राजारामबापू पाटील यांच्या आकस्मिक निधनानंतर अचानक राजकारणातली महत्त्वाची जबाबदारी अंगावर येऊन पडलेल्या एका उच्चशिक्षित तरुणाचं ते व्यक्तिमत्त्व तेजस्वी म्हणता येईल इतकं प्रभावी होतं. बोलण्यातला गोडवाही मोहवून टाकणारा होता. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचं सरकार आल्यानंतरचं पहिलंच हिवाळी अधिवेशन नागपूरला होतं. काँग्रेसवाले विरोधी पक्ष म्हणून सरावले नव्हते आणि शिवसेना-भाजपवालेही सत्ताधारी म्हणून रुळले नव्हते. विरोधात आहे म्हणजे आक्रमक बनायला पाहिजे, हे लक्षात यायला लागल्यावर काँग्रेसची विरोधाची धार वाढू लागली. शोभाताई फडणवीस यांच्या अन्न व नागरी पुरवठा खात्यातील चनाडाळ घोटाळा ऐरणीवर आला होता. विधानसभेत तेव्हा आर. आर. पाटील, दिग्वीजय खानविलकर, राजन पाटील, दिलीप वळसे-पाटील, अशोक धात्रक, माणिकराव ठाकरे,बबनराव पाचपुते वगैरे मंडळी आक्रमक असायची. जयंत पाटील या तरुण तुर्कांच्या गटात असले तरी दंगा करायच्यावेळी ते मागेच असायचे. एकेदिवशी विरोधक टाळ गळ्यात अडकवूनच सभागृहात आले आणि त्यांनी आपल्या मागण्यांचं भजन सुरू केलं. जयंत पाटीलही गळ्यात टाळ अडकवून हौद्यात उतरून भजन करणार्यांमध्ये होते. त्याच रात्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडं पत्रकारांसाठी जेवण होतं. तिथं दिवसभरातल्या कामकाजाचा विषय निघाल्यावर वळसे-पाटील म्हणाले, ‘अहो आज आमचे जयंत पाटीलसुद्धा गळ्यात टाळ अडकवून पुढं होते. नाहीतर ते एवढे शांत असतात की आम्ही त्यांना जयंत देशपांडे म्हणतो !’
मतदारसंघात दौरा असतो तेव्हासुद्धा त्यांचं हे सुरू असतं. तिथं एका गावातून दुसर्या गावात जाईपर्यंत संबंधितांशी मोकळेपणाने चर्चा करतात. पुढच्या गावाकडं जाताना नवे लोक गाडीत असतात. अतिशयोक्ती ठरणार नाही, परंतु शरद पवार यांच्यानंतर समोरच्या माणसांचं मन लावून ऐकून घेणारा दुसरा कुणी नेता महाराष्ट्राच्या राजकारणात असेल तर ते एकमेव जयंत पाटील आहेत. हा नेता आपण जे सांगतोय ते मन लावून ऐकतोय हे समाधान समोरच्या माणसाला मिळत असतं. एखादी व्यक्ती भेटायला आली असेल, त्यांच्यासोबत त्यांचे कुणी नातेवाईक, कुटुंबीय असतील तर त्यांचीही व्यक्तिगत विचारपूस ते करतात. कुणी काही वेगळं करीत असतील तर त्यासंदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. कामं मार्गी लावण्याचा विक्रम करण्यापेक्षा समोरच्या माणसांना विश्वास देण्याचं काम करायला ते प्राधान्य देतात.
शरद पवार यांचं प्रेम आणि विश्वास मिळाला तरी जेव्हा जेव्हा कसोटीचा प्रसंग आला, तेव्हा पवारांनी त्यांच्याबाबतीत दुजाभाव केल्याचंच चित्र दिसून आलं. आर. आर. पाटील हे पवारांचे लाडके होते. त्यामुळं त्यांच्यासाठी जयंत पाटील यांच्याकडचं गृहखातं वर्षभरात काढून घेऊन ते परत आर.आर. पाटील यांना देण्यात आलं. दुसरा प्रसंग महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतरचा. खरंतर पक्षाच्या कठिण परिस्थितीत प्रदेशाध्यक्ष म्हणून दिलेली साथ आणि अजित पवार यांच्या फडणवीसांसोबतच्या शपथविधीनंतरची परिस्थिती हाताळताना बजावलेली भूमिका यामुळं स्वाभाविकपणे उपमुख्यमंत्रिपदाचे दावेदार जयंत पाटील हेच होते. परंतु तिथंही पुन्हा ते पद अजित पवार यांच्याकडं गेलं.