ओटीटी प्लॅटफॉर्म्स विरुद्ध सिनेमा : आगामी लढ्याची नांदी

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक- २०२०

-अमोल उदगीरकर

भारत हा प्रचंड विरोधाभासांनी भरलेला देश आहे. या देशात अणुऊर्जा वापरली जाते आणि शेणाच्या गोवर्‍या जाळून पण ऊर्जानिर्मिती केली आहेत . याच देशात नरिमन पॉईंट आहे, याच देशात धारावीची झोपडपट्टी आहे. जगातले काही सर्वाधिक श्रीमंत लोक या देशात आहेत आणि याच देशात कित्येकांचे दरडोई उत्पन्न बावीस रुपये पण नाही. तंबूतले सिनेमे आणि व्हिडिओ पार्लर अजूनही लोकप्रिय असताना, त्याचवेळेस नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, हॉटस्टारसारख्या ऑनलाईन स्ट्रीमिंग कंपन्यांचा पण भारतीय मनोरंजनाच्या बाजारपेठेत टक्का वाढणं, हे याच अंतर्विरोधाचं अजून एक उदाहरण.

     भारतीय प्रेक्षकांच्या मानसिकतेवर मोठ्या पडद्यावर दाखवला जाणारा सिनेमा राज्य करतो असं मानलं जातं. सिनेमा हा आपल्या देशासाठी फक्त मनोरंजनाचं एक साधन असं कधीच नव्हतं. पलायनवादी, चकचकीत स्वप्न विकणारा आपला व्यवसायिक सिनेमा आपल्या प्रेक्षकांचं पिढ्यान् पिढ्या आयुष्य व्यापून राहिला आहे. मोठ्या पडद्यावरच्या नायक -नायिकेमध्ये भारतीय प्रेक्षकांचा एक मोठा वर्ग स्वतःला नेहमी पाहत आला आहे. या नायक -नायिकेमध्ये स्वतःला बघून आपल्या अप्राप्य फँटसीज आपला प्रेक्षक पूर्ण करत आला आहे. तरी, मोठ्या पडद्यावरच्या सिनेमाच्या या वर्चस्वाला एका ठराविक काळाने सतत आव्हान मिळत असतं, असं एक निरीक्षण. कधी ते आव्हान व्हिडिओ प्लेयर्सकडून मिळालं, कधी केबल इंडस्ट्रीकडून, तर कधी टेलिव्हिजन इंडस्ट्रीकडून. सिनेमा पायरसीकडून मिळालेलं आव्हान हे जितकं बेकायदेशीर होतं, तितकंच गंभीर होतं. पण, सिनेमा हा सगळ्या आव्हानांना पुरून उरत आलाय. पण, यावेळेसचं वेब स्ट्रीमिंग कंपन्यांकडून मिळणार आव्हान थोडं वेगळं आणि जास्त धोकादायक आहे. कारण, या आव्हानाला देशात होणार्‍या प्रचंड प्रभावी दूरसंचार क्रांतीचा थेट पाठिंबा आहे.

   पाठिंबा कसा? मोबाइल हा आता सध्या एक अवयवच बनल्यासारखा झाला आहे. अगदी अपवादात्मक परिस्थिती वगळता, जिथं जिथं आपण जातो तिथं आपला मोबाईल आपल्यासोबतच असतो. एकेकाळी फक्त इनकमिंग कॉल उचलण्यापुरता उपयोग असणारा मोबाइल, आता आपल्याला वेळ पण दाखवतो, सकाळी अलार्म वाजवून आपल्याला उठवतो, आपला दिवस प्लॅन करून देतो, व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात आपल्या जबाबदार्‍या हलक्या करून देतो. याच मोबाइल हँडसेटने आपल्याला दिलेली मोठी सोय म्हणजे, आपल्याला मोबाइलच्या स्क्रीनवर चित्रपट आणि गाजलेल्या मालिकाही बघता येतात. ‘रिलायन्स जिओ’ने एकूणच सेल्युलर क्षेत्रात जी क्रांती आणली, त्याचे अनेक दूरगामी परिणाम झाले. अतिशय स्वस्त सेल्युलर डेटा जिओने आपल्या ग्राहकांना द्यायला सुरुवात केली. नाइलाजाने का होईना इतर सेल्युलर कंपन्यांना पण जीओचा कित्ता गिरवावा लागलाच. त्यांनी तसं केलं नसतं, तर त्यांचा बाजारपेठेतला टक्का घसरून जीओची मक्तेदारी प्रस्थापित होण्याचा धोका होता. या स्वस्त झालेल्या डेटामुळेच नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम, हॉटस्टार यांचे सुगीचे दिवस सुरू झालेत. आपल्या देशात झालेल्या स्मार्ट फोन आणि फोर-जी क्रांतीचा सर्वाधिक फायदा ज्या क्षेत्रांना झाला, त्यामध्ये या ऑनलाइन स्ट्रीमिंग क्षेत्राचा समावेश आहे. ऋखउउख च्या एका रिपोर्टनुसार भारतात स्मार्टफोनवर व्हिडिओ पाहणार्‍यांचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. मोबाइलवर वेळ घालवण्याचा सरासरी वेळ आपल्या देशात सातत्याने वाढत आहे. आपण स्वतःचाच विचार केला, तर दिवसभरात आपण किती तरी वेळ मोबाईलच्या स्क्रीनकडे बघण्यात घालवतो. एरवी आपल्या देशात ग्रामीण -शहरी, राजकीय, सामाजिक, भाषिक असे जे अनेक स्तर आहेत, त्यामध्ये हा ‘कॉमन ट्रेंड’ आहे. प्रचंड विविधता असणारा खंडप्राय देश जेव्हा एकच ट्रेंड दाखवायला लागतो, तेव्हा त्याची नोंद घेणं भाग पडतंच. थोडक्यात ‘इंडिया’ आणि ‘भारत’ दोन्हीकडे स्मार्टफोनवर व्हिडिओ पाहण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. याच रिपोर्टमध्ये म्हटल्यानुसार, भारतात जवळपास 20 कोटी लोक फोनवर व्हिडिओ बघतात. थोडक्यात, वेब स्ट्रीमिंगचं क्षेत्र सोन्याचं अंड देणारी कोंबडी ठरणार आहे. या क्षेत्रातून मिळणार्‍या महसुलाचे आकडे डोळे विस्फारून टाकणारे असतील हे नक्की !

कोरोना नावाची इष्टापत्ती? 

मानवाच्या मूलभूत गरजांमध्ये सिनेमा कदाचित पहिल्या दहामध्येही नसेल, पण तो मानवाच्या नेणिवांमध्ये-जाणिवांमध्ये यत्र-तत्र सर्वत्र आहे. 2008-09 ला मोठी आर्थिक मंदी आली होती, तेव्हा करण जोहर म्हणाला होता की, ‘चित्रपटक्षेत्र हे ‘रिसेशनप्रूफ’ आहे.’ हे विधान किती खरे होत हे आर्थिक मंदीला पुरून उरत सिनेमाने सिद्ध केलेच. थोडक्यात, सिनेमाचा प्रवाह युद्ध, नैसर्गिक आपत्ती, आर्थिक संकट या सगळ्यांना तोंड देत वर्षानुवर्षे खळाळत वाहतच आहे. हे सारे खरे असले तरीही, डोळ्यांना न दिसणार्‍या एका विषाणूने या लवचिक उद्योगाला गेल्या काही महिन्यांपासून ‘पॅकअप’ करायला लावले आहे. ‘कोविड -19’ ने एकूणच मानवजातीवर संक्रांत आणली आहे, तशीच सिनेमाच्या क्षेत्रावर पण आणली आहे. फिल्म इंडस्ट्रीवर आलेले हे संकट केवळ आर्थिकच नाही, तर त्यापेक्षा व्यापक पातळीवरचं आहे. भारतामध्ये सिनेमा तळागाळात रुजलेला असला, तरी सिनेमाला सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास अर्थातच मर्यादा आहेत. अनेकजण थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघत नाहीत किंवा बघू शकत नाहीत. कामातून वेळ न मिळणं, सिनेमागृहातली महागडी तिकीट, एकूणच मल्टिप्लेक्समध्ये होणारा बेसुमार खर्च, इतर प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे, बडबडीमुळे आणि मोबाइलवर सातत्याने बोलणे, घरात लहान मुलं असणं , चित्रपट वितरणातल्या त्रुटीमुळे छोट्या गावात किंवा शहरात सिनेमे न लागणं, अशा अनेक कारणांमुळे खूप प्रेक्षकांना थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघण्यावर मर्यादा पडतात. त्यांच्यासमोर यापूर्वी चित्रपट बघण्यासाठी फक्त पायरसीचा पर्याय होता. पण, नेटफ्लिक्ससारख्या वेब स्ट्रीमिंग कंपन्यांनी अशा प्रेक्षकांना चित्रपट बघण्याचा एक कायदेशीर पर्याय दिला आहे .

     कोरोना या साथीच्या रोगाने गेल्या आठ महिन्यापासून सिनेमा इंडस्ट्रीला गुडघ्यावर आणलं आहे. नवीन चित्रपटांचं प्रदर्शन पूर्णपणे थांबल्यामुळे एकल चित्रपटगृह आणि मल्टिप्लेक्स चित्रपटगृह पूर्णपणे बंद आहेत. टीव्ही सिरियल्सचं शूटिंग बंद असल्यामुळे टीव्हीवर प्रसारित होणार्‍या मालिका पण अडीच महिने बंद होत्या. अशावेळेस घरात लॉकडाऊनमुळे कोंडले गेलेले आणि वेळ कसा घालवावा या विवंचनेत असलेले लाखो लोक मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळले. एखादं जागतिक संकट काही व्यवसायांसाठी इष्टापत्ती बनल्याची उदाहरणं आहेत. दुसर्‍या  महायुद्धाचा फायदा जागतिक महामंदीतून अमेरिकेला पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी अमेरिकन राजकारण्यांनी कसा केला, हा फार रोचक विषय आहे. 2008 च्या सबप्राईममध्ये, दूरस्थ शिक्षण क्षेत्राला आणि मनोरंजन क्षेत्राला मोठा फायदा झाला होता. शेकडो जीव घेणारी, लाखो लोकांना शेकडो मैल दूर गावाकडे पायपीट करायला लावणारी, अर्थव्यवस्था ठप्प झाल्यामुळे शेकडो परिवार आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त करणारी ‘कोरोना’ ची साथ जढढ प्लॅटफॉर्म्ससाठी मोठी इष्टापत्ती ठरली, असं म्हणायला भरपूर वाव आहे. नवीन सिनेमे रिलीज होण्याचे थांबल्याने थिएटरमधे प्रेक्षक येण्याचा प्रश्नच नव्हता.

     आता थिएटर सुरू झाल्यानंतर, संसर्गाच्या भीतीने किती प्रेक्षक सिनेमागृहात येतील, याबद्दल शंकाच आहे. ज्यांचे सिनेमे तयार आहेत किंवा निर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत, अशा सिनेमांच्या निर्मात्यांची कुचंबणा होत आहे. यातल्या अनेकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर डायरेक्ट सिनेमे प्रदर्शित करण्याचा मार्ग चोखाळला. ‘गुलाबो सिताबो’, ‘गुंजन सक्सेना’, ‘सडक 2’, ‘खुदा हाफिज’ असे अनेक मोठ्या प्रोडक्शन हाऊसचे सिनेमे डायरेक्ट ओटीटीवर प्रदर्शित झाले. आणि अनेक मोठ्या बॅनरचे सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. याच काळात ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘पाताल लोक’, ‘ब्रीद 2’ , ‘बंदिश बँडिट्स’ अशा अनेक वेबसिरीजला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. सिनेमागृहांच्या मक्तेदारीला ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी जोरदार आव्हान दिलं आहे, हे तर उघडच आहे. कोरोनाची साथ येण्यापूर्वीचं जग आणि कोरोना साथीनंतरचं जग हे खूप वेगळं असणार आहे; हे विधान सिनेमाच्या क्षेत्राला पण लागू आहे. या रोगाच्या साथीनंतरची फिल्मइंडस्ट्री खूप बदललेली असणार आहे आणि या बदलांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा मोठा वाटा असणार आहे .

ओटीटी प्लॅटफॉर्म्सचं अर्थशास्त्र

या वेब स्ट्रीमिंग क्रांतीचा विचार दोन पातळ्यांवर करायला हवा. प्रेक्षकांच्या पातळीवर आणि भारतीय मनोरंजन उद्योगात होणार्‍या आर्थिक चलनवलनाच्या पातळीवर. भारतात सध्या असणार्‍या वेब स्ट्रीमिंग कंपन्या हा नेटफ्लिक्सचा अपवाद वगळता भारतीय प्रेक्षकांच्या खिशाला फारसे डोईजड न लावणारे दर लावतात. अमेझॉन प्राईमने मध्यंतरी चारशे नव्याणव रुपयात वर्षभरासाठी मेम्बरशिप देण्याची ऑफर मध्यंतरी आणली, ती गेमचेंजर ठरली. प्राईमला या स्कीममधून लाखो नवीन सदस्य मिळाले. हॉटस्टारने पण अशाच किफायतशीर स्कीम्स आणल्या आहेत. नेटफ्लिक्सचे तुलनेने महागडे प्लॅन्स (महिना पाचशे रुपयापासून सुरुवात होणारे ) पण लोकप्रिय आहेतच. कुठलंही मध्यंतर नसणारे, अतिशय दर्जेदार स्ट्रीमिंग असणारे, सबटायटल्स असणारे आणि घरी निवांत फॅमिलीसोबत बसून चित्रपट पाहण्याचा चांगला अनुभव देणारे वेब स्ट्रीमिंग प्लॅन्स घेण्यास भारतीय प्रेक्षक मागेपुढे पाहत नाहीत, हे आता बर्‍यापैकी सिद्ध झाले आहे. नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईमने भारतीय प्रेक्षकांच्या आवडीनिवडी डोळ्यासमोर ठेवून डिजिटल कंटेंट दाखवायला सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या चित्रपटांचे हक्क विकत घेणं, हा या प्रक्रियेचा एक भाग. आणि स्वतःच डिजिटल कंटेंटच्या निर्मितीमध्ये उतरण हा पुढचा टप्पा. अ‍ॅमेझॉन प्राइम, हॉटस्टार , नेटफ्लिक्स ही मंडळी प्रत्यक्ष निर्मितीमध्ये पण उतरली आहेत आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर वेबसिरीज आणि वेब फिल्म्सची निर्मिती सुरू केली आहे .

     नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइमसारखे मोठे खेळाडू कधीही कुठल्या वेबसिरीजला, सिनेमाला कसा प्रतिसाद मिळाला याची आकडेवारी जाहीर करत नाही. त्यामुळे त्यांचं  ‘बिझनेस मॉडेल ’ ही ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ असा प्रकार आहे. ज्याप्रमाणे सिनेमाला मिळालेल्या यशाचा निर्देशांक म्हणजे बॉक्स ऑफिसवरची आकडेवारी आहे किंवा टीव्हीवर प्रसारित होणार्‍या मालिकांच्या यशाचं एकक ‘टीआरपी रेटिंग्ज’ आहेत,  त्याप्रमाणे ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरच्या कंटेण्टचं यश मोजणारी आकडेवारीची नोंद ठेवणारी कुठलीही यंत्रणा नाही. कुठल्या कलाकृतीला आकडेवारीच्या दृष्टीने कसा प्रतिसाद मिळाला, हे वेब स्ट्रीमिंग कंपन्यांच्या मोजक्याच उच्चपदस्थ लोकांना माहीत असतं. ‘एम एक्स प्लेयर’ सारख्या एखाद्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मध्ये-मध्ये जाहिराती दाखवल्या जातात. पण, ‘एम एक्स प्लेयर’ प्रेक्षकांना कुठलीही फीस आकारत नाही. तिथला कंटेंट सगळ्यांना फुकट बघायला मिळतो. पण अ‍ॅमेझॉन प्राइम आणि नेटफ्लिक्सला महसुलासाठी फक्त वर्गणीदारांच्या संख्येवर अवलंबून राहावं लागतं. या कंपन्या भारतीय प्रेक्षकांच्या मानसिकतेचा विचार करून स्वस्त सब्स्क्राईबिंग प्लॅन्स बाजारात आणत आहेत. जास्तीत जास्तीत प्रेक्षकांना आपल्या आवाक्यात आणण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे. पण या वेब स्ट्रीमिंग कंपन्या फायद्यात आहेत का तोट्यात, हे हाताच्या बोटावर मोजणार्‍या लोकांना माहीत आहे. या व्यवसायातली ही अपारदर्शकता चकित करणारी आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरचे खेळाडू आणि कंटेंटचा दर्जा

     भारतातल्या अनेक प्रथितयश निर्मितिगृहांनी स्वतःची डिजिटल स्ट्रीमिंग निर्मिती सुरू केली. धर्मा प्रोडक्शन्स, यशराज फिल्म्स, वायकोम 18, बालाजी, एक्सेल आणि कित्येक निर्मितिगृहांनी या क्षेत्रामध्ये हातपाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. अनेक नव्या दमाचे दिग्दर्शक डिजिटल निर्मिती करण्यास जास्त उत्सुक आहेत. त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे चित्रपटनिर्मिती करताना तुमच्या खांद्यावर सेन्सॉरचं जे जोखड असतं, ते इथं नाहीये. इथं सेन्सॉर बोर्डाच्या सूचनांवर नाचण्यापेक्षा, तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे स्वतःच्या कलाकृतीला मनमोकळेपणाने अभिव्यक्त करू शकता. इथं प्रस्थापित लेखक -दिग्दर्शकांपेक्षा नवनवीन अभिनव कल्पना मांडणार्‍या नवोदित लेखक -दिग्दर्शकांना फार मोठी संधी आहे. थोडक्यात, टेलिव्हिजन इंडस्ट्री आणि फिल्मइंडस्ट्रीला समांतर अशी वेब स्ट्रीमिंगची अर्थव्यवस्था तयार होत आहे. याचा प्रत्यक्ष फटका टीव्ही आणि सिनेमाच्या धंद्याला बसणार आहे , हे उघडच आहे . आपण या शर्यतीमध्ये मागे पडू नये, या भीतीमधूनच अनेक सिनेमा निर्मितिगृह डिजिटल कंटेंटनिर्मितीच्या क्षेत्रात उतरले आहेत.

वेबसिरीज या प्रकाराने सध्या आपल्या फिल्म इंडस्ट्रीमधल्या लोकांना झपाटून टाकलं आहे, असं एकूण चित्र आहे. विनोदाने असं एक विधान केलं जात की, मुंबईतल्या अंधेरी -ओशिवरा भागात (जिथे मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असणारे बहुसंख्य लोक वावरत असतात) जर तुम्ही अंदाजाने एखादा दगड भिरकावला, तर तो वेबसिरीज बनवणार्‍या माणसाला लागण्याची शक्यता दहापैकी चार आहे. वेबसिरीज या माध्यमाला सेन्सॉरशिप (सध्या तरी ) नसणं, वेळेची मर्यादा नसणं आणि यामुळे प्रयोग करण्याला असलेला अधिक वाव, यामुळे सध्या वेबसिरीज या प्रकाराला सुगीचे दिवस आले आहेत, असं वरकरणी तरी दिसतं. पण, ही वाढ गुणात्मक किती आणि संख्यात्मक किती, हे बघायला पाहिजे. ‘सॅक्रेड गेम्स’, ‘मेड इन हेवन’, ‘डेली क्राईम’, ‘पाताल लोक’ यासारखे क्वचित अपवाद वगळता आपल्या वेबसिरीज बाहेरच्या देशातल्या समकालीन वेबसिरीजच्या (नार्कोस, चेर्नोबिल, गेम ऑफ थ्रोन्स इ) पासंगाला पण पुरत नाहीत, हे कटू सत्य आहे.

आपल्या मनोरंजन क्षेत्राचा तोंडावळा शहरी आहे. आपल्याकडे जो मनोरंजनासाठी कंटेंट बनतो, तो मुख्यत्वे शहरात राहणार्‍या लोकांसाठी बनतो. आपल्याला ज्या ग्रामीण भागासाठी, शेतकर्‍यासाठी अधनं-मधनं सहानुभूतीचे कोरडे उमाळे येत असतात, त्या भागासाठी मनोरंजनाचा कंटेंट फार कमी बनतो. ग्रामीण भागातल्या लोकांना मग शहरी उच्चवर्गीय /मध्यमवर्गीय घरातले तेच घिसेपीटे प्रश्न दाखवणार्‍या मालिका बघाव्या लागतात, नाहीतर सिनेमाच्या पडद्यावर एनआरआय लोकांच्या पुचाट प्रेमकथा बघाव्या लागतात. ग्रामीण पार्श्ववभूमीवर बनल्या जाणार्‍या थोड्या फार मालिकांची ‘डाऊन मार्केट’ म्हणून खिल्ली उडवली जाते, नाहीतर त्या लोकांना जो पलायनवादी सिनेमा आवडतो (ज्यात पावसात भिजणारी नायिका असते, एकाचवेळेला वीस पंचवीस गुंडाना लोळवणारा नायक असतो, एकाचवेळेस विनोदी आणि क्रूर असणारा खलनायक असतो आणि कथानकाशी फारसा संबंध नसणारे विनोदवीर असतात) त्याला ‘सिंगल स्क्रीनमधला सिनेमा’ या ब्रॅकेटमध्ये टाकून त्याच्याकडे तुच्छतेनं बघितलं जातं.

     आपल्याकडे बनणार्‍या बहुतांश वेबसिरीज पण शहरी भागात घडणार्‍या, शहरी पात्र असणार्‍याच असतात. याची कारणं काय असावीत? आपल्याकडे मालिका, सिनेमा आणि वेब-सिरीजसाठीचा कंटेंट डेव्हलप करणारी आणि निर्मिती करणारी जी मंडळी आहेत, ती शहरातील आहेत. त्यांना अभिरुचीच्या दृष्टीने जे जवळचे विषय वाटतात, तेच ते निवडतात. त्याला बाजारपेठेची गणितं, असं एक गोंडस नाव आहे. जास्त क्रयशक्ती असणारा शहरी भाग, हा या मार्केटमधला दबंग खेळाडू आहे. बहुतांश जाहिराती देणारे प्रायोजक पण शहरी भागातलेच असतात. नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’ नंतर आणि काही लोकप्रिय मालिकांनंतर परिस्थिती थोडी बदलत चालली आहे. पण, ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असणार्‍या मालिका, सिनेमे, वेब सिरीज बनवणं हे अजूनही मोठं आव्हान आहे. या अशा प्रतिकूल परिस्थितीत युट्यूबवर ‘कोरी पाटी प्रोडक्शन्स’ या युट्यूब चॅनलवर उपलब्ध असणारी ‘गावाकडच्या गोष्टी’ ही वेबसिरीज प्रस्थापित माध्यमांना आवाहन देत समर्थपणे उभी आहे आणि या सिरीजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे, हे फार सुखावणारं चित्र आहे.

     ओटीटी प्लॅटफॉर्म्सची रेलचेल असण्याच्या काळात युट्यूबवरचा मराठी कंटेंट काहीसा दुर्लक्षित राहतो आहे. तो सहजसाध्य आणि फुकट उपलब्ध असेल म्हणून कदाचित, पण अनेक मराठी माणसं युट्यूबवर वेगळे भन्नाट प्रयोग करत आहेत. ‘मराठी वायरल फिवर’, लाखो लोकांना हसवणारे ट्रम्प तात्यांचे व्हिडिओ, ग्रामीण भागातल्या मुलांनी चालवलेला ‘खास रे’ सारख युट्यूब चॅनल यांना लाखोंनी सबस्क्राइबर आणि views आहेत. मुख्य माध्यमातल्या कुणाचंही पाठबळ नसताना आणि मर्यादित संसाधनांवर विसंबून असूनही लोकप्रिय झालेले हे प्रयोग संशोधनाचा विषय आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या भाषेतला, माझ्या अवतीभवतीचा (dramatically माझ्या मातीतला!) कंटेंट उपलब्ध आहे. तिथं माझ्या आजुबाजूचा सामाजिक, राजकीय, आर्थिक भवताल दिसतो. त्यामुळे अशा आपल्या मातीतल्या प्रयोगांना आपण जास्तीत जास्त पाठिंबा द्यायला हवा.

ओटीटी प्लॅटफॉर्म्स विरुद्ध सिनेमा : आगामी लढ्याची नांदी

15 ऑगस्ट 2019 ही तारीख भारतीय मनोरंजन क्षेत्राच्या इतिहासातली एक महत्त्वाची तारीख म्हणून नोंदली जाईल. सणासुदीला आणि लाँग वीकेंडला दोन मोठ्या स्टार्सचे सिनेमे एकत्र रिलीज होणं, ही वर्षाला 1200 च्या आसपास सिनेमे रिलीज होणार्‍या देशात तशी नेहमीची गोष्ट. या 15 ऑगस्टला पण अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ आणि जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’ हे दोन बिग बजेट सिनेमे प्रदर्शित झाले. सोबत क्वेन्टीन टेरेन्टीनो या भारतात एका वर्गात लोकप्रिय असणार्‍या दिग्दर्शकाचा ‘वन्स अपॉन अ टाईम इन…हॉलिवुड’ हा सिनेमा पण प्रदर्शित झाला. या मोठ्या सिनेमांच्या भाऊगर्दीमध्ये आणि जोरदार चालणार्‍या प्रमोशनमध्ये सगळ्यात जास्त चर्चा होती ती नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार्‍या ‘सॅक्रेड गेम्स’ च्या दुसर्‍या सीझन्सची. नेटफ्लिक्स आपले र्ींळशुशीीहळि चे आकडे फारच कमीवेळा प्रदर्शित करत असतं. पहिल्या सीझनच्या तुलनेत दुसर्‍या सीझनने प्रेक्षकांची काहीशी निराशा केली असली, तरी ‘सॅक्रेड गेम्स’ च्या या सीझनला पण प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे, हे मानण्यास भरपूर वाव आहे. म्हणजे प्रदर्शनापूर्वीच्या चर्चांमध्ये आणि प्रदर्शनानंतर पण ‘सॅक्रेड गेम्स’ हा या मोठ्या स्टार्सच्या सिनेमांसमोर ताठ उभा राहिला. ही भारतीय वेबसिरीजच्या किंवा डिजिटल दृकश्राव्य माध्यमांच्या इतिहासातली एक मैलाचा दगड ठरू शकेल अशी एक घटना होती. ‘सॅक्रेड गेम्स’च्या घवघवीत यशानंतर काही प्रश्न भविष्यकाळात समोर येऊ शकतात. नेटफ्लिक्स अ‍ॅमेझॉन प्राईम, हॉटस्टार आणि ऑकिअलकेंद्रबिंदू असं ज्याच्याबद्दल बोललं जातं त्या सिनेमामध्ये (इथे मोठ्या पडद्यावर आवर्जून बघितला जाणारा सिनेमा या अर्थाने अपेक्षित आहे) सुरू होणार्‍या प्रत्यक्ष युद्धाची ही नांदी ठरू शकते का? वेबसिरीज या वेगाने प्रसिद्ध होणार्‍या प्रकाराचा फटका सिनेमाला बसू शकतो का? ऑनलाईन स्ट्रीमिंगचा सिनेमावर आर्थिक, सामाजिक (सिनेमा हा आपल्याकडे Social Informer म्हणून बघितला जातो, या अर्थाने) पातळ्यांवर चांगल्या वाईट अर्थाने कसा प्रभाव पडू शकतो ? हे ते प्रश्न.

     ऑनलाईन स्ट्रीमिंगवरच्या कंटेंटचा सिनेमावर पडू शकणारा प्रभाव, हा मुद्दा आपल्याकडे आताशी कुठं चर्चेला येऊ लागला असला, तरी हॉलिवूडमध्ये वादाचा धुरळा अगोदरच उडू लागलाय. स्टीव्हन स्पीलबर्ग जे बोलतो त्याची बातमी होते आणि तो जे मत मांडतो त्यावर चर्चा होतात. स्पीलबर्गने काही दिवसांपूर्वी असंच एक विधान केलं आणि चर्चेचा धुरळा उडाला. स्पीलबर्गचं नेटफ्लिक्स आणि तत्सम ऑनलाईन स्ट्रीमिंग कंपन्यांबद्दल असलेलं प्रतिकूल मत हे काही लपून राहिलेलं नाही. नेटफ्लिक्सच्या ‘रोमा’ सिनेमाला ऑस्कर नॉमिनेशन मिळाल्यावर स्पीलबर्गने जाहीर नापसंती व्यक्त केली होती. स्पीलबर्गचा हा नेटफ्लिक्सवरचा आकस हा नेमका कुठून आलाय? तर स्पीलबर्गच्या मते, सिनेमा हा सिनेमाहॉलमध्ये जाऊनच अनुभवायची गोष्ट आहे. तुमच्या टीव्हीवर किंवा कंप्युटर स्क्रीनवर अनुभवण्याची नाही. नेटफ्लिक्समुळे सिनेमाच्या revenue model ला धक्का बसू शकतो, या भीतीने हॉलीवूडने बिझनेस मॉडेलमध्ये बदल करण्याच्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

     सिनेमाला आताच या वेबसिरीज स्पर्धा देऊ शकतील, असं मानणं धाडसाचं ठरेल. भारतीय समाज हा सर्वच क्षेत्रात व्यक्तिपूजक आहे. सिनेमा क्षेत्र पण याला अपवाद नाही. रजनीकांत, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, महेशबाबू आणि देशातल्या सर्व फिल्म इंडस्ट्रीजमध्ये लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सुपरस्टार्स सिनेमातच कार्यरत आहेत. वेबसिरीजमध्ये काम करणं त्यांना कमीपणाचं वाटत असावं. याबाबतीत 1999 च्या काळातली टेलिव्हिजन इंडस्ट्री आणि सध्याची वेब कंटेंट इंडस्ट्री यांच्यात काही मोठी साम्यं आढळतात. 1999 ला टेलिव्हिजन इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर प्रसरण पावत होती. तिला मोठ्या प्रमाणावर जनाश्रय लाभत होता. पण, आपल्याच धुंदीत असणारा मोठा पडदा छोट्या पडद्याकडे लक्ष द्यायलाच तयार नव्हता. मोठ्या पडद्यावरचे कलाकार छोट्या पडद्याला आणि त्यात काम करणार्‍या कलावंतांना तुच्छ समजायचे. परिस्थिती बदलली ती ‘कौन बनेगा करोडपती’ या गेम शोपासून. छोट्या पडद्याचं महत्त्व ओळखून अमिताभ बच्चन या महानायकाने हा गेम शो होस्ट करायला घेतला आणि खेळाचे सगळेच नियम बदलून गेले. बच्चनचं हे भूतो न भविष्यती यश बघून नंतर गोविंदा, शाहरुख खान, आमिरखान, सलमान खान असे अनेक नायक छोट्या पडद्याकडे वळले. भारतीय वेबसिरीजला जितकी गरज चांगल्या कंटेंटची आहे, तितकीच तो कंटेंट आपल्या खांद्यावरून वाहून नेणार्‍या सुपरस्टारची आहे. हे थोडं विचित्र वाटू शकतं.

     व्यवस्थेपेक्षा व्यक्ती मोठ्या मानणार्‍या व्यक्तिपूजक समाजाचं हेच वास्तव आहे. ‘सॅक्रेड गेम्स’ या वेबसीरिजने सैफ अली खान या गुणी, पण फारसं यश न मिळालेल्या नटाच्या कारकिर्दीमध्ये नवीन प्राण फुंकले. वडिलांच्या उंचीसमोर झाकोळून गेलेल्या अभिषेक बच्चनला ‘ब्रीद 2’ या सिरीजच्या यशाने नवसंजीवनी दिली. स्वप्निल जोशी या मराठीमधल्या आघाडीच्या अभिनेत्याला ‘समांतर’ या सुहास शिरवळकरांच्या याच नावावरच्या कादंबरीवर आधारित वेबसिरीजच्या यशाने मोठा हात दिला. अक्षय कुमार एका वेबसिरीजमध्ये काम करत असल्याच्या बातम्या मध्यंतरी झळकल्या होत्या. अक्षय कुमार वेबसिरीजचा बच्चन होऊ शकतो का, हे बघणं औत्सुक्याचं राहील. याचबरोबर अनेक मोठे स्टार्स ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळले, तर ‘स्टार पॉवर’ची मक्तेदारी असणार्‍या फिल्म इंडस्ट्रीसमोरची आवाहनं अजून खडतर होऊ शकतात.

     आपल्या देशात ओटीटी प्लॅटफॉर्म्सला काही मर्यादा पण आहेत. आपल्या दूरसंचार कंपन्यांनी स्वस्त डेटाची लयलूट आपल्या ग्राहकांवर चालवली असली, तरी त्यांची अप्रचंड कार्यक्षम, खुरडत खुरडत चालणारी सेवा (विशेषतः ग्रामीण भागात) हा एकूणच वेब स्ट्रीमिंग कंपन्यांच्या वाटचाली मधला मोठा अडथळा आहे. याउलट मोठा दैदीप्यमान इतिहास असणार्‍या सिनेमाचं इन्फ्रास्ट्रक्चर खेड्यापाड्यापर्यंत पसरलं आहे. आपल्या प्रेक्षकाला अजून पण थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघणं या प्रकाराबद्दल प्रचंड आपुलकी आहे. मोबाईलच्या छोट्या स्क्रीनपेक्षा अनेकांना अजूनही चित्रपटगृहात (भले ते ढेकणांनी भरलेलं, घाणेरडे प्रसाधनगृह असणारं, गळकं थिएटर असेल) जाऊन चित्रपट बघण्यातून एक किक मिळते. या मर्यादांवर मात केली, तर ओटीटी प्लॅटफॉर्म्सचं क्षेत्र सिनेमा क्षेत्राला नजीकच्या भविष्यकाळात तडीस तोड उत्तर देऊ शकतं.

ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सेन्सॉरशिप

दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर सेन्सॉरशिप लादली जावी का? नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईमवरच्या काही शोजमध्ये वापरण्यात आलेल्या भडक दृश्यांमुळे त्यांच्यावर सेन्सॉरशिप लादली जावी, असा आरडाओरडा एका वर्गाकडून सुरू झाला. सर्वोच्च न्यायालयाने पण केंद्र सरकारला या ऑनलाईन स्ट्रीमिंग प्रोव्हायडर्ससाठी काही मार्गदर्शक तत्त्वं तयार करावीत, यासाठी नोटीस बजावली होती. सरकारने असं काही पाऊल उचलण्यापूर्वीच नेटफ्लिक्सने आणि अ‍ॅमेझॉन प्राईमने भारतीय मार्केट या कारणांमुळे गमावू लागू नये म्हणून स्वतःवरच काही मर्यादा (voluntary censorship ) घालून घेण्याचं धोरण जाहीर केलं. याच सेन्सॉरशिपच्या मुद्यावरून यापूर्वी त्यांना इंडोनेशियासारखं मोठं मार्केट गमवावं लागलं होतं. त्या इतिहासाची पुनरावृत्ती नको म्हणून यावेळेस त्यांनी ताक पण फुंकून प्यायला सुरुवात केली असावी. नेटफ्लिक्सने ‘अँग्री इंडियन गॉडेस’ या वादात अडकलेल्या सिनेमाचं प्रसारण पण सेन्सॉर्ड व्हर्जनने केलं.

     आजकाल इंटरनेटच्या आणि डिजिटल क्रांतीच्या युगात सेन्सॉरशिप राबवणं हे अतिशय कठीण आहे. प्रत्येक माणसाच्या हातात मोबाईल असताना, नेटपॅक अतिशय स्वस्त झाले असताना फक्त काही प्लॅटफॉर्म्सवर सेन्सॉरशिप लागू करणं, म्हणजे फाटलेल आभाळ दाभणाने शिवण्यासारखं आहे. माहितीचा-कंटेंटचा हा प्रपात थांबवणं आता कुणाच्याही हातात नाही. अगदी सरकार नावाच्या शक्तिशाली संस्थेच्या पण हातात नाही. अनसेन्सॉर्ड कंटेंट बघण्यासाठी प्रेक्षकांचा एक मोठा हिस्सा पायरेटेड कंटेंटकडे वळेल, हा पण एक मोठा धोका आहे. याचा महसुली फटका डायरेक्ट ऑनलाईन स्ट्रीमिंग प्रोव्हायडर्सला बसेल. ही झाली सेन्सॉरशिपची आर्थिक आणि सामाजिक बाजू. या सेन्सॉरशिपचा मोठा फटका कंटेंट तयार करणार्‍या कलाकारांच्या सृजनशीलतेला बसेल. त्यांच्या मुक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा येतील. पहिल्यांदाच भारतीय लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आणि संबंधित इतर कलाकारांना आणि तंत्रज्ञांना मनमोकळेपणे, कुठलंही बंधन नसताना काहीतरी अभिनव सृजनशील करण्याची संधी ऑनलाईन स्ट्रीमिंग प्रोव्हायडर्समुळे मिळाली आहे. उर्वरित जग पण भारतीय कलाकारांची सृजनशीलता बघण्यास उत्सुक आहे. सेन्सॉरशिपमुळे या सृजनशीलतेच्या खळाळत्या प्रवाहाला बांध घालण्यासारखं होईल. अर्थातच, वेबसिरीजवर अनेकदा गरज नसताना हिंसेचा, भडक संवादाचा आधार घेण्याचा आरोप लावला जातो, तो पूर्णपणे असत्य नाहीच. काहीवेळा सनसनाटी निर्माण करण्यासाठी गरज नसताना पण बोल्ड सीन्स, हिंसेचे सीन्स टाकले जातात, हे खरंच आहे. पण, त्यासाठी पूर्ण ऑनलाईन कंटेंटेवर सेन्सॉरशिप लादणं हे  कलाकारांसाठी आणि प्रेक्षकांसाठी सुद‍्धा खूप अन्यायकारक असेल.

     मध्यंतरी शाहरुख खानच्या अनेक जुन्या हिट चित्रपटांचे आणि आगामी चित्रपटांचे हक्क नेटफ्लिक्सने विकत घेतले. त्याचवेळेस ब्रॅड पीट या आघाडीच्या हॉलिवूड नटाच्या ‘वॉर मशीन’ या फिल्मची निर्मितीही नेटफ्लिक्सने केली. त्याच्या प्रमोशनसाठी पीट भारतात आला असताना शाहरुख खानने त्याच्या सन्मानार्थ पार्टी दिली होती. त्यावेळेस पत्रकारांशी बोलताना शाहरुख आणि पीट या दोघांनाही वेब स्ट्रीमिंगची भलामण केली. त्यावेळेस शाहरुख म्हणाला, ‘मी जेव्हा बॉलिवूडमध्ये आलो होतो, तेव्हा तुम्हाला चित्रपट बनवायचा असेल, तर तुम्ही व्यवस्थेचा किंवा कुठल्यातरी कॅम्पा भाग बनणं आवश्यक होतं. पण, नेटफ्लिक्समुळे आता हे बंधन दूर झालं आहे. थोडक्यात, शाहरुखच्या मते एकूणच बॉलिवूडमधली प्रेक्षकांच्या माथी मारली जाणारी सुमार घराणेशाही, इंडस्ट्रीमध्ये ब्रेक मिळण्यासाठी कुणी गॉडफादर असणं, पैसा बाळगून असल्यावर इंडस्ट्रीच्या नाड्या आवळणं हे जे प्रकार आहेत, त्यावर वेब स्ट्रीमिंग कंपन्या चांगला उतारा आहेत. कारण इथे कशापेक्षाही दर्जाला जास्त किंमत आहे. पण, स्टुडिओ सिस्टम भारतात पुन्हा आल्यावर पण असेच दावे केले जात होते, पण भारतातल्या ‘स्टार सिस्टम’ आणि घराणेशाहीने फिल्म स्टुडिओव्यवस्था कच्ची खाल्ली, पचवली आणि ढेकर पण दिला नाही. वेब स्ट्रीमिंग कंपन्या हा पर्वत हलवू शकतात का, याचं निरीक्षण करणं हा रोचक प्रकार असणार आहे.

(लेखक हे नामवंत स्तंभलेखक आहेत.)

७४४८०२६९४

Previous articleकाळ्या गव्हाची चकित करणारी कहाणी
Next articleअभूतपूर्व मन्वंतर
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here