण तंत्रज्ञानात सतत प्रगती होत राहणार आहे. एखादा शेतकरी थोडीशी कौशल्ये शिकून ट्रॅक्टर चालवू शकेल. उदर निर्वाहासाठी अधिक कौशल्ये शिकून ट्रकही चालवायला शिकेल. मात्र कुठल्याही यंत्राचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे त्याच्या आवाक्याच्या बाहेरचे असेल.  थोडक्यात उच्चतंत्रज्ञान न येणारा आणि त्यामुळे निरुपयोगी झालेला एक मोठा समूह अस्तित्वात येईल. प्रत्येक कारखान्यात किंवा कचेरीत तोचतोचपणा  आणि साचेबद्ध असलेली किती टक्के कामे असतात हा  प्रश्न स्वत:लाच विचारू या. या पुढे तोचतोचपणा आणि साचेबद्ध असलेली कामे ए.आय. करेल. जेंव्हा माणसे कामावर ठेवण्यापेक्षा ए.आय. किफायतशीर होईल तेंव्हा माणसाचे काम संपलेले असेल. नव निर्मितीचा विचार करणारे , चौकटीबाहेरचा विचार करणारे विश्लेषक, इंजिनियर्स आणि प्रोग्रामर्स यांचे महत्व वाढेल. एखाद्या विषयात स्पेशलायझेशन करण्यापेक्षा आंतरविद्या शाखांमध्ये रस असणाऱ्या मिश्र सांस्कृतिक क्षमतांना अधिक मागणी असेल. मात्र तंत्रज्ञानात सतत बदल होत असल्याने माणसाला स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी सातत्याने नवनवीन प्रशिक्षण घेउन अद्ययावत राहणे गरजेचे बनेल आणि त्यातून प्रचंड मानसिक तणाव निरंतर राहील.

जेवढा वैविध्यपूर्ण माहितीचा साठा अधिक तेवढा ए.आय. प्रगत असेल. ए. आय. साठी वेगवेगळ्या प्रकारची अधिक माहिती उपयुक्त होत राहणारच. त्या माहितीचे विश्लेषण ए.आय.करेल . भावी काळात माहिती म्हणजे डाटाचे मोल सर्वाधिक राहील. डाटा हेच भांडवल ठरेल. म्हणूनच विविध प्रकारचा डाटा भरण्यासाठी स्पेशलायझेशनपेक्षा मिश्र सांस्कृतिक जाण असणे अधिक महत्वाचे ठरेल. यासगळ्यामध्ये महत्वाची आणि खरी मेख ही आहे की अधिकाधिक डाटा भरणे  म्हणजे पुढचे रोजगार बंद होणे होय. डाटा भरल्यावर मानवाचे काम संपेल. सुधारीत प्रगत ए.आय.ते काम करू लागेल. निवृत्त झालेल्या माणसाच्या जागी ते काम करायला दुसरा माणूस नेमण्याची गरज राहणार नाही. तंत्रज्ञानाचा परिणाम फक्त उद्योगधंद्यावर होणार नाही. शेतीतही होणार आहे. अमेरिकेत आयारोनॉक्स नावाची कंपनी संपूर्ण शेती सेन्सर्स वापरून करते. त्यांना तीस पट अधिक फायदा मिळतो. अमेरिकत २% जनता शेतीवर अवलंबून आहे तर भारतात ५०% पेक्षा जास्त शेतीवर अवलंबून आहेत. खते, रसायने वापरून आपण शेती करत असलो तरी अशाप्रकारचे तंत्रज्ञान इथं नसल्याने भरपूर रोजगार देणारे हे क्षेत्र आहे. कापूस वेचायचे काम करणारे रोबो तयार करण्याचे काम सुरु आहे. किफायतशीर रोबो बाजारात उपलब्ध झाल्यावर कापूस वेचणी करणाऱ्या शेतमजुरांचे भवितव्य काय असेल याचा आपल्याला विचार करावा लागेल. पहिल्या तीन औद्योगिक क्रांत्यांमध्ये माणसापेक्षा वेगाने काम करणारी यंत्रे होती . संगणकासह विविध यंत्रे हे काम चोखपणे बजावत होती. आता ए.आय.माणसाच्या विविध कौशल्यांपेक्षा , निर्णयक्षमतेपेक्षा श्रेष्ठ ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. माणसाच्या कार्यक्षमतेवर आधीच मात करून झाली होती आता बुद्धीवरही मात होत आहे. मानवाच्या  निर्मिती, श्रम आणि उपभोग या तीन भूमिकांवर  स्वत:च्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवानेच  प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.   यापुढे माणसाने काय करावे हा प्रश्न आ वासून उभा राहणार  आहे.

कामगाराची अकुशलता त्याच्या काळातील तंत्रज्ञानानुसार ठरत असते. त्यामुळे तंत्रज्ञानामुळे जे परिघाच्या बाहेर फेकले जातील ते कितीही शिक्षित किंवा उच्चाविद्याविभूषित असले तरी ते अकुशल कामगारच होणार. अस्तित्वातील बेरोजगार आणि अकुशल कामगार यांचे प्रश्न सोडविण्याचे काम चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नाही.  स्वयंचलीत तंत्रज्ञान , कृत्रिम बुद्धीमत्ता इत्यादी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारा  बिना रोजगार उत्तम ,सुबक, नेटकी आणि वेगवान वस्तुनिर्मिती  आणि त्याच अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत विक्री आणि विपणन करणे हे आहे. फोर जी तंत्रज्ञानानंतर आता फ़ाईव्ह जी तंत्रज्ञान येउ घातले आहे. अॅपवर आधारीत विक्री आणि सेवांचा विस्तार फोर जी च्या काळात झाला. फ़ाईव्ह जी नंतर अजून मोठ्या प्रमाणावर बदल अपेक्षित आहेत. मात्र यासाठे निरंतर व मुबलक उर्जा आणि दणकट इंटरनेट गरजेचे होणार आहे. सध्या देशातील मोजकी शहरे सोडली तर लोडशेडींग सर्वत्र आहे आणि ही स्थिती झटपट सुधारणे शक्य नाही. त्यामुळे समृद्धीची बेटे तयार होतील आणि त्या बेटांवर अजून छोटी श्रीमंतीची बेटे असतील. ही बेटे टिकविता यावीत म्हणून अख्खा देश राबेल. यातूनच पराकोटीची विषमता निर्माण होईल.

गेल्या काही वर्षात ‘ जॉबलेस ग्रोथ ‘ हा वाक्प्रचार आपल्या कानावरून अनेकदा गेलेला असेलच. ही ‘ जॉबलेस ग्रोथ ‘ काय आहे हे पुढील आकडेवारी वरून स्पष्ट होईल. सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे जीडीपी. अधिक श्रम खर्च केल्याशिवाय अधिक  उत्पादन कसे मिळणार हा साधा तर्क  असल्याने जेंव्हा जीडीपी वाढतो तेंव्हा रोजगारात वृद्धी होणे हे गृहीत धरतात . जीडीपी ३% वाढतो त्यावेळी बेरोजगारी १% कमी होते असा सर्वसाधारण ठोकताळा आहे.  भारताच्या  आकडेवारीचे कोष्टक पुढीलप्रमाणे आहे :

साल

जीडीपी वाढीचा दर

रोजगार वाढीचा दर

१९७२ – १९७७

४.६%

२.६%

१९८२ – १९८६

४.०%

१.७%

१९९३ – १९९९

६.८%

१.०%

२००४ – २००९

८.७%

०.१%

२०११ – २०१५

८.०%

०.६%

ही आकडेवारी अजीज प्रेमजी विद्यापीठाच्या सेंटर फॉर सस्टेनेबल एम्लॉयमेंटने सप्टेंबर २०१८ प्रकाशित केली आहे. खरं  तर जीडीपी वाढीचे आणि रोजगार निर्मितीचे दर  एकमेकाला पूरक हवेत मात्र या आकडेवारीत ते एकमेकाच्या विरोधी आहेत. जीडीपी वाढत असताना रोजगार निर्मिती घटत गेलेली आहे. ही तर ऑटोमेशनची सुरवात आहे. या कामाला गती मिळाली की ग्रोथचे वाटेकरी मोजकेच असतील आणि जॉबलेस चे तांडे आपल्याला सर्वत्र दिसतील. आजही पुणे , लातूर या ठिकाणी खेड्यापाड्यावरून आलेली हजारो तरुण मुलेमुली एमपीएससी आणि यूपीएससीत यशस्वी होण्यासाठी वर्षानुवर्षे अभ्यास करताना आढळतात. हा त्या जॉबलेस ग्रोथचाच साईड इफेक्ट आहे.

जसे जसे तंत्रज्ञान बदलते , रोजगाराचे स्वरूप बदलते त्याप्रमाणे शिक्षण व्यवस्थेतही बदल अपेक्षित असतात. बदलत्या स्थितीला अनुरूप अशी शिक्षणव्यवस्था घडवावी लागते. आतापर्यंत कुशल कामगारांचा पुरवठा इंजिनिअरींग कॉलेजातील पदवीधरांमधून होत असे.  मर्यादित कुशल किंवा अर्धकुशल कामगार हे जिल्हा पातळीवरील आयटीआय मधून तयार होत. आजच्या घडीला ही सर्वप्रकारची कामे  टिकून राहतील याबद्दल आपण साशंक राहावे अशी स्थिती आहे. अजीज प्रेमजी विद्यापीठाच्या सेंटर फॉर सस्टेनेबल एम्लॉयमेंटच्या दुसऱ्या अभ्यासात असे मांडले आहे की एकंदर बेरोजगारांमध्ये शिक्षण आणि रोजगार यांचे प्रमाण व्यस्त आहे. बेरोजगारांमध्ये पदविका, पदवीधर आणि पदव्युत्तर मंडळींचे प्रमाण सर्वाधिक आहे. उच्चशिक्षितांमध्ये बेकारीचे प्रमाण जास्त असताना ग्रेट लर्निंग कंपनीच्या पाहणी नुसार डेटा सायन्स, मशीन लर्निंग आणि ए.आय.या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर पन्नास हजार जागा प्रतिभा आणि कौशल्याच्या अभावी रिक्त आहेत. नवीन तंत्रज्ञानासाठी निर्माण होणाऱ्या नवीन नोकऱ्याना कोणती कौशल्ये लागतील? त्या कौशल्य शिक्षणाचा आपल्या अभ्यासक्रमात कसा अंतर्भाव करावा? कोणते नवीन अभ्यासक्रम आखावेत? यासाठी राष्ट्रीय पातळीवर विचार मंथन झाल्याचे दिसत नाही. आपल्या देशात अक्षरशः गावोगावी इंजिनिअरींग कॉलेजेस आहेत मात्र भारतातल्या आयटी क्षेत्रात ए.आय.साठी काम करणारी माणसे मिळत नाहीत. याचा परिणाम एवढाच होईल की नव्या तंत्रज्ञानातील अकुशल कामगारांचा निरुपयोगी समूहात जुनाट शिक्षण घेतलेल्या इंजिनिअरींग आणि तंतरज्ञांचाही  समावेश होईल.

जागतिकीकरणानंतर अनेक परदेशी कंपन्यांनी भारतात उत्पादन सुरु केले. त्यांनी भारतात कारखान्यांच्या माध्यमातून गुंतवणूक केली. इथे त्यांना काही सवलती मिळाल्या. ही गुंतवणूक दीर्घ मुदतीची असते कारण त्यांनी इथे येण्याची दोन मुख्य कारणे म्हणजे स्वस्त मजूर आणि मोठी बाजारपेठ. मात्र जलद, बिनचूक उत्पादन ए.आय.तर्फे करता येउ लागले तर  स्वस्त मजुरांची गरजच लागणार नाही. त्यामुळे दोन पर्याय दिसतात. एकतर कारखाने मूळ देशात घेउन जाणे. ( कोविद – १९ नंतर चीन मधून कारखाने मूळ देशात नेण्याची चर्चा सुरु झाली आहे.) किंवा  बाजारपेठेच्या मिषाने इथे राह्यले  तरीही ते बिनमजुरांचे कारखाने असतील. त्यातून रोजगार निर्मिती अत्यल्प असेल. यापुढे परदेशी गुंतवणूक वित्त बाजारात अधिक होईल असा तज्ञांचा अंदाज आहे. वित्त बाजारातील गुंतवणूक ही अतिशय जोखमीची, अस्थिर आणि अधिक परतावा देणारी असते. चमकणाऱ्या विजेची उपमा या गुंतवणूकीला देता येईल. आपल्या वित्त बाजारात परदेशी गुंतवणूक यावी , आंतरराष्ट्रीय बाजारात पत राखली जावी  यासाठी वित्त बाजार चांगला परतावा देणारा आणि चढा असावा लागतो. यातून एक महत्वाचा धोका असा उद्भवतो की सरकार वित्त बाजार चढा रहावा म्हणून आंतरराष्ट्रीय वित्त गुंतवणूकदारांच्या सोयीचे निर्णय घेते.

नोटाबंदी आली. पाठोपाठ जीएसटी लागू झाला. आपली  कोलमडून पडलेली अर्थव्यवस्था  अजूनही सावरलेली नाही. जीडीपी ची मोजणी करताना असंघटीत क्षेत्रातील उत्पादकता मोजली जाते का , याबद्दल साशंकता आहे. नोटाबंदी नंतर असंघटीत क्षेत्रातील छोट्या उद्योगांचे कंबरडेच मोडले. ते अजूनही नीट उभे राह्यलेले नाहीत.  बदलत्या पर्यावरणाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. विकासाचा दर घसरणीला लागला होता. मालाचे उत्पादन सुरु होते पण उठाव नव्हता. लोकांकडे खर्च करायला पैसा उरलेला नव्हता. विषमता वेगात वाढली होती. मध्यंतरी डॉ रघुराम राजन यांनी एका मुलाखतीत सांगितले की भांडवलशाहीने सर्वसामान्यांचा हात सोडला तर परिस्थिती कठीण होईल.कुठल्याही व्यवस्थेत एका मर्यादेनंतर विषमता वाढणे हे संपूर्ण व्यवस्थेसाठी घातक असते. डॉ रघुराम राजन यांचा इशारा नेमके हेच सांगत होता. आज ग्राहकोपयोगी वस्तू बनविणाऱ्या कंपन्या आपले उत्पादन ग्राहकांनी विकत घ्यावे म्हणून कर्ज देत आहेत. जवळजवळ प्रत्येक ग्राहकोपयोगी वस्तू बनविणाऱ्या  कंपनीने आपली फायनान्स कंपनी काढली आहे. म्हणजे विनोद असा आहे की मी उत्पादन करायचे. माल घेउन आपल्याकडे यायचे आणि सांगायचे की हे उत्पादन चांगले आहे. तुमच्या गरजेचे आहे. समजा तुला परवडत नसेल तर घाबरू नकोस. मी तुला कर्ज देतो ना. म्हणजे माझाच माल ग्राहकाने  खरेदी करावा म्हणून मीच पैसे देतो. बाजारातील खरेदीची क्षमता मंद झाली असून मालाला उठाव नसल्याचे हे लक्षण आहे. प्रगत तंत्रज्ञानातून वस्तूवैपुल्य निर्माण होईल पण ग्राहकाची खरेदीची क्षमता नसेल तर काही उपयोग नाही. तंत्रज्ञानाच्या प्रत्येक बदलाला सामावून घेत भांडवलशाहीने टिकून राहण्यासाठी कल्पक मार्ग काढले. जेंव्हा तंत्रज्ञान मोकाट सुटते आणि स्पर्धात्मक वातावरणात त्याचा अंगीकार करावा लागतो तेंव्हा निर्माण केलेल्या मालासाठी मागणी कशी निर्माण करणार या प्रश्नाचे उत्तर चौथ्या औद्योगिक क्रांतीचे प्रवर्तक देउ शकलेले नाहीत.

बाजाराचे आणि पर्यायाने समाजाचे चक्र सुरळीत चालण्यासाठी मागणी निर्माण करायला लागेल. जनतेच्या हाती पैसा द्यावा लागेल. ‘ जॉबलेस ग्रोथ ‘ च्या काळात जनतेच्या हाती पैसा देणे म्हणजे काय ? २०१९ च्या लोकसभा  निवडणुकीच्या वेळी युबीआय ची चर्चा पुढे आली. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी जाहीर केले की सत्तेवर आलो तर युबीआय देउ.  भाजप सत्तेवर आले आणि त्यांनी प्रथमच मर्यादित पातळीवर  युबीआय सुरु केले. आम्ही तुम्हाला रोजगार देउ शकत नाही, तुमचे जीवनमान उंचावायला आम्ही अक्षम आहोत आणि आम्ही तुम्हाला हलाखीत बघू शकत नाही आणि ठारही मारू शकत नाही म्हणून कृपया हे पैसे घ्या आणि मरेपर्यंत जगा हा युबीआयचा सोपा अर्थ आहे. चौथी औद्योगिक क्रांती इथे अवतरल्यावर रोजगार निर्मिती शून्याच्या आसपास राहील अशी भीती व्यक्त होत आहे. मग हा गाडा चालवायला, कोंडी फोडायला युबीआय शिवाय पर्याय नाही असं तज्ञांचे मत आहे. सरकारने सरसकट युबीआय द्यावा की निवडक कुटुंबांना द्यावा, जीडीपीच्या किती प्रमाणात द्यावा ही सगळी अर्थशास्त्रीय चर्चा करता येईल मात्र युबीआय घेणारा माणूस काय विचार करेल? म्हणजे माणसाच्या मनुष्यपणाला कधी अर्थ प्राप्त होतो? तो समाजात काहीतरी योगदान करत असतो. त्याच्या श्रमातून काहीतरी निर्मिती होत असते. त्याचा त्याला मोबदला मिळत असतो. या सगळ्या व्यवहारातून त्याच्या जीवनाला अर्थपूर्णता प्राप्त होते. त्याला आत्मसन्मान मिळतो.  मात्र युबीआयचा लाभार्थी म्हणजे ज्याचं समाजात काहीच योगदान नाही, त्याच्या श्रमाची, कौशल्याची समाजाला गरज नाही. त्याच्या अस्तित्वाचा अर्थ म्हणजे तो मरत नाही  म्हणून जगतोय. लाभार्थी हा आत्मसन्मानशून्य बनणार . अशा व्यक्तीला रसरसून जगण्याची इच्छा होईल का?  पूर्ण रिकाम्या वेळेत त्याला सर्जनात्मक काम करावेसे वाटेल का? त्याच्या आत्मसन्मानाची किंमत कवडीमोल असेल तर तो विध्वसंक वृतीने वागण्याची शक्यता जास्त आहे. बीड जिल्यातून जवळजवळ दीड लाख उसतोडणी कामगार दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रात येतात. मोसमात उसतोडणी करतात, मोबदला घेतात आणि घरी परततात. ते मजूर आहेत आणि कायम गरीब अवस्थेतच आहेत. कष्टाने मिळविलेल्या पैशाचा आत्मसन्मान त्यांच्याकडे आहे. ही लाख दीड लाख मजूर मंडळी चोऱ्या ,दरोडे किंवा गुंडगिरी  या मार्गाद्वारा अधिक कमाई करू शकतात. पण तसं करण्याचा विचारच त्यांच्या मनाला शिवत नाही कारण त्यांचा आत्मसन्मान त्यांना ही कामे करू देत नाही. अगदी तळातल्या श्रामिकापासून सर्वांना आत्मसन्मान असतो.  समाजात त्या त्या पातळीवर याचा मान ठेवला गेला तरच समाजाचं गाडं नीट चालतं. चौथ्या औद्योगिक क्रांतीतून   आत्मसन्मान जपला जाईल याची शाश्वती वाटत नाही.

चौथ्या औद्योगिक क्रांतीतून कोणकोणते तंत्रज्ञान जन्माला येईल असा प्रश्न विचारलात तर रस्त्यावर ड्रायव्हर शिवाय गाड्या धावतील, मोठे मोठे थ्रीडी प्रिंटर पटापट घरे बांधतील अशा अनेक सुरस , रंजक आणि दिपवून टाकणाऱ्या कहाण्या आपल्याला आढळून येतील. मात्र वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे माजी अध्यक्ष आणि चौथ्या औद्योगिक क्रांतीचे जन्मदाते क्लउज श्लॉफ हे रोजगार निर्मितीबाबत साशंक आहेत. कॉनफेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज आणि रोलंड बर्जर  कन्सल्टंट यांनी मिळून भारतातील चौथ्या औद्योगिक क्रांतीबद्दल एक अहवाल तयार केला आहे. त्यामध्ये रोजगार निर्मिती आणि पर्यावरणावरील परिणाम याबद्दल मांडणी नाही. देशात प्रवेश करणारे तंत्रज्ञान वाजत गाजत येत नसते. कारखाने नवीन तंत्रज्ञान आणतात त्याचा कुठेही गाजावाजा होत नसतो. ते मिडीयाला माहीतही नसते. फक्त अत्याधुनिक कारखाने आपली भरती हळूच बंद करून टाकतात. आम्ही नोकऱ्या देत नाही हे कोणीही प्रेस कॉन्फरन्स घेउन सांगत नाही. त्याची बातमी होत नाही. महाराष्ट्रातील मोठ्या उद्योगातील पाच वर्षापूर्वी असलेली कामगारांची संख्या आणि आजची संख्या याची माहिती काढल्यास  तफावत लगेच कळून येईल. यापासून शेती उद्योग जास्त दूर नाही. थोडक्यात आपल्याला भावी काळात काही सुखाचे दिवस येतील हे विसरण्याची वेळ आलेली आहे. समाजात ढोबळमानाने दोन वर्ग राहतील. सर्जक , कल्पक आणि रचनाकार वर्ग जो  आपले उत्पन्नाचे साधन टिकवून  ठेवण्यासाठी सतत बदलत्या तंत्रज्ञानाशी मिळते जुळते घेत प्रचंड तणावग्रस्त अवस्थेत राहील. दुसरा वर्ग राहील निरूपयोगींचा.  अशिक्षित, शेतमजूर, शहरातील अकुशल कामगार आणि त्यांच्याबरोबर असतील तंत्रज्ञानाने घरचा रस्ता दाखविलेले अनेक उच्चविद्याविभूषित  आणि पदवीधर. हताश, थकलेल्या तणावग्रस्तांचा आणि निरूपयोगींची संख्या सातत्याने वाढविणारा समाज असेल. आज आपल्या जीवनाला साहित्य, संगीत, कला , क्रीडा , गप्पा , कहाण्या असे अनेकानेक पैलू आहेत. हे सगळे पैलू टिकून राहतील का? हे चित्र निराशाजनक वाटत असेल. अतिरेकी नाहीएय. जगात या विषयावर अनेकांनी याहीपेक्षा जास्त लिहून ठेवले आहे.

आपणच हे बदलू शकतो हा आत्मविश्वास आपल्यात का नाही? स्वातंत्र्यपूर्व काळात खादी सारखी कामे ही आदर्श बिझिनेस मॉडेल होती. खादी सोबत त्या काळात अनेक प्रयोग केले गेले. अगदी आजही मुंबईच्या लोकल स्टेशनवर मिळणारे ‘ नीरा ‘ हे आरोग्यदायी पेय हजारो वंचितांना रोजगार मिळवून देते. त्याकाळातील हे सर्व सर्जक, कल्पक आणि चौकटीबाहेरचे अविष्कार होते. याचा अर्थ तेच प्रयोग आंधळेपणाने आज करावेत असा होत नाही. असे अविष्कार करण्याची विजिगीषा आपल्यात होती हे आपण विसरलोय का ? प्रत्येक देशातील माणसे, त्यांची कौशल्ये, लोकसंख्या, पर्यावरण, संस्कृती , समाजरचना सर्वस्वी वेगळे असते. प्रत्येकाची खास वैशिष्ट्ये आणि खास प्रश्नही असतात. इतरांपेक्षा भारत म्हणून आपले काही वेगळेपण असते. सर्वांनी सरसकट एकच यंत्रसंस्कृती मानली पाह्यजे असा आग्रह धरण्याची गरज नाही. चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नवीन तंत्रज्ञान आपल्या जीवनशैलीशी , संस्कृतीशी जुळवून घेउन आपल्या गरजांनुसार आपल्यासाठी उपयुक्त करून घेउ शकतो का? आतापर्यंतच्या सगळ्या औद्योगिक क्रांत्या आपल्या जमिनीवर तयार झाल्या नाहीत. त्या लादल्या गेल्या किंवा आपण काळाबरोबर राहयचे म्हणून बळजबरीने स्विकारल्या. त्यामुळे सखोल विचार न करता आपण प्रतिकृती तयार करण्यात धन्यता मानली. यातूनच समृद्धीची बेटे आणि बाकी मागास असे चित्र तयार झाले. लोकशाही व्यवस्थेत सगळी कामे सरकारनेच करायची असल्याने विरोधी पक्ष किंवा पिडीताने सरकारकडे मागणी करणे आणि दबावाने ती मान्य करून घेणे ही भूमिका सर्वमान्य झाली.  सरकार पक्ष, विरोधी पक्ष आणि पिडीत यांनी आपापली कार्ये ठरवून घेतली आणि या पद्धतीने देशाचा गाडा चालेल यावर तिघांचेही एकमत झाले. त्याचा परिणाम असा झाला की सर्जकता आणि चौकटी बाहेरचे विचार करणे विसरले गेले.

सर्जनात्मक नवनिर्मिती ,  श्रम  आणि निर्माण होणाऱ्या साधनांच्या उपभोगातून आनंद घेणे  याचबरोबर मी हे सर्व का करत आहे? आपल्या कृतीमागील मूल्ये कोणती? थोडक्यात आपल्या जीवनाचे श्रेयस काय यावरही मानवाने सातत्याने चिंतन केले आहे. या चिंतनातून भारतीय दर्शने असोत की भांडवलशाही  किंवा मार्क्सवाद असो की गांधीवाद असे अनेक परस्परविरोधी किंवा पूरक  विचारप्रवाह निर्माण झाले. मात्र  ‘ श्रेयस निश्चित करून त्या दिशेने जाणाऱ्या समाजरचनेची मांडणी ‘ करणे हे या सर्व विचारपद्धतीमधील साम्य आहे. मानवाने विकसित केलेले तंत्रज्ञान मानवाला फक्त उपभोगापुरतेच सीमित करून ठेवणार आहे. त्याचा सर्जनाचा आणि निर्मितीचा आनंद लोप पावत जाणार आहे. उपभोगापुरता उरलेला मनुष्यप्राणी श्रेयसाचा विचार करू शकणार नाही आणि तंत्रज्ञानाच्या अफाट वेगाबरोबर जुळवून घेत रचनेला बदलत राहावे लागणार आहे. सर्वात महत्वाचा धोका हा आहे की माणसाच्या मनुष्यत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल आणि ‘ श्रेयस आणि त्या दिशेने जाणारी समाजरचना ‘ ही मांडणीची पद्धत नष्ट होउन तंत्रज्ञानासोबत फरफटत जाणारी समाजरचना तयार होत राहील. नजीकच्या काळातील हे आव्हान पूर्णपणे नवीन आहे. उद्या मनुष्याचे मनुष्यत्व नक्की कशात आहे या प्रश्नाचे उत्तर आपल्याला प्रथमच द्यावे लागणार आहे. आपल्या देशातील कुठलाही प्रश्न धर्म आणि जाती शिवाय नसतो. यावेळीही धर्म आणि जातीच्या ताणतणावांमुळे नवीन आव्हानांतील व्यामिश्रता वाढणार आहे. या आव्हानांना समर्थपणे तोंड द्यायचे असेल तर आजवर चालत आलेले मार्ग आपल्याला बदलावे लागतील आणि आपल्या विचारसरणींना थोडे बाजूला ठेवून स्वच्छ नजरेने सामोरे जावे लागेल .  पूर्णपणे नव्याने चौकटीबाहेरचा  विचार करायला  पिडीतांशी  तादात्म्य पावलेल्या कार्यकर्त्यांसोबत अर्थतज्ञ, वैज्ञानिक , संस्कृती अभ्यासक, कलाकार, संगणकतज्ञ या सारख्या अनेकांना सामील व्हावे लागेल.  या सर्वांच्या सखोल चर्चेतून आपल्या जमिनीवरील बहुसांस्कृतिक वैविध्याचा आणि सहिष्णुतेचा गाभा जपत भावी काळाचा वेध घेउन नवीन रचना उभ्या कराव्या  लागतील.

(लेखकद्वयी नामवंत गांधीवादी कार्यकर्ते आहेत)

9869019727/9850095715

[email protected]

13 Amazing Things You Can Make With a 3-D Printer

 

 

 

 

Previous articleइफ प्रिंट इज प्रूफ….देन लाईव्ह इज ट्रुथ !
Next articleजो बायडन: अमेरिकेचे संभाव्य राष्ट्राध्यक्ष?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here