मुकुंद कुळे
………………….
भारतीयांची एक गंमत बघा, एकीकडे मुलीला मासिक पाळी सुरू झाली की ती स्त्री झाली, वयात आली म्हणून सोहळे-उत्सव केले जातात. मुलीला सजवून झोपाळ्यावर बसवून अगदी तिची साग्रसंगीत ओटी भरली जाते. कुणाला ते पूर्वीचे मुलगी ऋतुमती झाल्याचे सोहळे पाहून किंवा तेव्हाची वर्णनं वाचून वाटावं, की किती तो स्त्रीचा आणि तिच्या मातृत्वशक्तीचा सन्मान. पण प्रत्यक्षात तो सन्मान असतो तिच्या प्रसवा होण्याचा; ती आता मूल जन्माला घालू शकणार याचा. तिच्या स्त्रीत्वाचा, मातृत्वाचा वा सर्जनशीलतेचा नाही! अन्यथा याच समाजाने स्त्रीच्या मासिक पाळीचा आणि ऋतुस्रावाचा सन्मान नसता का केला?
हा सन्मान स्त्रीच्या आणि तिच्या मासिक पाळीच्या वाट्याला अजून आलेला नाही. आता काळाच्या ओघात स्त्रिया शिकल्यात, वेगवेगळ्या क्षेत्रांत कर्तृत्व गाजवतायत, प्रसंगी पुरुषालाही मागे टाकून पुढे धावतायत. परिणामी त्यांचं त्यांनीच आपल्या मासिक पाळीचा बाऊ करणं आता सोडून दिलंय. म्हणजे त्या चार दिवसांत त्यांना दुखतं-खुपतंच. त्या काळात जरा निवांतपणा मिळाला तर त्यांना तो हवाही असतो. पण म्हणून त्या काही घरी बसत नाहीत. तसंही पूर्वी ज्या कष्टकरी महिला होत्या, त्या कधीच मासिक पाळीच्या दिवसांत घरी थांबलेल्या-बसलेल्या नव्हत्या. हातावर पोट म्हटलं की त्यांना त्या मासिकधर्माच्या काळातही शेतात-रानावनात जावंच लागायचं. कुठल्याच प्रकारच्या सोयीसुविधा नसतानाच्या त्या काळात महिला या मासिक शरीरधर्माला कशा सामोऱ्या गेल्या असतील कोण जाणे!
आता काळ बदललाय खरं, पण सर्जनशील मासिक पाळी आणि ती जिला येते त्या स्त्रीबद्दलची समाजाची मानसिकता बदललीय का? तर त्या बाबतीत समाजात अजूनही अळीमिळी गुपचिळीच आहे!
… आणि म्हणूनच आता स्त्रियांनीच, मग त्या कोणत्याही सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक स्तरातील असोत आपल्या क्षमतेची कवाडं ठार उघडली पाहिजेत… ज्ञानाच्या, ताकदीच्या, क्षमतेच्या स्तरावर समाजपुरुषाला धोबीपछाड दिली पाहिजे… तशी उदाहरणं समाजात नसतातच असं नाही, फक्त त्यात वाढ व्हायला हवी. विशेषतः भारतीय कलापरंपरेतील स्त्रियांनी समाजपुरुषाला कायमच आव्हान दिलेलं दिसतं… मग ती देवदासी परंपरेतील स्त्री असो किंवा नाईलाजास्तव थेट शरीरविक्रय करणारी स्त्री असो. त्यांच्या वाट्याला देवदासीपणाचे-वेश्येचे भोग आले खरे, पण कालौघात त्यांच्या आयुष्याचा, अनुभवांचा, जाणिवा-संवेदनांचा, विचारांचा पट एवढा विस्तारला की जणू काही त्याच बनल्या आदिशक्ती-आदिमाया. जगाला खेळवणाऱ्या. हो जगाला खेळवणाऱ्या. अनेकांचा समज असतो की आपण बाईला खेळवतोय-नाचवतोय. परंतु अनेकदा प्रत्यक्षात पुरुष असतात बाईच्या हातातलं कचकड्याचं खेळणं. पुरुष समजतात तेवढ्या बाया खुळ्या कधीच नसतात. त्या चांगल्याच ओळखून असतात पुरुषाला. मागे एकदा कुणी तरी थट्टेत म्हणालं होतं- माझ्या बहुतेक सगळ्या जातीच्या बाया भोगून झाल्यात. सहज म्हणून मी ते एका मैत्रिणीला सांगितलं. तेव्हा ती खळखळून हसली आणि म्हणाली- ‘येडझवा आहे तो, बहुतेकींनी त्यालाच वापरून घेतलं असेल…’
एकूणच भारतीय गणिका, वारांगना, नगरवधू ते अगदी वेगवेगळ्या कलासमूहांतल्या महिलांकडे पाहिलं की लक्षात येतं- या स्त्रिया जात्याच खंबीर असतात. त्यांना पुरुषाचा कावा नेमका ठाऊक असतो. परिस्थितीच्या रेट्यात सापडल्यावर सुरुवातीला त्या भेलकांडतात, कोसळतात. पण लवकर सावरतातही. मग परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी पदर खोचून उभ्या राहतात. विशेषतः शरीर विक्रयाच्या व्यवसायात आलेल्या महिला तर संपूर्ण समाजच कोळून पितात… खरं तर त्या समाजपुरुषाला एका अर्थाने विचारत असतात- बा समाजपुरुषा तुजी औकात काय्ये?
आज हाच सवाल समाजातल्या प्रत्येक स्त्रीने करायला हवा!
(लेखक हे लोककला व लोकपरंपरेचे अभ्यासक आहेत)
9769982424