संत गाडगेबाबांच्या सामाजिक क्रांतीकडे प्रबोधनकार एक सत्यशोधक पत्रकार म्हणून पहात होतेच. मुंबईत बाबांची अनेक ठिकाणी कीर्तने व्हायची. ज्या एकमेव कीर्तनाची ध्वनीफित उपलब्ध आहे, ते कीर्तनसुध्दा मुंबईतच झालेले. प्रबोधनकार ठाकरे यांनी दादर येथील कॅडेल रोडवर असलेल्या एका वाडीत झालेले संत गाडगेबाबांचे कीर्तन ऐकले होते. हे कीर्तन इतर टाळकुट्या, पोटभरू कीर्तनकारांपेक्षा वेगळे आहे, याची जाणीव त्याचवेळी प्रबोधनकारांना झाली होती. एक समाजवादी सत्यशोधक या रूपात प्रबोधनकार बाबांना पहात होते. म्हणूनच त्यांनी संत गाडगेबाबा यांच्या चरित्रात त्यांचे सत्यशोधकीय दृष्टीकोनातून परखड लिखाण केले. सन १९५२ पर्यंतच्या संत गाडगेबाबांच्या क्रांतीकारी प्रवासाची प्रबोधनकारांनी अत्यंत ताकदीने मांडणी केली. या सबंध चरित्रातून दीनदुबळ्याचा उद्धार, विज्ञानवादी संत गाडगेबाबा उभा करण्यात प्रबोधनकारांनी कुठलीच कसर बाकी ठेवली नाही. संत गाडगेबाबा प्रसिध्दीपासून दूर राहात असल्याने त्यांच्या जीवनातील अनेक घटना मात्र समोर आल्या नाहीत. असे असले तरी जो समाजवादी महानायक प्रबोधनकारांनी या चरित्रातून उभा केला त्याला तोड नाही.